अमेरिका : '2016 च्या निवडणुकीत ट्रंप यांचे रशियाशी लागेबांधे नव्हते'

ट्रंप Image copyright Getty Images

अमेरिकेत 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाशी लागेबांधे असल्याच्या आरोपांची वकील रॉबर्ट मुलर चौकशी करत होते. मात्र ट्रंप यांचे असे कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.

हा अहवाल अमेरिकेच्या संसदेत रविवारी सादर करण्यात आला. तब्बल दोन वर्षं रॉबर्ट मुलर या अहवालावर काम करत होते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला की नाही या प्रश्नाचं कोणतंही ठोस उत्तर या अहवालात देण्यात आलेलं नाही. तसंच या अहवालात राष्ट्राध्यक्षांना अगदी क्लिन चीटही दिलेली नाही.

अमेरिकेचे अॅटर्नी जनरल विलियम ब्रार यांनी सादर केला. "राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला की नाही हे सिद्ध करणारे फारसे पुरावे नाहीत." असं या अहवालात म्हटलं आहे.

हा अहवाल म्हणजे ट्रंप यांचा विजय समजला जात आहे. हा अहवाल सार्वजनिक होताच ट्रंप यांनी आनंद व्यक्त करणारं एक ट्विट केलं. ते लिहितात, "कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नाहीत. पूर्णपणे दोषमुक्त."

अहवालात काय माहिती आहे?

2016 मध्ये झालेली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर रशियाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. त्यासंबंधी करण्यात आलेल्या चौकशीचा हा अहवाल आहे.

अॅटर्नी जनरल म्हणाले, "कोणत्याही अमेरिकन नागरिकाने, ट्रंप यांच्या प्रचाराशी निगडीत अधिकाऱ्यांनी रशियाशी संधान बांधलं असं कुठेही आढळून आलेलं नाही."

या अहवालाच्या दुसऱ्या भागात न्यायप्रक्रियेत हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे.

अॅटर्नी जनरलने सांगितलं की या अहवालाशी निगडीत पूर्ण माहिती ते लवकरच सार्वजनिक करतील. सध्या काही गोष्टींवर बंदी आहे.

अहवालावर प्रतिक्रिया

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वकील रुडी जुलियानी यांनी हा अहवाल अपेक्षेपेक्षा उत्तम असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितलं की ट्रंप यांना पूर्णपणे दोषमुक्त करण्यात आलं आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जॅरी नॅडलक यांच्या मते हा अहवाल जनतेसमोर ठेवायला हवा. पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे.

त्यांनी दावा केला की हा संगनमताचा प्रकार आहे. ट्रंप यांनी हस्तक्षेप केला या शक्यतेचा अटर्नी जनरलने इन्कार केला नाही. या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)