1500 किलो वजनाच्या 'महाकाय' सिंहाचे जीवाश्म सापडले

महाकाय सिंह

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

महाकाय सिंहाचे कल्पनाचित्र

केनियामध्ये वैज्ञानिकांना महाकाय सिंहाचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्माचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की हा सिंह आताच्या सिंहाच्या तुलनेत किमान पाचपट मोठा असावा. अफ्रिकेत सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी या सिंहाची प्रजाती राहत होती.

या प्रजातीचं नाव 'सिंबाकुबवा कुटोकाफ्रिका' (महाकाय अफ्रिकन सिंह) आहे. हा सिंह मॅमथ किंवा महाकाय हत्तीची शिकार करत असावा असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे. नॅशनल जिओग्राफिकनं सांगितलं आहे की हा सिंह साधारण पाच-साडेपाच फूट उंच असू शकतो आणि त्याची लांबी आठ-दहा फूट इतकी असू शकते.

आता ही प्रजाती नष्ट झाली आहे. हायनोडोन्ट्स नावाचा सस्तन प्राण्यांच्या गटातल्या सिंहाच्या प्रजातीचं नष्ट होण्याचं कारण काय आहे हे अद्याप वैज्ञानिकांना समजू शकलं नाही. हायनोडोन्ट्स या नावावरून आपला समज होऊ शकतो की या सिंहाचा गेंड्याशी काही संबंध असेल, पण तसं काही नसल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Matthew Borths/ Nancy Stevens

या सिंहाचा दात सापडला आहे आणि अर्थातच तो खूप मोठा आहे. हा सिंह मांसभक्ष्यी होता असं अभ्यास सांगतो. हा सिंह पोलार बीअरहून मोठा असावा असं वैज्ञानिक सांगतात. या सिंहाचे अवशेष केनियाच्या राष्ट्रीय संग्रहालयात अनेक वर्षांपासून पडून होते.

2013मध्ये मॅथ्यू बॉर्थ्स हे संशोधन करत असताना त्यांच्या हाती सिंहाचा दात आला. या दाताचं वर्गीकरण 'हायनाज' या वर्गात करण्यात आलं होतं. या दाताची रचना गेंड्याच्या शिंगाप्रमाणे आहे त्यामुळे वर्गीकरण करणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज झाला असावा. त्यामुळे अभ्यासाला उशीर झाला.

1970ला केनियात उत्खनन करताना हे अवशेष सापडले होते. बॉर्थ्स यांच्याबरोबर नॅन्सी स्टीव्हन्स या देखील संशोधन करत आहेत. त्यांचं संशोधन जर्नल ऑफ वर्टेब्रेट पॅलिएंटोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)