अॅन्टोनिओ कॅड्रेव्हा: स्टार फुटबॉलर ज्याने शाळकरी मुलीच्या जेवणाचा खर्च उचलला

अॅन्टोनिओ कॅड्रेव्हा Image copyright AFP

इंटर मिलान फुटबॉल क्लबचा स्टार फुटबॉलर अॅन्टोनिओ कॅड्रेव्हा याने एका शाळकरी मुलीच्या जेवणाचा खर्च उचलेला आहे.

इटलीतल्या व्हर्नोना शहराजवळ असणाऱ्या मिनर्बे गावात एका प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या या मुलीला शाळेच्या जेवणाचे पैसे न भरल्याने नेहमीच्या जेवणाऐवजी ट्यूना मासा आणि क्रॅकर (एक प्रकारचं खारं बिस्किट) जेवायला दिलं होतं.

ही मुलगी एका स्थलांतरित गरीब कुटुंबातली आहे.

आपल्याला दिलेलं जेवण पाहून त्या मुलीला अश्रू आवरले नाहीत असं इटालियन मीडियाने दिलेल्या बातम्यामध्ये म्हटलं होतं.

"मी त्या मुलीच्या पालकांना तिच्या रोजच्या जेवणाची जी फी असेल ती भरण्यात मदत करू इच्छितो," असं अॅन्टोनिओ यांनी मिनर्बेचे महापौर आंद्रेया गिराडी यांना सांगितलं. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला कारण आंद्रेया हे स्थलांतरितांच्या विरोधात आहेत.

आंद्रेयांचं म्हणणं होतं की त्या शाळकरी मुलीला फक्त डबाबंद ट्यूना मासा आणि क्रॅकर देण्याचं कारण कॅन्टिनची फी भरणाऱ्या इतर पालकांना असं वाटू नये की इथे काही मुलांना फी न भरता जेवण दिलं जातं, हे होतं.

पण इटलीच्या सेंटर-लेफ्ट डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र शाळा प्रशासनावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार शाळेत इतर मुलांना पास्ता तसंच इतर गोष्टी खायला दिल्या तर या मुलीला फक्त डबाबंद ट्यूना मासा आणि क्रॅकर खायला दिले.

ही बातमी इटालियन सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि असं समोर आलं की अनेक गरीब स्थलांतरितांच्या मुलांना अशी वागणूक शाळांकडून दिली गेलेली आहे.

ला रिपब्लिका नावाच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनेकदा शाळेतल्या शिक्षकांनी त्यांचा डबा अशा मुलांना दिला आहे जे शाळांच्या कॅन्टिनची फी भरू शकत नाहीत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्यूना आणि क्रॅकर

कोरियारे डेल्ला सेरा या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आंद्रेया गिराडी यांनी म्हटलं होतं की "नाजूक आर्थिक परिस्थिती असणाऱ्या 30 कुटुंबांना आम्ही मदत करत आहोत. आमच्याकडे अनेक गरीब घरांमधून मुलं येतात पण प्रत्येकाला आम्ही पूर्ण जेवण देऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांनी कॅन्टीन फी भरली नाही अशा मुलांना काय खायला द्यायचं याविषयी काही गोष्टी आम्ही ठरवल्या आहेत."

काही मुलांना इतरांपेक्षा वेगळं जेवायला द्यावं असं आम्हालाही वाटत नाही पण आमची मजबुरी आहे. आम्ही सगळ्या मुलांना सगळंच खायला द्यायचं म्हटलं तर जे कॅन्टिनची फी भरतात अशा मुलांनाही आम्ही अन्न देऊ शकणार नाही.

मिनर्बेच्या लोकप्रतिनिधींनी मात्र, "एका लहान शाळकरी मुलीचा तुम्ही अपमान करता कारण तिचे आई-वडील फी भरू शकले नाहीत, हा कुठला न्याय आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)