एका आजाराने संपवल्या प्राण्यांच्या 90 जाती

बेडकाची एक प्रजाती Image copyright JONATHAN E. KOLBY, HONDURAS AMPHIBIAN RESCUE & CON
प्रतिमा मथळा Duellmanohyla soralia जातीचं बेडूक

पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासात पाच घटना अशा घडल्या आहेत ज्यात अनेक जीव सामूहिकरीत्या नष्ट झाले. पण संशोधकांचं असं म्हणणं आहे, की गेल्या साठ वर्षांत एका कवकजन्य आजारामुळे पृथ्वीच्या पाठीवरील उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्या 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

एखाद्या आजारामुळे निसर्गावर झालेला आणि कागदोपत्री नोंद झालेला हा सर्वांत मोठा आघात आहे, असा संशोधकांचा दावा आहे.

आता भविष्यात अधिक नुकसान टाळण्यासाठी जैव सुरक्षेवर लक्ष देणं आणि प्राण्यांची बेकायदेशीर विक्री यावर तातडीने निर्बंध लादणं आवश्यक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

या आजाराचं नाव Chytridiomycosis असं आहे. गेल्या 50 वर्षांत अनेक बेडूक, टोड, सलमँडर यामुळे मारले गेले. यामध्ये किमान 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं दिसून आलं आहे.

ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या तीन प्रदेशांत या आजाराचा सर्वांत मोठा फटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधक बेन शिली म्हणाले, "हा आणि इतर काही अत्यंत संसर्गजन्य आजारांमुळे आपण काही फारच सुंदर प्रजाती गमावल्या आहेत." "सामूहिकपणे प्रजाती नष्ट होण्याची ही पृथ्वीच्या इतिहासातील सहावी घटना आहे," असंही ते म्हणाले.

3 दशकांपूर्वी संशोधकांना असं लक्षात आलं, की काही उभयचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. यासाठी एक कवक जबाबदार असल्याचं त्यांना दिसून आलं. Batrachochytrium dendrobatidis असं या कवकाचं नाव आहे. हा आजार त्वचेवर होतो आणि अक्षरशः त्या प्राण्याला खाऊन टाकतो.

Image copyright SPL
प्रतिमा मथळा आजार झालेला बेडूक

Science या जर्नलमध्ये या आजाराचा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. त्यात खालील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.

1. उभयचर वर्गातील 501 प्रजाती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण उभयचरांच्या ज्ञात प्रजातींच्या 6.5 टक्के इतकं आहे.

2. 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं गृहीत धरण्यात आलं आहे.

3. अनेक प्रजातींत कवक हे मुख्य कारण असलं तरी जोडीनंच पर्यावरण बदलं, अधिवास नष्ट होणं, शिकार अशीही काही कारणं आहेत.

संशोधकांनी म्हटलं आहे जागतिकीकरण आणि प्राण्यांच्या होत असलेल्या व्यापारामुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला.

बेन म्हणाले, "माणसं वनस्पती आणि प्राणी जगभर घेऊन जातात, त्यातून हा आजार वेगाने पसरत चालला आहे. ज्या भागांत हा आजार नव्हता, तिथंही हा आजार पसरला."

Image copyright IGNACIO DE LA RIVA, MUSEO NACIONAL DE CIENCIAS NAT
प्रतिमा मथळा Telmatobius sanborni जातीचा नर बेडूक

कॅनडातील 2 तज्ज्ञांनी या कवकामुळे उभयचर प्राण्यांची स्थिती आणखी बिघडली असल्याचं म्हटलं आहे.

सिमॉन फ्रेजर युनिव्हर्सिटीचे डॅन ग्रीनबर्ग आणि वेंडी पॅलन म्हणाले, "असं असलं तरी अधिवास नष्ट होण्यामुळे हजारो प्राण्यांच्या जाती संकटात आहेत. अधिवासांचं जतन करा, प्राण्यांच्या व्यापारावर कडक निर्बंध आणा आणि जंगलातील प्राणी पकडण्यावर निर्बंध लावा."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)