Brexit : थेरेसा मे म्हणतात... करार मंजूर झाला तर राजीनामा देणार

थेरेसा मे

यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलं आहे की जर ब्रेक्झिटचा करार मंजूर झाला तर त्या राजीनामा देतील.

हुजूर पक्षाच्या खासदारांनी कराराच्या बाजूने मतदान करावं म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे. हुजूर पक्षाचे खासदार, ज्यांना ब्रिटनमध्ये टोरी असंही म्हटलं जातं, त्यांना उद्देशून बोलताना मे म्हणाल्या की, "देशहितासाठी आणि पक्षहितासाठी मी हे पद माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर सोडायला तयार आहे."

मे म्हणाल्या, "टोरी खासदारांची इच्छा नाहीये की पुढच्या टप्प्यातल्या ब्रेक्झिटच्या वाटाघाटी मी कराव्यात, आणि त्यांच्या इच्छेच्या आड मी येणार नाही."

पण डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पार्टी (DUP) ने म्हटलं की मे यांच्या घोषणेमुळे त्यांच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाही आणि ते कराराच्या विरोधातच मतदान करणार.

बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा कुन्सबर्ग यांच्या मते DUP ने कराराला पाठिंबा द्यायला दिलेला नकार हा पंतप्रधानांना मोठा झटका आहे.

करार संमत झाला तर राजीनामा देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर जाहीर केलेल्या निवेदनात DUPच्या नेत्या आर्लिन फॉस्टर म्हणाल्या की ब्रेक्झिटच्या सध्याच्या मसुद्यात काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅकस्टॉप.

बॅकस्टॉप म्हणजे नॉदर्न आर्यलंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंडच्या सीमारेषेवर तात्पुरत्या स्वरूपाची जकात व्यवस्था तयार करणे. जेणे करून आयरिश बॉर्डरवर चेक-पॉईंट्स उभारावे लागू नयेत.

याच मुद्द्यावर पुढे बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "या कलमामुळे युकेचं सार्वभौमत्व धोक्यात येणार आहे आणि म्हणूनच आमचा पक्ष अशा मसुद्याला कधीही संमती देणार नाही."

प्रतिमा मथळा DUPच्या नेत्या आर्लिन फॉस्टर

संसदेने मे यांच्या कराराला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा जस्टिस सेक्रेटरी डेव्हिड गॉक यांनी व्यक्त केली. "त्या दिशेने जनमतही तयार होतंय असं मला वाटतं," ते पुढे म्हणाले.

दुसऱ्या बाजूला युरोपियन रिसर्च ग्रुपचे अध्यक्ष स्टीव्ह बेकर यांनी मे यांच्या घोषणेबद्दल नाराजी व्यक्त केली. थेरेसा मे यांनी करार संमत झाला तर पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची घोषणा जरी केली असली तरी त्या नक्की कधी राजीनामा देतील याबाबत साशंकता आहे.

पण जर करार मंजूर झाला तर मे पक्षानेता पदाचा राजीनामा 22 मे (ब्रेक्झिटची तारीख) नंतर देतील पण पुढचा नेता निवडला जाईपर्यंत पंतप्रधान पदावर कायम राहतील.

पंतप्रधान कार्यालयातल्या जाणकारांच्या मते संसदेने ब्रेक्झिट करार नामंजूर केला तर मात्र या सगळ्या गोष्टींना वेगळी कलाटणी मिळेल.

करार नामंजूर झाला तरी मे राजीनामा देतील की नाही हे त्यांनी स्पष्ट केलं नाही पण काहीही झालं तरी मे यांनी पंतप्रधान म्हणून कार्यरत राहणं कठीण आहे, लॉरा कुन्सबर्ग स्पष्ट करतात.

"मे यांनी राजीनामा दिलाच तर त्यांची ही इच्छा नक्कीच असणार की त्या पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडतील तेव्हा त्या यूकेलाही युरोपियन युनियनमधून अलगद बाहेर काढतील. जुलैच्या मध्यापर्यंत नवीन पंतप्रधान येतील अशी शक्यता आहे," लॉरा म्हणतात.

टोरी खासदारांच्या बैठकीत मे यांनी खासदारांना आवाहन केलं की "बेक्झिट करार आपल्या मंजूर करून त्यावर अंमल करायचाय. ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला व्यवस्थित पार पाडायची आहे."

Image copyright Getty Images

मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी मे यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना ट्वीट केलं की, "मे यांची घोषणा हे स्पष्ट करते की त्यांच्या अत्यंत गोंधळाच्या ब्रेक्झिटच्या वाटाघाटी या त्यांच्या पक्षाच्या हिताचा होत्या, त्याच्या तत्वांचा किंवा जनतेच्या हिताशी काहीही संबंध नव्हता."

जर सरकार बदलायचं असेल तर तो जनतेचा निर्णय असायला हवा, पक्षाच्या अंतर्गत घडामोडींशी त्याचा संबंध नसावा, असंही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांचे माजी धोरण सल्लागार जॉर्ज फ्रीमन म्हणाले की पदावरून पायउतार होण्याची घोषणा करून मे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. "ही दुःखद गोष्ट आहे की त्या राजीनामा देतील पण त्या जे करत आहेत ते बरोबरच आहे."

संसदेत पुन्हा मांडण्यासाठी कराराच्या मसुद्यात मोठा बदल हवा

मे यांनी स्पष्ट केलं की त्या या आठवड्यात ब्रेक्झिट करार संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) पुन्हा मांडतील. या आधी हा करार दोन वेळा संसदेत मांडला गेला होता आणि दोन्ही वेळा मोठ्या फरकाने तो नामंजूर झाला होता.

कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष जॉन बार्लो यांनी म्हटलं आहे या करार पुन्हा मांडण्यासाठी कराराच्या मसुद्यात मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची गरज आहे, तरच हा करार सभागृहात पुन्हा मांडता येईल.

आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेऊ नये असाही इशाराही त्यांनी मंत्र्यांना दिला.

Image copyright Getty Images

पण पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या आठवड्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीतनंतर काही महत्त्वाचे बदल ब्रेक्झिट मसुद्यात झाले आहेत.

हुजूर पक्षाचा नवा नेता कसा निवडला जाईल

मे यांच्या नेतृत्वाखाली यूके युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर नवा नेता निवडण्यासाठी निवडणूक होईल.

ही निवडणूक कधी घ्यायची हे हुजूर पक्ष ठरवेल.

थेरेसा मे नवा नेता निवडला जाईपर्यंत पंतप्रधान पदावर काम राहातील.

इच्छुक उमेदवाराला दोन खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे.

जर एकच उमेदवार असला तर त्याची पक्षनेता म्हणून बिनविरोध निवड होईल.

दोनपेक्षा जास्त उमेदवार असले तर प्राथमिक मतदानातून दोन उमेदवार निश्चित केले जातील.

या दोन उमेदवारांधून मग एक नेता निवडला जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)