ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांत आशियातील विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

लैंगिक अत्याचार Image copyright Getty Images

रिया सिंग (नावाने बदललं आहे) सिडनीच्या सेंट्रल स्टेशन ते विद्यापीठ असा प्रवास करत होती. बसमध्ये चढताच एक पुरुष कर्मचारी तिला खेटून उभा राहिला आणि तिच्याशी लगट करू लागला.

"हे जवळपास 20 मिनिटं सुरू होतं. मी फार घाबरले होते, मला अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं. विद्यापीठात ही तक्रार कुणाकडे करावी हेही समजत नव्हतं. माझ्या पालकांना यातील काहीच कळणार नव्हतं, त्यामुळे त्यांना हे समजू नये असं मला वाटतं होतं. मी माझ्या लहान भावालाही हे सांगू शकत नव्हते. मी माझ्या काही जवळच्या मित्रांना हा प्रकार सांगितला, पण त्यांना सविस्तर सांगितलं नाही."

हा प्रकार 2017ला घडला. ऑस्ट्रेलियाच्या मानवी हक्क आयोगाचा (AHRC) Change The Course : National Report on Sexual Assault and Sexual Harassment at Australian Universities हा अहवाल येण्यापूर्वीची ही घटना आहे.

"मी याबद्दल काहीच केलं नाही आणि मौन बाळगलं, याबद्दल मला स्वतःवरच राग येत होता. आपल्या कुटुंबाची नालस्ती होईल, या भीतीने दक्षिण आशियातील समुदायांतील विद्यार्थी लैगिंक छळाबद्दल जास्त बोलत नाहीत. पण हा अहवाल आल्यानंतर लैंगिक छळांची रोखथांब करणं आणि त्यासाठीची उपलब्ध मदत याबद्दल बरीच जागृती झाली आहे," असं ती म्हणते. रियाचे वडील बऱ्याच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आले. त्यावेळी रिया लहान होती.

AHRC ही ऑस्ट्रेलियातील वैधानिक संस्था आहे. या संस्थेच्या अहवालात दिसून आलं आहे की 2015 किंवा 2016मध्ये विद्यापीठात लैंगिक छळाच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यातील सर्वाधिक म्हणजे 22 टक्के घटना या सार्वजनिक वाहतुकीत झालेल्या आहेत. तसंच 51 टक्के वेळा पीडित लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना ओळखत होतं.

Image copyright Thinkstock

इमिली ली (नाव बदललं आहे) ही मलेशियाची असून ती आंतराष्ट्रीय विद्यार्थिनी आहे. तिने तिचा अनुभव सांगितला.

"मित्रांच्या दबावामुळे मी माझ्या एका मित्राने दिलेलं पार्टीचं निमंत्रण स्वीकारलं. ही पार्टी त्याच्या घरी होती. आम्ही थोडी दारू घेतली. त्यानंतर त्याने माझ्याशी सेक्स करायला सुरुवात केली. ही परिस्थिती कशी हाताळायची हेच मला कळत नव्हतं. हा माझ्यासाठी सांस्कृतिक धक्का होता.

आमच्या देशात लैंगिक शिक्षण दिलं जात नाही आणि अशा प्रकारचा अनुभव मला पूर्वी कधीच आला नव्हता. मलाच माझी लाज वाटू लागली होती आणि मलाच याबद्दल कुणी जबाबदार धरू नये, म्हणून मी हा प्रकार कुणाला सांगितला नाही."

काही दिवसांपूर्वी तिनं ही घटना एका मित्राला सांगितली. हा बलात्कार होता, असं ती म्हणते. "माझी याला संमती नव्हती. जर मला संमतीबद्दल माहिती असती तर मी घडला प्रकार थांबवू शकले असते."

Council of International Students Australia's National Women's च्या अधिकारी बेले लिम म्हणाल्या, "ऑस्ट्रेलिया हा देशा लैंगिकबाबतीत अधिक खुला देश आहे. अशा देशात येत असताना मुलांना लैंगिक संबंधातील संमती याबद्दल सजग करणं हे आपलं कर्तव्य आहे. आशियातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दल जागृकता नसतात, त्यातून ते लैंगिक अत्याचारांना बळी पडतात तसंच त्याबद्दल तक्रार नोंदवायला कमी पडतात.

अशियातून ऑस्ट्रेलियात येणारे विद्यार्थी बऱ्याच वेळा प्रथमच त्यांच्या घरातील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडलेले असतात. नव्या संस्कृतीबद्दल ते अनभिज्ञ असतात, त्यामुळे ते अशा घटनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते.

श्रीलंकेतील देवना सेनानायके म्हणाली, "18 वर्षांची असताना मी मेलबर्न विद्यापीठात प्रवेश घेतला. मद्यसेवनाची संस्कृती, मादक पदार्थांचं सेवन, संमती नसताना कसेही होणारे स्पर्श यातून मी अस्वस्थ झाले होते. आमच्या कँपसमध्ये एकदा चार मुलं नग्नावस्थेत धावत होती. माझ्यासाठी हे अगदी धक्कादायक होतं. सुदैवाने मला काही चांगले मित्र भेटले. पण नव्या देशात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी असणं म्हणजे एकांत जीवन जगावं लागतं."

या अहवालात 39 विद्यापीठांतील 30 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यात असं दिसून आलं की 5.1 टक्के आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ झाल्याचं दिसून आलं आहे.

यातील 1.4 टक्के घटना विद्यापीठांशी संबंधित अस्थापनात घडलेल्या आहेत. पुरुषांशी तुलना करता अशा घटनांत सर्वाधिक त्रास महिलांनाच जास्त होतो, असंही दिसून आलं आहे.

