मत्स्यकन्यांवर 'सेन्सॉर'चा बडगा, शरीर झाकल्याने नवा वाद

मत्स्यकन्या Image copyright AFP/getty

मत्स्यकन्या असोत वा पऱ्या यांना लहान मुलांच्या भावविश्वात एक वेगळं स्थान असतं. लहान मुलांच्या गोष्टींचे विषय बहुतेक वेळा याच पात्रांच्या भोवती फिरतात. पण याच मत्स्यकन्यांमुळे इंडोनेशियात वाद उफाळला आहे.

तब्बल 15 वर्षांपासून थीम पार्कमध्ये असणाऱ्या मत्स्यकन्यांच्या पुतळ्याला कापडाने गुंडाळल्यामुळे या कथित सेन्सॉरशिपवरून इंडोनेशियात नवा वाद निर्माण झाला आहे.

जकार्ता येथे असलेल्या अॅंकोल ड्रीमलॅंड पार्कमध्ये 15 वर्षांपासून मत्स्यकन्यांची दोन शिल्पं आहेत. पार्कच्या व्यवस्थापकांनी त्यांचे स्तन सोनेरी कापडाने गुंडाळले.

पौर्वात्य संस्कृतीची जपणूक करण्याच्या हेतूने आम्ही हे कृत्य केलं असा त्यांनी खुलासा केला आहे पण इंडोनेशियातल्या लोकांना वाटतं की सरकारने दबाव टाकल्यानंतर त्यांच्या शरीराभोवती कापड गुंडाळण्यात आलं आहे.

आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता असं स्पष्टीकरण पार्कचे प्रवक्ते रीका लेस्तारी यांनी दिलं आहे. हे पुतळे झाकण्याचा निर्णय आम्ही गेल्या वर्षीच घेतला आहे. पार्कमध्ये आल्यावर कुटुंबातल्या सदस्यांना आणि लहान मुलांना अवघडल्यासारखं होणार नाही या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले.

पार्कला भेट देणाऱ्या पालकांनी देखील नापंसती दर्शवली आहे. मत्स्यकन्या कधी तुम्ही कापडात गुंडाळलेली पाहिली आहे का? असा सवालच एका पालकाने केला आहे.

पार्कला भेट देण्यासाठी आपल्या मुलांसोबत आलेल्या एका पर्यटकाला बीबीसीने याबाबत विचारले असता नंदा जुलियांदा म्हणाल्या की या शिल्पामुळे आम्हाला काही त्रास होत नव्हता. कलेचा नमुना असा झाकलेला पाहून विचित्रच वाटलं.

त्या मत्स्यकन्या आहेत आणि मत्स्यकन्या कधी अशाप्रकारे कापडाने झाकलेल्या कोणी कधी पाहिल्या आहेत का? असा प्रश्न एम. तौफिक फिकी यांनी विचारला आहे.

ज्यांनी हे शिल्प बनवले आहे ते शिल्पकार डोलोरोसा सिनागा यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांचा सौंदर्य अनुभवण्याचा अधिकारच जणू हिरावून घेतला गेला आहे असं त्यांना वाटतं.

पुतळे अशा प्रकारे वादात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी हे इटलीच्या दौऱ्यावर 2016 मध्ये गेले होते. तेव्हा इटलीतील काही नग्न शिल्प कापडाने झाकण्यात आले होते. इराणच्याच लोकांनीच यावर चिमटे काढले होते. इस्लामला वाचवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असे उपहासात्मक ट्वीट देखील त्यांनी केले होते.

सर्बियामध्ये घुबडाच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला होता. भारतात देखील एका व्यक्तीने मंदिरावरील शिल्पावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याला तुरुंगवास झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)