डायनासोर नष्ट करणाऱ्या महाविध्वंसाचे पुरावे सापडले

डायनोसर Image copyright Getty Images

6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या मोठ्या अशनीमुळे डायनासोर आणि इतर अनेक जीव नष्ट झाले. या महाविध्वंसाचे आणखी काही पुरावे मिळवण्यात संशोधकांना यश आलं आहे. हा विध्वंस किती महाकाय होता, याची झलक या पुराव्यांतून दिसून येतं.

उत्तर डकोटा भागात शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननातून यासंबंधीचे पुरावे हाती लागले आहेत. इथं सापडलेल्या माशांच्या आणि झाडांच्या जीवाश्मात त्या विध्वंसातून आकाशात उडालेले दगडांचे तुकडे आणि इतर काही चमकदार पदार्थ सापडले आहेत. या जीवाश्मात पाण्याचे अंशही मिळाले आहेत. अशनी कोसळल्यानंतर समुद्राच्या पातळीत वाढ झाली होती, त्याचं हे निदर्शक आहे.

PNAS या जर्नलमध्ये यावरील शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कन्सासमधील संशोधक रॉबर्ट डेपाल्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. टॅनिस या भागात हे उत्खनन झालं आहे. हा अशनी कोसळल्यानंतर पुढील काही मिनिटं किंवा काही तास काय घडलं असेल याची झलक या उत्खननातून दिसून येते.

आता ज्या भागाला गल्फ मेक्सिको म्हटलं जातं त्या भागात हा 12 किलोमीटर लांबीचा अशनी कोसळला होता. हा आघात इतका मोठा होता की त्यातून अब्जावधी टन वितळलेले आणि बाष्प रूपातील खडक हजारो किलोमीटर दूरवर अवकाशात विखुरले गेले.

टॅनिसमध्ये जे जीवाश्म सापडले आहेत, त्यात मण्यांच्या आकाराचे पदार्थ सापडले आहेत. हे पदार्थ या विध्वसांवेळी पृथ्वीवर पडले होते. हे मणी बंदुकीतून झाडलेल्या गोळ्यांसारखे कोसळले होते.

Image copyright ROBERT DEPALMA
प्रतिमा मथळा या आघातानंतर ज्या लहरी निर्माण झाल्या त्यातून पाण्याची पातळी वाढली. याला Seiche म्हणतात.

इथं माशांच्या जीवाश्मात राख सापडली आहे. या माशांच्या कल्ल्यात राखेचे अवशेष सापडले आहेत. झाडांच्या जीवाश्मातील रेझिन्समध्य हे जीवाश्म सुरक्षित राहिले आहेत. जिओकेमिस्टनी या मटेरिअलचा संबंध मेक्सिकोतील त्या साईटशी जोडला आहे. या उत्खननात सापडलेल्या जीवाश्मांचा कालखंड 6.57 कोटी वर्षं इतका दाखवण्यात आला आहे.

ज्या पद्धतीने या जीवाश्मांची रचना झाली आहे, ते पाहता हा भाग पाण्यात बुडला असावा, असा निष्कर्ष निघतो.

या आघातानंतर त्सुनामी उसळली होती. पण गल्फ ऑफ मेक्सिकोपासून 3000 किलोमीटरवर असलेल्या उत्तर डकोटा भागात ही त्सुनामी पोहोचण्यासाठी बरेच तास लागले असतील, असा कयास आहे.

Image copyright ROBERT DEPALMA
प्रतिमा मथळा रॉबर्ट डेपाल्म उत्खनन करताना.

यातून जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून जगभरात पाण्याच्या पातळीत मोठी हालचाल निर्माण झाली असावी. भूगर्भात निर्माण झालेल्या या तरंगांची तीव्रता 10 ते 11 भूकंपांइतकी तीव्र होती. या तडाख्यात जे काही सापडलं ते एकत्रित ढिगाऱ्यासारखं जमा झालं असावं. त्यात झाडं, पृथ्वीवरील प्राणी, मासे आणि इतरही बऱ्याच घटकांचा समावेश आहे. तेच या उत्खनानतून दिसून आलं आहे, असं डेपाल्म यांनी सांगितलं.

भूकंपाच्या लहरी या भागात आघातानंतर काही मिनिटांत पोहोचल्या असतील. त्यानंतर 17 तासांनी त्सुनामीच्या लाटा इथं थडकल्या, असं ते म्हणाले.

प्रतिमा मथळा गल्फ ऑफ मेक्सिकोवर आदळलेल्या या अशनीने डायनासोर संपवले.

या रिसर्च पेपरच्या संशोधकांत वॉल्टर अल्वरेझ यांचाही समावेश आहे. ते कॅलिफोर्नियातील भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. वॉल्टर आणि त्यांचे वडील लुईस यांनी डायनोसोरच्या लुप्त होण्यामागची ही 'इम्पॅक्ट थेअरी' मांडली होती. त्यांनी क्रिटॅशिअस आणि पॅलिजीन या भूगर्भीय युगांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर युरेडियम शोधलं. हे मूलद्रव्य अशनींमध्ये असते. टॅनिस इथल्या जिवाश्मांतही हे मूलद्रव्य सापडलं आहे.

वॉल्टर म्हणाले, "आम्ही युरेडियमच्या आधारावर ही संकल्पना मांडली होती. पण या आघातमुळे निर्माण झालेली अशी एखादी दफनभूमी म्हणता येईल, अशी जागा सापडेल असं वाटलं नव्हतं."

पृथ्वीवर कोसळलेल्या हा अशनीमुळे जी घळई निर्माण झाली त्याला The Chicxulub Crater असं नावं दिलं आहे. याचा परीघ जवळपास 100 किलोमीटर आणि खोली 30 किलोमीटर होता. त्यानंतर हे कोसळत गेलं आणि त्यांचा परीघ 200 किलोमीटर झाला. ही घळई आता 600 मीटर खोलवर चुनखडकाखाली दडली आहे, पण संशोधकांनी याची कडा शोधली आहे. याचं स्वरूप कसं आहे हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी याला खोलवर छिद्रही पाडलं आहे. ज्या ज्या ठिकाणी हे लाईमस्टोन कमकुवत आहेत, तिथं सिंकहोल तयार झाले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)