कॉमेडियन व्होलोदिमीर झेलेन्स्की प्रचंड मताधिक्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष

व्होलोदिमीर झेलेन्स्की

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

व्होलोदिमीर झेलेन्स्की

कॉमेडियन व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.

"मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही," असं झेलेन्स्की त्यांचा विजय निश्चित झाल्यावर आपल्या समर्थकांशी बोलताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मी अजूनही औपचारिकपणे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेलो नाही. मात्र युक्रेनचा एक नागरिक म्हणून सोव्हिएत संघाबाहेरील देशांना सांगू शकतो, की बघा.. सगळं काही शक्य आहे."

मतमोजणी जवळजवळ पूर्ण झाल्यावर त्यांना तब्बल 73 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि मावळते राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांच्या खात्यात जवळजवळ 24 टक्केच मतं होती.

2014 पासून राष्ट्राध्यक्षपदी असलेले पोरोशेंको यांनी आपला पराभव मान्य केला आहे. पण "मी राजकारण सोडणार नाही," असं ते राजधानी कीवमध्ये आपल्या समर्थकांशी बोलताना म्हणाले.

तीन आठवड्यांपूर्वी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ते सर्वांत आघाडीवर होते. त्यावेळी 39 उमेदवार मैदानात होते.

फोटो स्रोत, Getty Images

झेलेन्स्की पुढची पाच वर्षं युक्रेनचे राष्ट्राध्यक्षपदी राहतील. या पदाचा अर्थातच देशाच्या संरक्षण विभाग आणि परराष्ट्र रणनीतीवर मोठा प्रभाव असतो.

युक्रेन-रशिया संबंधांवर प्रभाव

2014च्या आधी रशियाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्राध्यक्षांविरोधात युक्रेनमध्ये मोठी आंदोलनं झाली होती. त्यानंतर उद्योजक आणि अब्जावधींची संपत्ती असलेले पेरोशेंको राष्ट्राध्यक्ष झाले.

या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर पेरोशेंको म्हणाले होते की, "या निवडणुकीचा निकाल आपल्याला अनिश्चितता आणि भ्रमाकडे घेऊन जाईल."

फोटो स्रोत, EPA

"मी पद सोडतोय. पण मी हे ठामपणे सांगू इच्छितो की कुठल्याही स्थितीत मी राजकारण सोडणार नाही," असंही पोरोशेंको यावेळी म्हणाले.

मालिकेत अपघातानं झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा..

41 वर्षांचे व्होलोदिमीर झेलेन्स्की राजकीय नर्मविनोदी नाटकातील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. 'सर्व्हंट ऑफ द पीपल' नावाच्या या मालिकेत ते एक पात्र साकारतात, जे अपघातानं अचानक युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षपदी विराजमान होतं.

त्यांनी आपल्या शोच्याच नावावर बनवलेल्या राजकीय पक्षाकडूनच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली.

झेलेन्स्की यांच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नाही. आपण इतर उमेदवारांपेक्षा कसे वेगळे आहोत, हेच त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला पटवून दिलं.

कुठलीही ठोस रणनीती किंवा इतर गोष्टी त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात समोर आणल्या नाहीत. तरीसुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानात 30 टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेरोशेंको यांना 15.95 टक्के मतं मिळाली होती.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचं नाव युरोपच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत गणलं जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)