AHRCच्या लैंगिक भेदभाव विभागाच्या आयुक्त केट जेंकिन्स म्हणतात, "अशा प्रसंगी स्थानिक विद्यार्थ्यांना जी मदत उपलब्ध होते ती कशी मिळवायची याची माहिती आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नसते. कामाच्या ठिकाणी जे लैंगिक अत्याचार होतात, अशांनाही हे लोक बळी पडण्याची शक्यता जास्त असते."

विद्यार्थी संघटना, जनजागृती करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांनी अशा प्रकारांची रोखथांब करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असं भूमिका घेतली आहे.

2018मध्ये End Rape on Campus Australia (EROC) या संस्थेकडून अनेक मुलांनी मदत घेतली आहे. त्यातील 5 टक्के मुलं ही दक्षिण आशियातील आहेत.

या संस्थेचे संस्थापक शारना ब्रेमर म्हणतात, "दक्षिण आशियातील मुलं तक्रार करत नाहीत, हे जर लक्षात घेतलं तर ही संख्या फार मोठी आहे, हे लक्षात घेता येईल. विद्यापीठांतून दिली जाणारी माहिती बऱ्याच वेळा अपुरी असते. विद्यार्थ्यांना ते कशाकशा प्रकारे तक्रार करू शकतात याची माहिती नसते. अनेकांना असं वाटतं की तक्रार करणं म्हणजे घरी सांगण. खरंतर घरातूनच तक्रार द्यायला विरोध केला जातो."

Image copyright ENERGYY/GETTY IMAGES

ज्या विद्यार्थांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत त्यातील 87 टक्के आणि ज्यांचा लैंगिक छळ झाला आहे अशांतील 94 टक्के विद्यार्थी विद्यापीठांत तक्रार देत नाहीत, असं या अहवालातून दिसून आलं आहे. व्हिसासंदर्भात काही अडचणी येतील अशीही भीती या विद्यार्थ्यांना वाटत असते.

"जे विद्यार्थी तक्रार करतात, त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते समाधानी नसतात. काही वेळा विद्यापीठांकडून काहीच दखल घेतली जात नाही तर काही वेळा फक्त समुपदेशन केलं जातं किंवा अभ्यासात काही सवलत दिली जाते. पण आरोपी मात्र मोकाटचा राहतात," असं ब्रेमर म्हणाले.

या सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होण्याचं प्रमाण पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा दुपटीने जास्त आहे.

Council of Australian Postgraduate Associations या संस्थेतर्फे अनेक धोरणात्मक उपक्रम हातात घेण्यात आले आहेत. विशेषत: विद्यार्थी पर्यवेक्षक नात्याबद्दल विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष नकाशा अब्राहम सांगतात, "विद्यार्थी नेत्यांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की त्यांनी आपल्यावरच्या अत्याचाराची वाच्यता अधिक प्रमाणात केलेली नाही. आपल्याला येणारा अनुभवाचं नीट अवलोकन न होणं आणि लागणारा काळिमा या दोन गोष्टी यासाठी जबाबदार आहेत."

मेलबर्नमधील Centre for Culture, Ethnicity & Healthच्या सहव्यवस्थापक अॅलिसन कोयल्हो म्हणतात, "अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कँपसवर लैंगिक आरोग्य आणि सुदृढ रिलेशनशिपयाबद्दल सक्तीचं ऑनलाईन प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमात बदलही करता येतील. त्यामध्ये विविध सांस्कृतिक बाबींचीही नोंद घेता येईल."

हा अहवाल आल्यानंतर देशातील विद्यापीठं लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी विविध धोरणांची आखणी करताना दिसत आहेत.

युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅटरिना जॅक्सन म्हणाल्या, "आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आम्ही जास्त प्रमाणावर कार्यक्रम घेतो. त्यात आरोग्य, सामुदपदेश यांचाही समावेश आहे. जी वर्तणूक मान्य होण्यासारखी नाही, त्याबद्दल तक्रार करावी, असंही आम्ही सांगतो. ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर असे दोन वेळा आम्ही हे कार्यक्रम घेतो."

Image copyright Getty Images

मोनॅश युनिव्हर्सिटीतील मास्टर्स ऑफ अॅप्लाईड इकॉनॉमिक्स विषयाची विद्यार्थिनी दीक्षा दहिया दिल्लीतील आहे.

ती सांगते, "या विद्यापीठात Respect at Monash या नावाचा कार्यक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना सामाजिक वागणूक, लैंगिक वर्तणूक, रिलेशनशिप, दारू याबद्दलची माहिती दिली जाते. शिवाय हेल्पलाईनची यादीही दिली जाते. भारतात अनेक विषय निषिद्ध समजले जातात. या उपक्रमाचा मला बराच लाभ झाला आहे, त्यामुळे परदेशात असल्याने जी भीती निर्माण झाली होती ती कमी झाली."

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणातून ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेतील मोठा भाग आहे. 2017मध्ये 6,24,001 इतके पूर्ण फी देणारे विद्यार्थी होते. यात चीनचे विद्यार्थी 2,31,191 म्हणजे 22 टक्के तर 87,615 इतके म्हणजे 11 ट्क्के विद्यार्थी भारतीय होते.

विरोधी लेबर पक्षाच्या उपनेत्या टन्या प्लिबरसेक म्हणाल्या, "विद्यापीठाच्या कँपसवर सुरक्षित राहाण्याचा अनुभव सर्वांना आहे. तो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर लैगिंक अत्याचारांचा सामना करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करू. ते विद्यापीठ आणि निवासी कॉलेजसाठी हे लागू असेल."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)