श्रीलंका : मृतांचा आकडा 290 वर, 24 संशयित ताब्यात

श्रीलंका Image copyright Reuters

श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण हल्ल्यात 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोलंबो, नेगंबो आणि बट्टीकलोआ येथील चर्च आणि हॉटेलमध्ये साखळी स्फोट झाले आहेत. ख्रिश्चन धर्मासाठी महत्त्वाच्या असलेल्या ईस्टर संडेच्या दिवशीच हे स्फोट झाले आहेत.

या हल्ल्यात जवळपास 500 लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 24 संशयित व्यक्तींना श्रीलंकन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण हे स्फोट कुणी घडवून आणले याबाबात काहीही ठोस माहिती हाती नसल्याचं श्रीलंकेनं सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं?

स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.45 वाजता पहिल्यांदा बाँबस्फोट झाल्याच वृत्त आलं. त्यांनंतर एकामागून एक असे सहा स्फोट घडले.

पोलिस जेव्हा हल्लेखोरांचा शोध घेत होते तेव्हा आणखी दोन स्फोट घडले. म्हणजे एकूण आठ स्फोट काही मिनिटांच्या अंतराने झाले.

कोलोंबो, नेगोम्बो आणि बट्टीकोला इथल्या चर्चमध्ये आणि कोलोंबोतल्या शांग्री-ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल याठिकाणी स्फोट झाले आहेत.

रविवारी उशीरा कोलोंबो विमानतळाजवळ काही स्फोटकं निकामी केल्याचं श्रीलंकेच्या हवाईदलानं सांगितलं. विमानतळाजवळच एका पीव्हीसी पाईपमध्ये ही स्फोटकं ठेवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हल्लेखोरांबद्दल आतापर्यंत काय माहिती मिळाली?

आतापर्यंत 24 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असलं तरी या हल्ल्यामागे कुणाचा हात होता हे अद्याप कळलं नाही.

आत्मघाती हल्लेखोरांचा यात वापर केला जाण्याची शक्यता श्रीलंकन अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

बीबीसीच्या अझाम अमिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे "कट्टरपंथी, मूलतत्त्ववादी इस्लामी विचारांचे लोक" असू शकतात, असं अधिकाऱ्यांचं मत आहे.

हल्ल्याची भीती असतानाही पुरेशी काळजी का घेतली नाही? याबाबत चौकशी केली जाईल. तसंच या क्षणाला हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल," असं पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे.

सरकारने लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. अफवा टाळण्यासाठी सोशल मीडियावर काही बंधनं टाकली आहेत.

तिथे लोकांवर ओढावलेला प्रसंग प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितला.

ज्युलियन एमॅन्युएल

डॉ.एमॅन्युएल हे 48 वर्षीय डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म श्रीलंकेत झाला. ते आता यूकेमध्ये त्यांच्या कुटुंबीयांबरोबर राहतात.

ते या आठवड्यात त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आले होते. ते कोलंबोच्या सिनेमन ग्रँड हॉटेलमधल्या खोलीत झोपले होते तेव्हा एक स्फोट ऐकू आला.

"आम्ही झोपलो होतो तेव्हाच आम्हाला स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे आमची खोली हादरली. मला वाटतं त्यावेळी सकाळचे साडेआठ वाजले होते. आम्ही हॉटेलच्या लॉबीत गेलो. आम्हाला मागच्या दारातून बाहेर जायला सांगितलं. तिथे आम्ही काही जखमींना इस्पितळात घेऊन जाताना पाहिलं. हॉटेलचंही नुकसान झालेलं आम्हाला दिसलं."

तिथल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की तिने एक छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहिला. त्यांच्या मित्रांनी चर्चमध्ये झालेल्या स्फोटाचे फोटो पाठवले. तेव्हापर्यंत हॉटेलचं पुरतं नुकसान झालं होतं. एक रेस्टॉरंट नष्ट झालं होतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा नेगोम्बोमधील या चर्चवरही हल्ला झाला.

"आम्ही आज माझी आई आणि पुतण्याबरोबर चर्चला जाणार होतो. मात्र तिथल्या सगळ्या प्रार्थना रद्द करण्यात आल्या होत्या. आज देशात जे झालं होतं त्यानंतर चर्चमधले सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत." ते म्हणाले.

"मी माझ्या आयुष्यातली पहिली 18 वर्षं श्रीलंकेत होतो. त्यामुळे इथला वांशिक हिंसाचार मी पाहिला होता." श्रीलंकेत अनेक दशकांपासून सिंहली आणि तामिळ गटांमध्ये संघर्ष होता. मात्र 2009 पासून तिथे बऱ्यापैकी शांतता होती. माझी मुलं 11 आणि 7 वर्षांची आहेत. त्यांनी आणि माझ्या बायकोने कधीही युद्ध पाहिलं नाही. त्यांच्यासाठी हे फार अवघड आहे."

ते पुढे म्हणाले, "हे फारच दु:खद आहे. मला असं वाटलं की श्रीलंकेत आता हिंसाचार होणार नाही. आता ती वेळ पुन्हा येतेय हे पाहणं फारच दु:खद आहे."

उस्मान अली

उस्मान अली कोलंबोमध्ये राहतात. त्यांच्या घराजवळ असणाऱ्या एका चर्चमधून भक्तांना बाहेर काढताना पाहिलं तेव्हा काहीतरी अनुचित घडल्याचं त्यांना जाणवलं.

त्यांच्या घराचा रस्ता शहराच्या मुख्य रुग्णालयाकडे जातो. अचानक तिथे अनेक रुग्णवाहिका तिथे आल्या. त्यांनी #LKA - Lanka हा हॅशटॅग पाहिला आणि त्यांना परिस्थितीची कल्पना आली.

या हल्ल्याची विदारक दृष्यं आणि फोटो येत असतानाच अनेक रक्तपेढ्य़ांतून रक्त देण्याचं आवाहन करण्यात येत होतं.

Image copyright Usman Ali
प्रतिमा मथळा नॅशनल ब्लड सेंटरमध्ये जमलेली लोकांची गर्दी

ते नॅशनल ब्लड सेंटर मध्ये गेले. तिथे शेकडो लोकं जमली होती.

"तिथे खूप लोकं होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांची नावं आणि माहिती नोंदवून घेतली जात आहे. रक्तपेढीने संपर्क साधला तर परत रक्तदानासाठी येण्यासाठी सांगितलं जात आहे."

रक्तपेढीचं प्रवेशद्वार लोकांनी ओसंडून वाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आत गेल्यावर लोकांची प्रचंड प्रमाणात एकजूट झालेली दिसून येत होती.

"पीडितांना मदत करणं हे या लोकांचं एकमेव उद्दिष्ट होतं. त्यात धर्म, जात, काहीही आड येत नव्हतं. तिथे उपस्थित सगळे लोक एकमेकांना मदत करत होते."

"देव जाणे हा हल्ला कसा झाला. आता देवच आमचं भलं करो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)