Sri Lanka: श्रीलंका साखळी बाँबस्फोटात 290 ठार, मृतांमध्ये 3 भारतीयांचा समावेश

श्रीलंका स्फोट Image copyright Getty Images

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमध्ये 290 जणांनी प्राण गमावले आहेत तर जखमींची संख्या 500हून अधिक सांगितली जात आहे.

श्रीलंकेत रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी आठ बाँबस्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

मृतांची नावं लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी आहेत. मृतांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेतील नॅशनल हॉस्पिटलने यासंदर्भात भारतीय दूतावासाला माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Image copyright Twitter / SushmaSwaraj
प्रतिमा मथळा सुषमा स्वराज यांचं ट्वीट

थोड्या वेळापूर्वीच श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री एच.ई. तिलक मारापन्ना यांच्याशी बातचीत झाल्याचं स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेत आप्तस्वकीय असणाऱ्या भारतीयांनी कोलंबोतील भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचं आवाहन स्वराज यांनी केलं आहे.

रविवारी कोलंबोमध्ये तीन चर्चसह आठ ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये आतापर्यंत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना कोलंबोतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

कोलंबोमधील मृतांमध्ये परदेशी नागरिकांची संख्या 27 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

श्रीलंकेत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीबीसी सिंहला प्रतिनिधी अज्जाम अमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबोमधील कोचिकाई येथील सेंट अंटोनी चर्च, शांग्री ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल या चार ठिकाणी रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले.

या स्फोटांची जबाबदारी अजूनपर्यंत कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नाहीये. पण पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

नेमकं झालं काय?

कोलंबोच्या थोडं बाहेर असलेल्या नेगोम्बो आणि मट्टाकलाप्पू इथल्या चर्चमध्येही स्फोट घडविण्यात आले.

त्यानंतर काही तासांनी कोलंबोच्या देहिवाला प्राणीसंग्रहालयाजवळ सातवा स्फोट झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये एका घराचा तपास करत असताना तीन पोलिसांचा मृत्यू झाला.

सेंट अंटोनी चर्चमध्ये ईस्टर प्रार्थनेसाठी हजारो लोक जमले होते. या प्रार्थनेच्या वेळेसच स्फोट घडवण्यात आल्यानं मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्फोटाच्या ठिकाणी मृतदेहांचे तुकडे विखुरले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

प्रतिमा मथळा कुठे काय झालं?

स्फोटांनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांनी दिली आहे. लोकांनी या परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही सिरिसेना यांनी केलं आहे.

श्रीलंकेचे अर्थमंत्री मंगला समरवीरा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, की चर्च आणि हॉटेलमध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्या स्फोटांमध्ये अनेक निर्दोष लोक मारले गेले आहेत. भीती आणि अराजकता पसरविण्यासाठी नियोजनपूर्वक हे स्फोट घडवून आणल्याचं दिसत आहे.

'अफवांवर विश्वास ठेऊ नका'

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुरक्षेसंबंधीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. तर राष्ट्राध्यक्ष मैथिरीपाल सिरिसेना यांनी अफावांवर विश्र्वास ठेऊ नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहव रेड क्रॉसने केलं आहे.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि विरोधी पक्ष नेते महिंदा राजपक्षे यांनीही या स्फोटांचा निषेध केला असून हे स्फोट अमानवीय असल्याचं म्हटलं आहे.

दुपारून श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवान विजेवर्धने म्हणाले, "आम्ही सर्व तपास संस्थांच्या संपर्कात आहोत आणि काही काळासाठी आम्ही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत ही संचारबंदी असेल.

"देशातील कट्टरवादी विचारसरणीच्या लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. गेल्या काही दिवसांपासून हे गट ज्या कारवाया करत आहेत, त्यांना आता अजिबात थारा दिला जाणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करू.

"धार्मिक पातळीवर कट्टरवादी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सध्या लष्कर, पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल," असं ते एका निवेदनात म्हणाले. 

पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा निषेध करणारं ट्वीट केलं आहे.

"श्रीलंकेमध्ये झालेल्या स्फोटांचा तीव्र निषेध करतो. आपल्या प्रदेशात या अमानुषपणाला कोणतंही स्थान नाहीये. भारत श्रीलंकेच्या लोकांसोबत आहे. माझ्या संवेदना मृतांच्या परिवारासोबत आहेत. जखमींच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो."

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेतील भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपण सातत्यांनं कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असल्याचं ट्वीट केलं आहे. भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हेल्पलाईन नंबरही दिले आहेत-

+94 777902082

+94 772234176

+94 777903082

+94 112422788

+94 112422789

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. "भारत श्रीलंकेत झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहे. श्रीलंकेत विविध ठिकाणी झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहोत. या स्फोटात मरण पावलेल्या व्यक्तींचं कुटुंब आणि श्रीलंकेच्या सरकारप्रति आमच्या सहवेदना व्यक्त करत आहोत."

"भारताने कायमच कट्टरवादाचा निषेध केला आहे आणि नियंत्रण रेषेपलीकडे होणाऱ्या कट्टरतावादावर कारवाई करावी, अशी आम्ही कायमच मागणी करतो. अशा भ्याड हल्ल्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. तसंच या कठीण काळात आम्ही श्रीलंकेचं सरकार आणि जनतेच्या सोबत आहोत." 

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)