Leadership skills: लायकी नसलेले अनेक लोक एवढे मोठे नेते कसे काय बनतात?
- एवा अँटीव्हेरोस
- बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

फोटो स्रोत, Getty Images
"राजकारण असो किंवा उद्योग-व्यवसाय, आपण जेव्हा नेत्याविषयी बोलतो तेव्हा त्याच्या पात्रतेकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही जेवढं दिलं गेलं पाहिजे," असं मत आहे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. टॉमस कॅमोरो-प्रेमुझिक यांचं.
त्यांनी 'Why do so many incompetent men become leaders?' हे पुस्तक लिहिलं आहे.
एक समाज म्हणून पुरुषातील अक्षमता किंवा अपात्रता आपल्याला इतक्या आवडतात की त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करतो आणि महिलांना नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधी डावलण्यामागे हे एक कारण असू शकतं, अशी मांडणी ते या पुस्तकात करतात.
अक्षमता का ठरते वरचढ?
राजकारण किंवा व्यवसायात नेता निवडताना आपल्यावर बरीच मोठी जबाबदारी असते. मात्र तरीही निवड करताना ती व्यक्ती "आपल्यासाठी, आपल्या संस्थेसाठी किंवा ज्या देशाची धुरा आपण त्यांच्या हाती सोपवणार आहोत त्या आपल्या देशासाठी योग्य आहे का, याची कुठल्याही प्रकारची शहानिशा आपण करत नाही", असे टॉमस यांचे म्हणणे आहे.
फोटो स्रोत, Getty Images
ऑफिस
ते म्हणतात, आपण निर्णय घेतो. मात्र, "हे नेते खरंच योग्य कामगिरी बजावत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी आपल्याकडे डेटाच नसतो. परिणामी नेतृत्व करण्याच्या त्यांच्या खऱ्या क्षमतेपेक्षा आपण त्यांच्या स्टाईलवरून किंवा ते आपल्यासमोर काय मांडत आहेत, त्यावरून अंदाज बांधत असतो."
टॉमस सांगतात, "सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपण त्यांच्या पात्रतेपेक्षा त्यांच्या आत्मविश्वासावर अधिक भर देतो."
बरेचदा नोकरीसाठीची मुलाखत किंवा (राजकारण्यांबाबत) टीव्हीवरील भाषणं, यासारख्या छोटाश्या संवादाच्या आधारावर आपण आपले निर्णय घेत असतो.
दुसरे म्हणजे, "आपण एखाद्याची विनयशीलता याऐवजी त्याच्या करिश्म्यावर अधिक भाळतो."
फोटो स्रोत, Getty Images
ऑफिसमधलं प्रमुखपद अकार्यक्षम माणसाला कसं मिळतं?
टॉमस यांच्या मते नम्रतेविषयी आपण भरभरून बोलतो. मात्र, निवड करताना मनोरंजक आणि आकर्षक, मजेदार आणि छाप पडणाऱ्या नेत्याचीच निवड करतो. मात्र, "ती तुमच्या टीमच्या हितासाठी राबणारी उत्तम व्यक्ती आहे, हे तुम्हाला कळणार कसे?"
टॉमस सांगतात, तिसरे आणि अधिक काळजीची बाब म्हणजे, एकप्रकारची अहंकारी भावना असलेल्या नेत्याला आपण पसंती देतो.
"जेव्हा एखादी व्यक्ती आत्मकेंद्री किंवा स्वतःचाच अजेंडा पुढे रेटणारी वाटते - किंवा चुकीची आणि काहीशी भ्रमित करणारी असते - अशावेळी तिला नाकारण्यापेक्षा 'व्वा, हिच्यात नेतृत्वगुण आहेत', असे आपल्याला वाटत असते."
जगभर गेली अनेक दशकं वेगवेगळ्या नेत्यांच्या व्यक्तिमत्त्व विश्लेषणाचा डेटा गोळा करण्यात आला. त्या डेटाचं विश्लेषण केलं असता असं दिसतं की वर उल्लेख केलेली तीन वर्णनं स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी अधिक लागू होतात. टॉमस सांगतात, "यावरूनच वाईट नेत्याचा प्रभाव स्पष्ट होतो."
