BREXIT : यूकेचा स्वातंत्र्य दिवस, जो कधी उगवलाच नाही

दोन वर्षापूर्वी थेरेसा मे यांनी युरोपियन युनियनला अधिकृत रितीने सांगितलं होतं की यूके बाहेर पडत आहे. Image copyright Reuters
प्रतिमा मथळा दोन वर्षापूर्वी थेरेसा मे यांनी युरोपियन युनियनला अधिकृत रितीने सांगितलं होतं की यूके बाहेर पडत आहे.

ब्रेक्झिटला पाठिंबा देणाऱ्या लोकांसाठी 29 मार्च विजयी दिवस ठरणार होता. असा दिवस जेव्हा यूके युरोपियन युनियनच्या जोखडातून मुक्त झाला असता. पण झालं भलतंच! सरकारच्या ब्रेक्झिट कराराचा मसुदा तिसऱ्यांदा फेटाळाला गेला.

काही ज्येष्ठ ब्रेक्झिट पाठिराख्या राजकारण्यांना मात्र खात्री होती, यूके युरोपिय युनियनला गुडघ्यांवर आणणार याची.

"आपली बाजारपेठ त्यांच्यासाठी (युरोपियन युनियनसाठी) खूप महत्त्वाची आहे. आपल्यावर बहिष्कार टाकणं त्यांना परवडणारं नाही," डेव्हिड डेव्हिस, जे नंतर वर्षभर यूके सरकारात ब्रेक्झिट मंत्री होते, म्हणाले होते.

"ज्या दिवशी करार मंजूर होईल, त्या दिवशी मर्सिडिज, फोक्सवॅगन आणि बीएमडब्लूचे सीईओ जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्कल यांच्या दारावर धडका मारून मागणी करतील की जर्मन लोकांना किंवा कंपन्यांना यूकेमध्ये व्यापार करायला बंदी नको," ते पुढे म्हणाले होते.

पण सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे.

युरोपियन युनियनच्या वतीने वाटाघाटी करणाऱ्यांना असं अजिबात वाटत नाही की या प्रकारात सगळे पत्ते यूकेच्या हातात आहेत.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा ब्रेक्झिटच्या पाठीराख्यांना वाटत होतं की यूरोपियन यूनियन यूकेवर फार बंधन लादू शकणार नाही.

उलट युरोपियन युनियन आपल्या नागरिकांना यूकेमध्ये मुक्त संचार करता आला नाही तर यूकेवर व्यापारी निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत. आणि इतर देशांच्या नागरिकांना आपल्या देशात असा मुक्त संचार करू देणं ब्रेक्झटच्या पाठीराख्यांना अजिबात मान्य नाही.

प्रोजेक्ट फिअर

पण जसा ब्रेक्झिटच्या पाठिराख्यांना धक्का बसला आहे तसा विरोधकांनाही. त्यांनाही भविष्यात काय होईल याचा नीट अंदाज आलेला नव्हता.

ब्रेक्झिटचे विरोधक म्हणत होते की युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याचा यूकेला मोठा फटका बसू शकतो. तत्कालीन हंगामी पंतप्रधान जॉर्ज ऑस्बॉर्न यांनी म्हटलं होतं की, "ब्रेक्झिटमुळे बेरोजगारी वाढेल, 5 लाख लोक बेरोजगार होतील, जीडीपी 3.6 टक्क्यांनी घसरेल आणि सरासरी वेतनपण कमी होईल."

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी ब्रेक्झिटला 'आत्मघाती पर्याय' असं म्हटलं होतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डेव्हिड कॅमरून

पण यूकेमध्ये तशी फार उलथापालथ झालेली दिसत नाही. तिथली अर्थव्यवस्था ढासळली नाहीये आणि 'प्रोजक्ट फिअर' असं ज्याचं वर्णन केलं होतं अशी परिस्थिती आलेली नाही.

ह्याउलट, सध्याचा यूकेचा बेरोजगारीचा दर 1975 पासून सर्वात कमी आहे. अर्थव्यवस्थेची वाढ जर्मनी, फ्रान्स आणि इटलीपेक्षा वेगाने होत आहे.

म्हणजेच काय तर, ब्रेक्झिट होणार याचा न युरोपियन युनियनवर फार प्रभाव पडला ना यूकेच्या अर्थव्यवस्थेवर.

जो काही गोंधळ दिसतोय तो वेस्टमिनस्टरमध्ये राजकीय पटलावर, बाकी लोक आपआपलं आयुष्य सुरळीत जगत आहेत.

निकाल दृष्टीक्षेपात नाही

व्यापार आणि नागरिकांना असलेला मुक्त संचाराचा हक्क यावरून ब्रेक्झिटचा करार रखडला आहे. बॅकस्टॉपच्या मुद्दयांवरून ताणाताणी सुरु आहे. बॅकस्टॉप म्हणजे नॉदर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आर्यलंडच्या सीमारेषेवर तात्पुरत्या स्वरूपाची जकात व्यवस्था तयार करणे. जेणेकरून आयरिश बॉर्डरवर चेक-पॉईंट्स उभारावे लागू नयेत.

Image copyright Getty Images

ब्रेक्झिटच्या कट्टर पाठिराख्यांमुळेच यूकेला युरोपियन युनियनमधून बाहेर पडायला उशीर होत आहे. ब्रेक्झिटचा करार पुन्हा मांडण्याची तारीख आहे 12 एप्रिल. पण पुढे काय होईल हे अजून नक्की नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या