'समुद्रदेवतेच्या आदेशावरून' तैवानचा अब्जाधीश लढतोय अध्यक्षीय निवडणूक

टोरी गौ

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

टोरी गौ

टोरी गौ... तैवानमधील एक मोठं प्रस्थ. तैवानची सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी असेलल्या फॉक्सकॉनचे संस्थापक मालक. हे अब्जाधीश टोरी गौ अध्यक्षीय निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आणि यासाठी देवानेच आपली शिफारस केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

गौ हे तैवानमधील अतिश्रीमंतांपैकी एक आहेत आणि बुधवारी त्यांनी कॉमिंग्टनच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली उमेदवारी जाहीर केली.

टेरी गौ यांची फॉक्सकॉन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना सुटे भाग पुरवते. या व्यवसायातून टेरो गौ यांनी अब्जावधी रुपयांची मालमत्ता कमावली. या कंपनीने अॅपल आयफोनचे अनेक मॉडेल तयार केले आहेत.

संपूर्ण तैवान बेटावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैवानची समुद्री देवता असलेल्या माझूनेच आपल्याला निवडणूक लढण्यास सांगितलं, असा दावा त्यांनी केला आहे.

चीनशी मैत्रीपूर्ण धोरणांचा पुरस्कार करणाऱ्या कॉमिंग्टन या विरोधी पक्षाच्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत टेरी गौ उभे आहेत. या फेरीतून एकाचीच निवड होईल जो पुढे चालून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असेल.

सध्या तैवानचे बीजिंगसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत जानेवारी 2020 मध्ये तैवानमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. टेक-बिलिनिअर असलेल्या टेरी गौ यांना कॉमिंग्टन पक्षातून अध्यक्षीयपदासाठी उमेदवारी मिळाल्यास ते तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष साई इंग-वेन यांच्यापुढे मोठं आव्हान उभं करू शकतात.

आपली उमेदवारी जाहीर करताना ते म्हणाले, "माझी निवड झाल्यास जानेवारी 2020 मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मी कॉमिंग्टन पक्षाचं प्रतिनिधित्व करेन. मात्र माझी निवड झाली नाही तर मी मेहनत घेतली नाही, असा त्याचा अर्थ होईल."

"त्यानंतर पक्षातील प्रायमरी निवडणुकीतून अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून ज्याची निवड होईल, त्याला मी पूर्णपणे पाठिंबा देईल."

फोटो स्रोत, AFP

पक्षमुख्यालयातील पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी तायपैईच्या एका प्रसिद्ध मंदिरात पूजा केली आणि राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी आपल्याला देवानेच प्रेरणा दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "तीन दिवसांपूर्वी माझू (समुद्रदेवता) माझ्या स्वप्नात आली. तैवानच्या लोकांना त्रास व्हावा, हे माझूला मान्य नाही. त्यामुळे मी काहीतरी करावे, असे माझूने मला सांगितले."

याच देवतेने मला लहानपणापासून आतापर्यंत सांभाळल्याचे त्यांनी सांगितले. "मी माझूचा देवपुत्र आहे. तैवानच्या जनतेसाठी मला बरेच काही करायचं आहे. मी माझूच्या आदेशांचं नक्कीच पालन करेन."

चीनशी मैत्रीपूर्ण संबंधाचे पुरस्कर्ते टेरी गौ

दक्षिण चीन आणि तैवान, मलेशिया आणि व्हिएतनाम यासारख्या ताओई आणि बौद्ध समुदाय असलेल्या देशांमध्ये माझू या समुद्रदेवतेची पूजा केली जाते.

माझू मच्छिमार आणि खलाशांचे रक्षण करते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

टेरी गौ अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष साई यांच्यापेक्षा त्यांचा कल अधिक चीनधार्जिणा असण्याची शक्यता आहे.

डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष हा संपूर्ण स्वातंत्र आणि संप्रभुतेचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. याच पक्षाच्या साई 2016 साली तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या.

कॉमिंग्टन हादेखील तायवानमधील आणखी एक मोठा राजकीय पक्ष आहे. 1949 साली चीनपासून वेगळा झाल्यानंतर तैवानवर बराच काळ याच पक्षाची सत्ता राहिली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

साई

चीनसोबतच्या तैवान स्वतंत्र झाले. मात्र तरीही चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे, असे कॉमिंग्टन पक्षाचं धोरण आहे.

चीन आणि तैवान यांचे संबंध अतिशय गुंतागुंतीचे आहे. ज्याला आपण चीन म्हणतो त्या राष्ट्राचे अधिकृत नाव 'पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना' असं आहे. तर ज्याला आपण तायवान म्हणतो त्या राष्ट्राचे अधिकृत नाव 'रिपब्लिक ऑफ चायना' असं आहे.

1949 मध्ये गृहयुद्धानंतर तैवानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानलं. मात्र चीनसाठी तैवान एक बंडखोर राज्य आहे. तैवानने पुन्हा चीनमध्ये सामील व्हावं, अशी चीनची इच्छा आहे. त्यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी त्यासाठी चीनची तयारी आहे.

अशी गुंतागुंतीची पार्श्वभूमी असलेल्या या दोन देशांमधले संबंध 1980नंतर सुधारू लागले. चीनमध्ये जायला आणि तिथे गुंतवणूक करायला तायवान सरकारने परवानगी दिली.

फॉक्सकॉन ही चीनमधील फॅक्ट्रीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तैवानच्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे आणि चीनमधील स्वस्त मनुष्यबळाचा त्यांना मोठा फायदाच झाला.

फॉक्सकॉनमध्ये सध्या दहा लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. यात सर्वाधिक कर्मचारी हे चीनमधील फॉक्ट्रीमध्ये आहेत.

टेरी गौ अध्यक्षपदी निवडून गेल्यास त्यांच्या कंपनीचं नुकसान होत असेल तर तशा परिस्थितदेखील ते तैवानच्या हिताला प्राधान्य देतील का, असा प्रश्न नक्कीच विचारला जाईल, असे तायपेईचे बीबीसी प्रतिनिधी सिंडी साई यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)