चीनमधील शास्त्रज्ञांना सापडला हजारो जीवाश्मांचा साठा

जीवाश्म Image copyright AO SUN

चीनमधील एका नदीच्या काठी शास्त्रज्ञांना आश्चर्यकारकरित्या हजारो जीवाश्मांचा साठा सापडला आहे.

हे जीवाश्म 51.8 कोटी वर्षांपूर्वीचे असावेत असं मानलं जात आहे. या जीवाश्मांमध्ये अनेक प्राण्यांच्या शरीराचे अवयव आहे तसेच जतन झाले आहेत. या जीवांची त्वचा, आतील अवयव, डोळे अत्यंत उत्कृष्ठपणे जतन झाले आहेत.

याआधी कधीच शोध लागला नव्हता अशा प्रजातींची फॉसिल्स सापडल्यामुळे पॅलन्टॉलॉजिस्ट हा अत्यंत आश्चर्यकारक असल्याचं सांगत आहेत.

क्विंगजिआंग बायोटा नावाने गोळा केलेले हे जीवाश्म ह्युबेई प्रांतात डॅन्शुई नदीजवळ सापडले आहेत.

जीवाश्मांचे 20 हजार नमुने गोळा करण्यात आले असून त्यातल्या शेवाळ, कृमी, सागरी शैवाल, जेलीफिश यांच्या 4351 नमुन्याचं निरीक्षण झालं आहे.

पृथ्वीवरील जीवनाच्या इतिहासातील सुरुवातीच्या टप्प्यांबाबत माहिती देणारे ते महत्त्वाचे स्त्रोत असतील असं चीनच्या नॉर्थवेस्ट विद्यापीठातील प्रा. झिंगलिआंग झांग यांनी सांगितले. या शोधाबाबतची माहिती शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भूगर्भशास्त्रज्ञ आणि या संशोधनात सहभागी असलेले प्रा. रॉबर्ट गेन्स यांनी बीबीसीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये माहिती दिली आहे की, यामध्ये सापडलेले बहुतांश जीवाश्म जेलीफिश, कृमींसारखे मृदू शरीराच्या जीवांचे आहेत. अशा प्राण्यांचे जीवाश्म होत नाहीत असं मानलं जायचं.

Image copyright AO SUN
प्रतिमा मथळा जेलीफिशचे जीवाश्म

आतापर्यंत जीवाश्मांमध्ये कठीण शरीराचे प्राणी होते. त्यांच्यामध्ये हाडांसारखे कठीण अवयव होते. हे अवयव कमी सडतात किंवा त्याचं विघटन कमी प्रमाणात होतं.

प्रा. झांग यांच्यामते क्विंगजिआंग बायोटामधील सूक्ष्मजीव वादळासारख्या अचानक घडलेल्या घटनेमुळे जीवाश्मात रुपांतर झाले असावेत त्यामुळेच त्यातील सूक्ष्म उती योग्यप्रकारे जतन झाल्या असाव्यात.

जेलीफिश, समुद्री शैवालांसारख्या जीवांचे जीवाष्म आधी कधीच पाहिलं नव्हतं असं प्रा. गेन्स यांनी सांगितले. तसेच त्यातील विविधता आश्चर्यकारक आहे.

हा गेल्या 100 वर्षांमधील हे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन आहे असं पॅलेन्टोलॉजिस्ट अलिसन डॅले यांनी बीबीसीला सांगितले.

Image copyright ROBERT GAINES
प्रतिमा मथळा अनेक जीव अचानक वेगाने चिखल आणि गाळामध्ये अडकले असावेत

या शोधामुळे मी आश्चर्यचकीत झालो आहे, अशा एखाद्या घटनेचा मी साक्षीदार होईन असं मला वाटलं नव्हतं. जेलीफिशचं जीवाश्म पहिल्यांदाच दिसत आहे. जेलीफिश हे अत्यंत मऊ शरीराचे आणि नाजूक असतात. विश्वास बसणार नाही अशा रितीने त्यांचं जतन झालं आहे.

संशोधकांचा चमू आता इतर प्रजातींची माहिती गोळा करत आहे. तसेच या प्रदेशात आणखी उत्खनन करण्यात येत आहे. यातून प्राचीन काळात स्थानिक जैवसंस्था आणि जीवाश्मीकरणाच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.

प्रा. झांग म्हणाले, यासर्व नव्या प्रजाती आहेत. नवं काही सापडतं तेव्हा मी नेहमीच उत्साह येतो.

Image copyright ROBERT GAINES
प्रतिमा मथळा संशोधकांचा चमू

हे जीवाश्म कँब्रियन काळातील आहे. हा काळ 54.1 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला आहे आणि पृथ्वीवर तेव्हा जैवविविधतेत वाढ होत गेली.

हे संशोधन वाचकांना आश्चर्यचकीत करून टाकेल असं प्रा. गेन्स यांनी सांगितलं. ते म्हणाले, जैवविविधता नष्ट होण्याची चिन्हे दिसत असली तरी जैवविविधतेला बऱ्याचदा आपण गृहित धरलेलं असतं.

बहुतांश प्रजातींचे वंश कॅब्रियन एक्स्प्लोजनमधून बाहेर आले होते. तत्पूर्वी असा प्रकार कधीच झाला नव्हता. ही घटनाच या जिवंत प्राण्यांशी आपल्या नात्याची आठवण करून देते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)