चुकांची पुनरावृत्ती आणि चुकीचा नेता निवड करण्यामागची कारणे
कदाचित एखाद्या कामासाठी 'उत्तम व्यक्ती' आपल्याला नको असते, असं टॉमस यांना वाटतं. ते म्हणतात, "सैद्धांतिकरीत्या आपल्याला ते मान्य असतं. मात्र आपण उत्तमच व्यक्ती निवडतो, याचा पुरावा काय?"
फोटो स्रोत, Getty Images
ऑफिस
मिळवलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून टॉमस सांगतात, "अनेकदा कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच HRदेखील अल्पकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ, या व्यक्तीमुळे मी अधिक छान दिसेल किंवा ही व्यक्ती एखादी समस्या झटपट सोडवू शकेल किंवा ही व्यक्ती कंपनी सोडून जाणार नाही किंवा ती मी सांगेन ते करेल."
"प्रत्येकच संस्था किंवा उद्योगात आपली टीम आणि सहकाऱ्यांवर कसा प्रभाव टाकू शकेल, याआधारावर नेत्याची निवड व्हायला हवी. मात्र, तसे न होता, परिस्थिती कशी सांभाळून घेईल, यावर निवड केली जाते."
हे चक्र कसे भेदणार?
टॉमस सांगतात, एखाद्या कंपनीत किंवा उदाहरणादाखल लोकशाहीत अकार्यक्षम नेत्यांना बाजूला सारण्यासाठी प्रत्येकाने तीन गोष्टी केल्या पाहिजे-
1. नोकरीसाठी निवड करताना किंवा मतदान करताना व्यक्तीच्या सर्व गुणांचं बारकाईने निरीक्षण करा आणि उत्तम नेतृत्त्वाकडे कोणती गुणवैशिष्ट्यं असावी, हे तपासा. उदाहरणार्थ - क्षमता, नम्रता, स्वतःविषयी उत्तम जाण, प्रामाणिकपणा, जिज्ञासा आणि नवीन काही शिकण्याची तयारी
2. आपल्या अंतःप्रेरणेवर अविश्वास दाखवायला आपण शिकले पाहिजे. तुमची अंतःप्रेरणा किंवा गट फीलिंग काय सांगते, याकडे लक्ष देण्याऐवजी उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घ्या.
एखाद्याच्या ऑफिस पॉलिटिक्स करण्याच्या क्षमतेकडे नव्हे तर परिणामकारक नेतृत्वासाठी आवश्यक असलेले त्याचे मूल्यांकन, त्याच्या कौशल्य, ज्ञान आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती देणाऱ्या सायकोमॅट्रीक चाचण्या किंवा त्याच्या कामगिरीचे पुरावे, ही तथ्यं जाणून घेणे आवश्यक आहे.
फोटो स्रोत, Getty Images
ऑफिसात प्रमुखपदी कशी पोहोचतात माणसं?
टॉमस सांगतात, "कंपन्यांकडे भरपूर डेटा असतो. मात्र ते त्याचा वापर करत नाही आणि उलट जी व्यक्ती 'आपल्याला आवडते' असे त्यांना वाटते, तिचीच निवड केली जाते."
3. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केल्यास मोठी मदत ठरू शकते. टॉमस म्हणतात, "बरेचसे प्रयत्न फसतात कारण ज्ञानाऐवजी बरेचदा स्त्री-पुरूष अशा भेदाला महत्त्व दिले जाते."
तुम्हाला उपाय हवा असेल तर स्त्री-पुरूष असा भेद करू नका. सक्षम असणाऱ्या स्त्रियांना संधी द्या.
स्त्रियांना प्राधान्य हा समस्येवरचा उपाय आहे का?
टॉमस म्हणतात, "स्त्रिया हा काही उपाय नव्हे. 'ज्ञान आणि क्षमतेचे गांभीर्याने मूल्यांकन करणे' हा उपाय आहे."
ज्ञान आणि क्षमता हे एखाद्या कंपनीचे उद्दीष्ट असेल तर "कंपनीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये स्त्रिया अधिक असतील, असे नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिक असेल."
उपलब्ध डेटानुसार, टॉमस सांगतात, "नम्रता, प्रशिक्षकगुण, आत्म-जागरुकता, लोकांकडून काम करून घेण्याचे कौशल्य आणि क्षमता, या बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक उजव्या असतात. सर्वाधिक प्रगत राष्ट्रांतील विद्यापीठांमध्ये मुली या मुलांपेक्षा खूप पुढे आहेत. अगदी एमबीएसारख्या अभ्यासक्रमातदेखील."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)