श्रीलंका : 'नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील स्फोटांचा दाखला देत मतं मागणं दु:खद'

श्रीलंका स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटांत 290 जणांचा बळी गेला. या घटनेचा निषेध करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दहशतवाद संपवण्यासाठी भाजपला मतदान करा,' असं आवाहन केलं आहे.

राजस्थानातील चित्तोगड इथं प्रचारसभेत त्यांनी श्रीलंकेतील घटनेचा दाखला दिल्यावरून श्रीलंकेत संताप व्यक्त होत आहे. मोदी आणि भाजप समर्थक श्रीलंकेतील स्फोटांचा वापर लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या लाभासाठी करत आहेत, अशी टीका ट्विटरवर केली जात आहे.

पंतप्रधान मोदी यांचं हे भाषण बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं आहे.

या संकट काळात आम्ही श्रीलंकेसोबत आहोत, असं म्हणत ते म्हणाले. "मोदीशिवाय दहशतवादाचा सामना करणारा दुसरा कुणी आहे का," असा प्रश्न त्यांनी विचारला.

फोटो स्रोत, Reuters

तर भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, "श्रीलंकेतील दहशतवादी घटनेनंतर आपल्याला भाजप सरकारची जास्तच गरज आहे. काँग्रेस दहशतवाद्यांचा स्नेही पक्ष आहे. आता दिग्विजय सिंग कोलंबोत जे घडलं ते हिंदू दहशतवाद आहे, असं म्हणतील."

याला उत्तर देताना श्रीलंकेतील ब्लॉगर इंडी समरजिवा म्हणतात, "श्रीलंकेतील घटना किती कमी वेळात भारतासाठी निवडणुकीचं खाद्य बनली. आमचा देश दुःखात आहे आणि तिथली माध्यम आणि राजकारणी (भाजप) सहकार्य करत नाहीत."

रुटगर्स युनिर्व्हसिटीतील सहाय्यक प्राध्यापक ऑड्री ट्रुश्की म्हणतात, "या दुःखद घटनेनंतर दहशतवादी घटनेचा असा वापर समजण्याच्या पलीकडे आहे."

अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्यन लिहितात शेजारच्या देशातील दुःखद घटनेचा राजकीय वापर खालच्या पातळीवरच आहे.

श्रीलंकेतील अरुणी अबेयेसुंदर लिहितात, "स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ज्या प्रकारे भारतीय माध्यमं आणि राजकीय नेते वर्तणूक करत आहेत ते धक्कादायक आहे."

तर फैय्याज महरूफ लिहितात, "भारतातील माध्यमं या घटनेचं वार्तांकन मोदींना लाभ व्हावा अशा प्रकारे करत आहेत. मोदींनी स्वतः याचा वापर प्रचारात केला, हे खालच्या पातळीवरचं आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)