Mission Shakti : भारताच्या मिशन शक्ती नंतर अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाकिस्तान कुठे आहे?

क्षेपणास्त्र Image copyright Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घोषणा केली की भारत हा अंतराळ महाशक्ती बनला आहे. अॅंटी सॅटेलाइट मिसाइल क्लबमध्ये भारताचा समावेश झाला असल्याचं घोषित केलं.

भारताने उचललेल्या पावलाचे पडसाद पाकिस्तानमध्ये देखील पडले आहेत. जर पाकिस्तानला भारताशी अवकाश तंत्रज्ञानात स्पर्धा करायची असेल तर त्यांची सद्यस्थिती काय आहे? याचा पाकिस्तानचे पत्रकार हारून रशीद यांनी घेतलेला आढावा.

मोदींच्या घोषणेनंतर असं म्हटलं जात आहे की भारतापासून पाकिस्तान किंवा अन्य शेजारी राष्ट्रांना धोका निर्माण होऊ शकतो. मोदींनी हे स्पष्ट केलं आहे की या चाचणीमुळे इतर कुणालाही धोका निर्माण होणार नाही. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करूनच ही चाचणी घेण्यात आल्याचं मोदी म्हणाले.

"पाकिस्तानने अंतराळ विज्ञानासंबंधित आतापर्यंत जे काही कार्यक्रम पार पाडले आहेत ते सर्व शांतीपूर्ण उद्दिष्टासाठीच आहेत अशीच भूमिका मांडली आहे. पण भारताच्या घोषणेनंतर पाकिस्तानदेखील अवकाशातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत खेचला जाऊ शकतो असं पाकिस्तानच्या तज्ज्ञांना वाटतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीनच्या साहाय्याने पाकिस्तानने सॅटेलाइट अवकाशात सोडले होते.

भारताने अप्रत्यक्षरीत्या हा संदश दिला आहे की जर अवकाशात युद्ध झालं तर त्यासाठी भारत सज्ज आहे, असं पाकिस्तानच्या विश्लेषकांना वाटतं.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा अवकाश कार्यक्रम अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आहे, पण भारताने या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर पाकिस्तानला देखील विचार करावा लागेल.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या बिकट अवस्थेत आहे तेव्हा तंत्रज्ञानाच्या या स्पर्धेत पाकिस्तान वेगळी रक्कम बाजूला काढू शकेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपलं मत मांडलं आहे. अवकाशातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेच्या आपण विरोधात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुळात हा प्रश्न आहे की या स्पर्धेत उतरण्यासाठी त्यांची क्षमता आहे की नाही?

Image copyright Getty Images

पाकिस्तानच्या एका विश्लेषकाचं असं मत आहे की अवकाश हे मनुष्य जातीचा संयुक्त वारसा आहे. त्यामुळे आपण अवकाशाच्या शस्त्रास्त्र स्पर्धेपासून दूर राहायला हवं.

अंतराळातली शांतता भंग पावू नये या दृष्टीने संयुक्त राष्ट्रातील नियमांना बळकटी मिळायला हवी यावर देखील विचार व्हावा असं या विश्लेषकाला वाटतं.

पाकिस्तानचा अवकाश संशोधनाचा कार्यक्रम 1961मध्ये सुरू झाला. या कार्यक्रमासाठी पाकिस्तान स्पेस अॅंड अॅटमॉसफिअर रिसर्च कमिशनची (सुपरको) स्थापना झाली. या संस्थेचं उद्दिष्ट शांतिपूर्ण संशोधन करणं हेच आहे.

या संस्थेने चीनची मदत घेऊन सॅटेलाइट अंतराळात सोडले आहेत. 2011 ते 2040 या काळात पाच सॅटेलाइट अंतराळात सोडण्याची या संस्थेची योजना आहे. या योजनेला तत्कालीन पंतप्रधान सैय्यद युसुफ रझा गिलानी यांनी परवानगी दिली होती.

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते या सॅटेलाइटचा वापर भूगर्भ शास्त्र, पर्यावरण, माहिती आणि दूरसंचार आणि कृषी या क्षेत्रांमध्ये कार्य करणं असेल.

विश्लेषकांना वाटतं की विकासाच्या क्षेत्रात काम करण्याबरोबरच संरक्षणाच्या दृष्टीने माहिती गोळा करणं हा देखील या सॅटेलाइटचा उद्देश असू शकतो. पण अद्याप पाकिस्ताननं अवकाशात कोणतंही क्षेपणास्त्र सोडलेलं नाही किंवा अंतराळात मारा करू शकेल, असं मिसाइल बनवलेलं देखील नाही.

पाकिस्तानने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात भारताचा उल्लेख नाही. पण त्यांचा रोख भारताकडेच होता.

भारताने उचललेल्या पावलाची आपल्याला चिंता करायची गरज नाही हे पाकिस्तानला नाही तर चीनला डोळ्यासमोर ठेऊन केलं असावं असं पाकिस्तानचे विश्लेषक समजतात.

पण अवकाश तंत्रज्ञानात 'शेजारी शत्रू' शक्तिशाली बनत असेल तर पाकिस्तानने देखील मागे राहता कामा नये असं वाटणारा देखील एक गट आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)