लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून तिला शाळेतच जिवंत जाळले; पण बांगलादेश काही धडा घेणार?

  • मीर साबीर
  • बीबीसी बंगाली, ढाका
नुसरत

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT

बांगलादेशमध्ये एका तरुणीला तिच्या शाळेतच केरोसिन टाकून जिवंत जाळण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद सध्या बांगलादेशमध्ये उमटत आहेत. या मुलीचे नाव आहे नुसरत जहां रफी. तिने जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांत लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

लैंगिक छळाविरोधात आवाज उठवण्याचे तिचे धारिष्ट्य, केरोसीन टाकून पेटवल्यानंतर तिने पाच दिवस मृत्यूशी दिलेली झुंज आणि या सर्व काळात घडलेल्या घडामोडी, यामुळे बांगलादेशमध्ये वातावरण तापले आहे.

तसेच दक्षिण आशियातील या रूढिवादी देशात लैंगिक छळाला बळी पडलेल्या पीडितांना किती असुरक्षित आयुष्य जगावे लागते, याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

19 वर्षांची नुसरत ढाक्यापासून 160 किमी दूर असलेल्या फेनी या छोट्या गावात राहायची. तिथल्याच एका मदरशात ती शिक्षण घेत होती. 27 मार्च रोजी मुख्याध्यापकाने ऑफिसमध्ये बोलावून सतत चुकीच्या पद्धतीने आपल्याला स्पर्श केल्याची तक्रार तिने केली. पुढे आणखी काही वाईट घडण्याआधी तिने तिथून पळ काढला.

बांगलादेशमध्ये अनेक मुली आणि तरुण स्त्रियांना अशा प्रकारच्या लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. मात्र समाज आणि कुटुंबीयांकडून बदनामी होण्याच्या भीतीने त्या या गंभीर गुन्ह्याची वाच्यताही कुठे करत नाहीत. नुसरतचे वेगळेपण असे की तिने या विकृतीविरोधात केवळ आवाजच उठवला नाही तर ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्याच दिवशी तिने तिच्या कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

फोटो स्रोत, NURPHOTO/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

नुसरतच्या गावात झालेली निदर्शने

स्थानिक पोलीस ठाण्यात तिने आपला जबाब नोंदवला. खरेतर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार नोंदवताना तिला धीर देणारं वातावरण तिथे असायला हवं होतं. मात्र, याउलट नुसरत जेव्हा घडलेला तो घृणास्पद प्रकार सांगत होती तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मोबाईलवर तिचा व्हिडिओ चित्रित केला.

या सर्व प्रकारामुळे नुसरत घाबरली आहे आणि ती हाताने चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओत दिसतं. तर पोलीस अधिकारी काही होत नाही, चेहऱ्यावरून हात काढ, असं सांगताना ऐकू येतं. हा व्हिडिओ स्थानिक मीडियातही लीक झाला.

लहानशा खेड्यात नुसरतचा जन्म झाला. एका रूढिवादी कुटुंबात ती लहानाची मोठी झाली आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका शाळेत ती शिकायची. अशा परिस्थितीतील कुठल्याही मुलीला लैंगिक शोषणाविरोधात तक्रार केल्यानंतर संभाव्य परिणामांना सामोरे जावेच लागते.

पीडितेला तिच्या समाजाकडून प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन होणारी अवहेलना, छळ याचा सामना करावा लागतो. काही वेळा प्राणघातक हल्लेही होतात आणि नुसरतला या सर्वांमधून जावे लागले.

फोटो स्रोत, SHAHADAT HOSSAIN

फोटो कॅप्शन,

नुसरत जहाँच्या अंत्यसंस्कारावेळी तिचा शोकमग्न भाऊ

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

27 मार्चला तक्रार दाखल केल्यानंतर मुख्याध्यापकाला अटक झाली. यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. मुख्यध्यापकाच्या सुटकेविरोधात काही जण रस्त्यावर उतरले. तिच्याच शाळेतील दोन मुलांनी यासाठी पुढाकार घेतला. तर स्थानिक राजकारणीदेखील या विरोधात प्रदर्शनामध्ये उपस्थित होते. लोकांनी नुसरतलाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना तिची काळजी वाटायला लागली.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तब्बल 11 दिवसांनी म्हणजे 6 एप्रिलला नुसरत परीक्षेसाठी शाळेत गेली. नुसरतचा भाऊ महमद्दुल हसन नोमा याने सांगितले, "मी तिला शाळेत सोडण्याचा, शाळेच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मला तिथेच रोखण्यात आले आणि आत जायला मनाई करण्यात आली."

तो म्हणतो, "मला थांबवलं नसतं तर माझ्या बहिणीसोबत हे घडलंच नसतं."

मरण्यापूर्वी नुसरतने दिलेल्या जबाबानुसार तिच्या एका मैत्रिणीला कुणीतरी मारत असल्याचे सांगून तिची एक मैत्रीण तिला शाळेच्या छतावर घेऊन गेली. नुसरत जेव्हा छतावर पोहोचली तेव्हा तिथे चार ते पाच बुरखा परिधान केलेले लोक होते. त्यांनी नुसरतला घेरलं आणि मुख्याध्यापकाविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागले. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिचे हात बांधले आणि तिची मान धरून तिला पेटवून दिले.

