नोत्र दाम : भीषण आग आणि पहिल्या 15 ते 30 मिनिटांचा थरार

नोत्र दाम

फोटो स्रोत, Reuters

850 वर्ष जुनी ती इमारत आगीत भस्मसात होत असताना अख्खं पॅरिस डोळ्यात पाणी आणून तो विनाश हताशपणे पाहात होतं. ती इमारत कुणाचं घर नव्हती पण लाखो लोकांचं ते आस्थेचं केंद्र होतं आणि शहराची ओळखही. पॅरिसचं सुप्रसिद्ध नोत्र दाम कॅथेड्रल मंगळवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.

एका लहान ठिणगीनं हे सगळं सुरू झालं आणि बघता बघता सगळी इमारत धुरानं झाकोळून गेली. जितक्या वेगानं आग पसरली तितक्याच वेगानं अग्नीशमन दलानंही ती विझवण्यासाठी प्रयत्न केले.

शहरातल्या सर्वात मोठ्या प्रार्थनास्थळाला वाचवण्याच्या दरम्यान पहिली 15 ते 30 मिनिटं खूप महत्त्वाची होती.

फ्रान्सच्या उप-गृहमंत्र्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचं कौतुक केलंय. ते म्हणाले की, जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नोत्र दाम वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

"केवळ जवानांच्या शौर्यामुळेच प्रार्थनास्थळाचे दगड आणि दोन टॉवर सुरक्षितपणे वाचवणं आपल्याला शक्य झालं."

दरम्यान प्रार्थनास्थळाला लागलेली आग इतकी भयानक होती की त्याचं शिखर पूर्णपणे नष्ट झालं. मात्र अद्यापही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाही.

हा केवळ 15 ते 30 मिनिटांचाच खेळ होता, एवढंच आम्हाला आतापर्यंत समजलंय असं उप-गृहमंत्री लॉरेंट न्यूनेज यांनी म्हटलं आहे.

भलेही आगीवर नियंत्रण मिळवलं असेल, पण अग्निशमन दल आणि पोलिसांची टीम पुढच्या 48 तासांसाठी नोत्र दाम चर्च परिसरातच तैनात असेल. ज्यामुळे इमारतीची सुरक्षा आणि देखरेख सुनिश्चित होईल असंही न्यूनेज यांनी सांगितलंय.

पॅरिसरचे सरकारी वकील रेमी हाईट्स यांनी सांगितलं की कदाचित आग अपघातानं लागली असेल पण त्याचं मूळ कारण जाणून घेण्यासाठी तब्बल 50 लोकांना जबाबदारी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, AFP

तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या मते या आगीचा संबंध इमारतीच्या नूतनीकरणाशी आहे.

एकीकडे अजूनही आगीचं कारण समजलं नसलं तरी तज्ज्ञांना चिंता आहे ती म्हणजे ही प्राचीन वास्तू पुन्हा कशी उभी करायची. कारण यासाठी किमान 10 ते 15 वर्षांचा काळ लागू शकतो.

मात्र फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ही इमारत केवळ 5 वर्षात पुन्हा दिमाखात उभी करू असं म्हटलंय. तसंच टीव्हीवर बोलताना ते म्हणाले की पाच वर्षात ही इमारत इतकी आकर्षक आणि अतीव सुंदर करू की याआधीही लोकांनी तिला या स्वरूपात पाहिलं नसेल.

ल माँड वृत्तपत्राच्या अनुसार ही इमारत पुन्हा उभी करण्यासाठी बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगपतींनी मदत देऊ केली आहे. आतापर्यंत या इमारतीच्या उभारणीसाठी म्हणून 913 मिलियन डॉलर जमा झाले आहेत.

केवळ फ्रान्सच नाही तर जगभरातील लोकांनी ही इमारत पुन्हा उभी करण्यासाठी म्हणून मदत देऊ केली आहे.

...पण झालं काय होतं?

स्थानिक वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी सुमारे पावणेसात वाजता पहिल्यांदा आगीचे लोळ पाहायला मिळाले. त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. पण आग प्रचंड वेगानं पसरली आणि थेट प्रार्थनास्थळापर्यंत जाऊन पोहोचली. शिखरापर्यंत पोहोचण्याआधी प्रार्थनास्थळातील लाकडाच्या अमूल्य गोष्टी आगीत नष्ट झाल्या.

पण भीती या गोष्टीची होती की प्रार्थनास्थळाचा सर्वात प्रसिद्ध भाग असलेला टॉवरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये.

फोटो स्रोत, Reuters

मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेत पोहोचले होते आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

पॅरिस फायर सर्व्हिसच्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दहा वाजेदरम्यान आग आटोक्यात आणली होती.

काय काय उद्ध्वस्त झालं?

चौकशी समितीनं पहिल्यापासूनच आगीत नेमकं काय काय नष्ट झालं याचा अंदाज लावायला सुरूवात केली होती.

प्रार्थनास्थळाचे दगड काळे पडले आहेत आणि मुख्य शिखर उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं आहे.

