Notre-Dame : 80 राजांचा राज्याभिषेक, फ्रेंच राज्यक्रांतीची साक्षीदार असलेली ऐतिहासिक इमारत

कॅथेड्रलला लागलेली आग Image copyright Reuters

पॅरिसमधल्या सीन नदीच्या काठावर बांधलेल्या नोत्र दाम कॅथेड्रलवरील आगीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेला मनोरा कोसळताना पाहणं प्रत्येक फ्रेंच व्यक्तिसाठी वेदनादायी होतं.

मंगळवारी पहाटे या चर्चला आग लागली आणि पाहता पाहता या आगीनं संपूर्ण चर्चला वेढून टाकलं. चर्चची धुमसती इमारत पाहताना केवळ फ्रान्सच नाही तर जगभरातील लोक हळहळले.

खरं तर हे चर्च ना जगातलं सर्वांत उंच चर्च आहे, ना सगळ्यांत मोठं चर्च! तरीही या चर्चची स्वतःची अशी खास वैशिष्ट्यं आहेत.

Image copyright AFP

850 वर्षे जुनं असलेलं कॅथेड्रल नोत्र दाम फ्रान्सचा ऐतिहासिक वारसा सांगतं. या चर्चनं 80 राजांचा राज्याभिषेक, दोन साम्राज्यांचा विस्तार, फ्रेंच राज्यक्रांती, जागतिक महायुद्धं असं बरंच काही अनुभवलं आणि सोसलं आहे.

हे चर्च 13 व्या शतकात बांधण्यात आलं होतं. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस नोत्र दाम कॅथेड्रलची प्रचंड नासधूस झाली होती.

'वर लेडी ऑफ पॅरिस'

'अवर लेडी ऑफ पॅरिस' या नावानं प्रसिद्ध असलेल्या या चर्चचं बांधकाम 1163 मध्ये सुरू झालं होतं. हे चर्च बांधायला 180 वर्षं लागली.

या चर्चच्या साक्षीनंच 1431 मध्ये दहा वर्षांचा आजारी किंग हेन्री सहावा फ्रान्सच्या गादीवर बसला. जगाला समता, बंधुता, एकता ही मूल्यं देणारी 1789 ची फ्रेंच राज्यक्रांतीही नोत्र-दामनं अनुभवली. फ्रेंच क्रांतीच्या वेळेस चर्चचं खूप नुकसान झालं. धर्मगुरूंना विरोध करणाऱ्या काही गटांनी या चर्चमधील संतांचे पुतळे छिन्नविछिन्न केले.

Image copyright AFP

1804 मध्ये नेपोलियननं फ्रान्सची सत्ता हस्तगत केली, तीदेखील नोत्र दामच्याच साक्षीनं. आणि 1944 साली फ्रान्सच्या स्वातंत्र्याच्या घंटाही नोत्र दाममधूनच निनादल्या.

नोत्र दाम कॅथेड्रल हे जणूकाही फ्रान्सची ओळख आहे. याबाबतीत नोत्र दामची स्पर्धा आयफेल टॉवरशी आहे. पण नोत्र दामचा हा स्पर्धक वयानं त्याच्यापेक्षा फारचं लहान आहे. आयफेल टॉवर शतकभरापूर्वीच उभारण्यात आला होता. त्यामुळं नोत्र दाम हे फ्रेंच लोकांसाठी नेहमीच खास राहणार.

नोत्र दामची वैशिष्ट्यं

या चर्चचं बांधकाम गॉथिक शैलीतलं आहे.

Image copyright AFP

चर्चच्या तीन 'रोझ विंडोज' या तेराव्या शतकात बांधलेल्या आहेत. त्यांपैकी या आगीतून एखादी तरी खिडकी वाचली आहे का, हे अजून तरी समजलेलं नाही.

या खिडक्यांमधली पहिली आणि सर्वांत छोटी खिडकी ही 1225 च्या सुमारास बांधण्यात आली होती. ही खिडकी पश्चिम दिशेला आहे.

दक्षिण रोझ विंडोचा व्यास हा जवळपास १३ मीटर इतका आहे. मात्र या खिडकीवरील मूळ काचा चर्चला यापूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यामुळे बदलण्यात आल्या होत्या.

संगीत हे या चर्चचा अविभाज्य भाग आहे. इथे अनेक संगीतविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. पण त्याशिवाय या चर्चमधल्या नादही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

या चर्चमध्ये एकूण दहा घंटा आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक घंटेला एका संताचं नाव देण्यात आलं आहे. या चर्चमधील सर्वांत मोठी घंटा ही दक्षिण दिशेच्या टॉवरमध्ये आहे. या घंटेचं नाव आहे, इमॅन्युएल आणि तिचं वजन आहे तब्बल २३ टन. १६८५ मध्ये ही घंटा कॅथेड्रल नोत्र दाममध्ये बसविण्यात आली होती.

Image copyright AFP

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस या घंटा वितळवून त्याचे तोफगोळे बनविण्यात आले होते. मात्र त्यानंतर या घंटाची पुननिर्मिती करण्यात आली. या नवीन घंटा इजिप्शियन पद्धतीनं घडविण्यात आल्या.

लेखक व्हिक्टर ह्युगोची प्रसिद्ध कादंबरी The Hunchback of Notre-Dame चं कथानकात कॅथेड्रल आणि इथल्या घंटांची महत्त्वाची 'भूमिका' होती. या कादंबरीच्या नायकाला कॅथेड्रल नोत्र दाममध्ये आसरा मिळतो आणि घंटा वाजविण्याचं कामही.

आगीमध्ये कोसळलेला नोत्र-दामचा प्रसिद्ध मनोरा हा 12 व्या शतकातला आहे. इमारतीच्या एकूण इतिहासामध्ये या मनोऱ्यातही अनेक बदल केले गेले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस हा मनोरा पूर्णपणे पाडण्यात आला. त्यानंतर 1860 मध्ये तो पुन्हा बांधण्यात आला.

हा मनोरा आता पुन्हा कोसळला आहे. या नुकसानाबद्दल बोलताना ब्रिटीश वास्तुविशारदांनी म्हटलं, की नोत्र दामचं छत, मनोरा आणि दगडी कमानीचं झालेलं नुकसान हे भरून येण्यासारखं नाहीये. फ्रेंच गॉथिक शैलीच्या वारशाची ही हानी आहे. आमच्या संवेदना फ्रेंच नागरिक आणि वास्तुकलेवर प्रेम करणाऱ्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)