पोलीस ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे प्रमुख बनज कुमार मुजुमदार यांनी सांगितले, "हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता." मात्र घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पोबारा केल्यानंतर नुसरतला वाचवण्यात आल्याने त्यांचा बेत फसला. मरण्यापूर्वी तिने तिचा जबाब नोंदवला. मुजुमदार यांनी बीबीसी बेंगालीला सांगितले, "केरोसीन टाकताना एका मारेकऱ्याने तिची मान खाली धरून ठेवली होती. त्यामुळे तिचा चेहरा जळाला नाही."

नुसरतला ताबडतोब स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, ती 80% भाजली असल्याने तिला लगेच ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले.

आपण वाचणार नाही, असे वाटल्याने नुसरतने स्वतः अॅम्ब्युलन्समध्येच भावाच्या मोबाईलवर सर्व हकीगत सांगितली. यात ती म्हणते, "त्या शिक्षकाने मला स्पर्श केला. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या गुन्ह्याविरोधात लढा देईन."

तिच्यावर केरोसीन टाकून पेटवून देणाऱ्यांपैकी काही तिच्या मदरशातील विद्यार्थी असल्याचंही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

नुसरतला ढाका मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केल्यानंतर मीडियामध्ये या बातमीला मोठी प्रसिद्धी मिळाली. 10 एप्रिलला नुसरतचा मृत्यू झाला. फेनी या गावात नुसरतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून हजारो लोक तिथे जमले होते.

नुसरतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली. यातील 7 जणांवर तिच्या खुनात सहभागी असण्याचा आरोप आहे. अटक केलेल्यांमध्ये मुख्याध्यापकाच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या दोन विद्यार्थांचाही समावेश आहे. तर मुख्याध्यापक अजूनही पोलीस कोठडीत आहे. नुसरतची तक्रार नोंदवताना तिचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ढाक्यामध्ये नुसरतच्या पालकांची भेट घेतली आणि नुसरतच्या खुनात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, "कुठल्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही."

नुसरतच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू आहेत. नुसरत आणि लैंगिक छळाचा सामना करणाऱ्या तिच्यासारख्या अनेकींना बांगलादेशमध्ये जी वागणूक मिळते त्या विरोधात अनेक जण सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नुसरतच्या अंत्यसंस्कारावेळी जमलेला जनसमुदाय

अन्वर शेख यांनी बीबीसी बंगालीच्या फेसबुक पेजवर लिहिले, "अशा घटनांनंतर अनेक मुली अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात बोलणार नाही. बुरखाच काय लोखंडाचे कपडे घातले तरीदेखील ते बलात्काऱ्यांना रोखू शकणार नाही."

तर लोपा हुसैन यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे, "मला मुलगी हवी होती. आयुष्यभर मी त्याचीच वाट बघितली. मात्र आता मला भीती वाटते. या देशात मुलीला जन्म देणे म्हणजे आयुष्यभर भीती आणि काळजीच्या सावटाखाली जगण्यासारखे आहे."

महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या बांगलादेश महिला परिषदेच्या माहितीनुसार 2018 साली बलात्काराच्या 940 घटना घडल्या. मात्र, खरा आकडा याहून खूप जास्त असू शकतो, असा अंदाज आहे.

मानवाधिकार वकील आणि महिला वकील संघटनेच्या माजी संचालक सलमा अली सांगतात, "लैंगिक छळाविरोधात एखादी स्त्री न्याय मिळवू इच्छिते तेव्हा तिला अधिक त्रास होतो. अनेक वर्षं खटला सुरू राहतो. समाजाकडून अवहेलना होते. पोलीसही योग्य तपास करत नाहीत."

"त्यामुळे पीडिताही न्याय मिळण्याची उमेद सोडून देते. अखेर गुन्हेगारांनाही शिक्षा होत नाही आणि ते तोच गुन्हा पुनःपुनः करतात. अशा घटनांमुळे इतरही कुणी पुढे येत नाही."

नुसरतला पेटवून दिल्यानंतरच या प्रकरणाला महत्त्व का देण्यात आले? आणि या घटनेनंतर तरी बांगलादेशमध्ये लैंगिक छळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल का? असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नुसरतचे शोकमग्न कुटुंबीय

ढाका विद्यापीठातील प्राध्यापक काबेरी गायेन म्हणतात, "या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र, हळुहळू अशा घटना विस्मरणात जातात, हे मागेही आपण पाहिले आहे. त्यामुळे या घटनेनंतरही काही फार बदल होतील, असे मला वाटत नाही. या प्रकरणात न्याय मिळतो का, हे आपल्याला बघायला हवे."

त्या म्हणतात, "मानसिकता तसेच कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर बदल झाले पाहिजे. शाळेमध्ये बालवयापासूनच लैंगिक छळाविषयी जागरुकता निर्माण करायची गरज आहे. "लैंगिक छळाबाबत काय योग्य आणि काय चुकीचे हे त्यांना कळायलाच हवे."

2009 साली बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळाविरोधात तक्रार करता यावी, यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळाविरोधी सेल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही मोजक्याच शाळांमध्ये असे सेल स्थापन करण्यात आले. हा आदेश सर्व संस्थांनी लागू करावा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी त्याचा कायद्यात समावेश करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)