BAPS अबुधाबी मंदिर शिलान्यास: जाणून घ्या या भव्य मंदिराविषयी 7 गोष्टी

BAPS Image copyright BAPS

संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी शहरापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आणि दुबईपासून 45 मिनिटांच्या अंतरावर एका भव्य मंदिराचा शिलान्यास शनिवारी करण्यात आला.

या मंदिरामध्ये मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी जागा, प्रार्थना सभागृह, प्रदर्शनासाठी जागा, अभ्यासाची सोय, खेळण्यासाठी जागा, बागा, पाण्याची सोय, शाकाहारी खाण्याची सोय, पुस्तकं आणि भेटवस्तूंची दुकानं असतील.

अबुधाबी आणि दुबई अशा दोन्ही शहरांमधील लोकांना या मंदिराचा लाभ घेता येणार आहे.

कसं असेल हे मंदिर?

1. अबुधाबीचं हे मंदिर 5.5 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून तितकीच जागा पार्किंगसाठी ठेवण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी अबुधाबीचे राजकुमार आणि लष्कराचे उपप्रमुख शेख मोहम्मद बिन झायेद यांनी जमीन उपलब्ध करून दिली आहे.

2. या मंदिरासाठी राजस्थानातील गुलाबी दगड वापरला जाणार आहे. 2,000 शिल्पकार भारतामध्ये दगड घडवून तिकडे पाठवतील. राजस्थानातील हे दगड 50 अंश सेल्सियसहून अधिक तापमानामध्ये टिकू शकतात.

4. जयपूरमधील हवा महलसह अनेक राजवाड्यांचे बांधकाम याच दगडाचा वापर करून करण्यात आले आहे.

4. सर्व धर्माचे लोक हिंदू संस्कृती आणि मंदिराचा अभ्यास व अनुभव घेण्यासाठी या मंदिरात जाऊ शकतील. अध्यात्म आणि सौहार्दाची प्रतीकं या मंदिराच्या शिल्पांमध्ये कोरण्यात येणार आहेत. तसंच झाडं, फुलं, मोर, हत्ती, हिंदू देवता आणि साधू यांच्या प्रतिमाही मंदिराच्या दगडांवर कोरण्यात येतील.

5. या मंदिराची सात शिखरं अमिरातींच प्रतिनिधित्व करतील. मंदिरावर पाच घुमटही असतील.

Image copyright www.mandir.ae

6. 2018 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या प्रतिकृतीचं अनावरण केलं होतं.

7. या मंदिराची घोषणा झाली तेव्हा ते 2020 पर्यंत पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं होतं. भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी एक-दोन वर्षांत मंदिर पूर्ण होईल, असं गेल्याच आठवड्यात सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)