जी दृश्यं समोर आली त्यात स्पष्ट दिसतंय की प्रार्थनास्थळाची 'रोज विंडो' सुरक्षित आहे मात्र इतर गोष्टींचं खूपच नुकसान झालं आहे.

फ्रान्सचे गृहमंत्री क्रिस्टोफ कास्टनर यांनी तर ही इमारत वाचवण्यात यश आलं असलं तरी ती अजूनही अस्थिर असल्याचं म्हटलंय.

फोटो स्रोत, AFP

तर उप-गृहमंत्री सांगतायत की सगळ्या गोष्टींचा नीट अंदाज घेतला तर इमारत ठीकठाक स्थितीत असल्याचं दिसतंय. मात्र दगडांकडे बघून कळतंय की काही ठिकाणी इमारत कमकुवत झाली आहे आणि छपराचा भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

किती नुकसान झालंय हे तपासण्यासाठी अजूनही तज्ज्ञांना घटनास्थळावर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनचा वापर करून नुकसानीचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे.

प्रचंड गरमी आणि पाण्याच्या फवाऱ्यांमुळे नेमकं काय काय खराब झालंय हे पाहणं अद्याप शक्य झालेलं नाही.

फ्रेंच चॅरिटी फाऊंडेशन बरट्रेंड दी फेयदूच्या मते, प्रार्थनास्थळाचा 18व्या शतकात उभारलेला हिस्सा पूर्णपणे खाक झालेला नाही. मात्र पाण्याचा मारा केल्याने त्याचा किती परिणाम त्यावर झालाय हे पाहणं अद्याप बाकी आहे.

आता पुढे काय ?

जगभरातले बरेच लोक नोत्र दामला वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. काही लोकांनी वैयक्तिकपणे तर काही लोकांनी मिळून मदतीचा हात पुढे केला आहे.

एअर फ्रान्सनं तर जाहीर केलंय की जो कुणी या इमारतीच्या पुनर्निमाणासाठी पुढे येईल त्याला कंपनी मोफत प्रवासाची संधी देईल.

केरिंग ग्रुपचे सीईओ आणि चेअरमन अरबपती फ्रांकोईस हेन्री पिनॉल्ट यांनी 113 मिलियन डॉलरची मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

फोटो स्रोत, EPA

याशिवाय बर्नॉर्ड अर्नॉल्ट परिवारानं आणि त्यांच्या कंपनीनं मदतीचा हात पुढे केलाय. तसंच लॉरियल कंपनीनंही प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय की, ही इमारत पुन्हा उभी करण्यासाठी आम्ही मदतीचा हात पुढे करतो आहे याचा मला आनंद आहे.

त्यांनी तज्ज्ञांची एक टीम फ्रान्सला पाठवली आहे.

ब्रिटन आणि स्पेननंही जी कुठली मदत लागेल ती करण्यासाठी तत्परता दाखवली आहे.

प्रार्थनास्थळातील बहुमूल्य वस्तूंचं काय?

आग विझवल्यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या आपात्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी बऱ्याच किंमती वस्तू सुरक्षित स्थळी हलवल्या आहेत. यात काही धार्मिक वस्तूही आहेत. यात येशूला सुळावर चढवण्याआधी जो मुकुट घातला होता त्याचाही समावेश असल्याचं सांगितलं जातंय.

राजा लुईस नववे जेव्हा हा काटेरी मुकुट घेऊन पॅरिसला आले होते तेव्हा त्यांनी ट्युनिक परिधान केलं होतं, तेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, EPA

इतिहासकार कॅमिल पास्कल यांनी फ्रेंच ब्रॉडकास्टर बीएफएमटीव्हीशी बोलताना म्हटलं की या आगीनं इतिहासातील अमूल्य ठेवा नष्ट केला आहे.

ते पुढे म्हणाले की, "नोत्र दाममध्ये जे काही झालं ते प्रचंड दुर्भाग्यपूर्ण आहे. पण ज्यापद्धतीनं वस्तू वाचवण्यात आल्या ते प्रचंड आनंद देणारं आहे. आम्ही आज डोळ्यांनी जे पाहिलं ते प्रचंड त्रासदायक होतं."

एक व्हायरल झालेला फोटो..

या दुर्घटनेची जगभर चर्चा होतेय पण त्याचवेळी एक फोटोही व्हायरल होतो आहे. ज्यात एक माणूस प्रार्थनास्थळाबाहेर एका छोट्या मुलीला घेऊन उभा आहे. हा फोटो आग लागण्याआधी काही मिनिटं आधीचा आहे.

पर्यटक ब्रूक विंडसर म्हणाले की, हा फोटो आग लागण्याआधी एक तास आधी घेतला आहे. आता त्यांनी या दोघांना शोधण्यासाठी ट्वीटरवर मोहीम हाती घेतली आहे.

त्यांनी लिहिलंय, "ट्वीटर तुझ्यात काही जादू असेल तर या लोकांना शोधण्यासाठी आम्हाला मदत कर."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)