श्रीलंका साखळी बाँबस्फोट: ईस्टर संडे हल्ल्यांमधून भारताने काय धडा घ्यावा?
- बीबीसी मॉनिटरिंग
- नवी दिल्ली

फोटो स्रोत, Reuters
श्रीलंकेत झालेल्या साखळी हल्ल्यांमध्ये अडीचशेहून अधिक लोकांनी जीव गमावले आहेत.
श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण साखळी स्फोटांने आशियासह अख्ख्या जगातून हळहळ व्यक्त होते आहे. या हल्ल्याचं भारतावर काय पडसाद उमटू शकतात, याचा आढावा भारतीय वर्तमानपत्रांनी घेतला आहे.
ईस्टर संडेदिनी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांनी जीव गमावला होता. यामध्ये 35 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. पाचशेहून अधिक नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत.
या साखळी स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (IS) या कट्टरतावादी संघटनेने स्वीकारली असल्याचं वृत्त रॉयटर्स आणि AFP वृत्तसंस्थांनी दिलं आहे.
यापूर्वीही इस्लामिक स्टेटने अशा हल्ल्यांची जबाबदारी हल्ल्यानंतर लगेचच घेतली आहे आणि हल्लेखोरांचे फोटो त्यांच्या 'अमाक' या पोर्टलवर टाकले आहेत. पण या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याची खात्रीलायक आणि स्वतंत्र माहिती बीबीसीकडे नाही.
कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र फार परिचित नसलेली 'नॅशनल थोहीथ जमात', ही संघटना या हल्ल्यांमागे असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या हल्ल्याप्रकरणी 40 जणांना अटक केली आहे.
कोलंबोत हल्ला होऊ शकतो, अशा स्वरूपाची माहिती भारत सरकारने आधीच श्रीलंकेला दिल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यांसंदर्भात पूर्वकल्पना असल्याचं श्रीलंकेनं मान्य केलं आहे.
गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतरही कार्यवाही का करण्यात आली नाही, यासंदर्भात श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेत हल्ल्यानंतरचं दृश्य
हल्ल्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, असा सवाल श्रीलंकेतील वर्तमानपत्रांनी केला आहे. 22 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याचा आदेश श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.
2009 मध्ये श्रीलंकेतील यादवी युद्ध संपल्यानंतरचा हा सगळ्यांत मोठा हल्ला आहे.
22 एप्रिलला भारतातील विविध वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या संपादकीयांचा हा अंश.
मुंबई हल्ल्याशी साधर्म्य?
"श्रीलंकेत असा हल्ला होणं हे अतिशय चिंतेचं कारण आहे, कारण भारत आणि श्रीलंकेचे संबंध चांगले आहेत. 1993 मध्ये मुंबईत झालेले दहशतवादी हल्ले आणि श्रीलंकेत झालेले हल्ले यांच्यात साधर्म्य आहे. त्या घटनेनंतर दहशतवादाची नेमकी व्याख्या काय, यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचं एकमत झालेलं नाही," असं दैनिक जागरणने संपादकीयमध्ये म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेतील हल्ल्यानंतरचं दृश्य
"मुंबईत 26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यांची आठवण होणं साहजिक आहे. पाकिस्तानकडून दक्षिण आशियाई देशांमध्ये असे हल्ले घडवले जातात. श्रीलंकेतील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसेल, अशी आशा आहे," असं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
"यादवी युद्धानंतरच्या दहा वर्षात श्रीलंकेने शांततेसाठी प्रयत्न केले. मात्र या हल्ल्यांनी या प्रयत्नांना चांगलंच धुडकावून लावलं आहे. कट्टरतावादाविरुद्ध आपलं कवच काढल्यावर काय होतं, हा मोठा धडा यातून भारतासाठी आहे."
तर हिंदुस्तान या हिंदी वृत्तपत्राने म्हटलं आहे की "श्रीलंकेतलं वातावरण अस्थिर होणं, हे भारतासाठी धोकादायक आहे. दक्षिण आशियात जात-पंथ-धर्म यांच्या माध्यमातून घडवून आणल्या जाणाऱ्या हिंसेचं प्रमाण प्रचंड आहे. हा सखोल तपासाचा मुद्दा आहे. हे हल्ले का घडवून आणण्यात आले, याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे."
जातीयवादी हिंसा भडकावण्याचा उद्देश
"काही काळापासून श्रीलंका काही अंतर्गत राजकीय पेचात गुरफटला होता. आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाने काही लक्षवेधी काम केलेलं नाही. मग एखाद्या नव्या किंवा जुन्या संघटनेने या निष्क्रीय परिस्थितीचा गैरफायदा घेतला आहे का? राजकीय अस्थिरता तसंच देशात सक्षम प्रशासन नसल्याचा फटका श्रीलंकेला बसला आहे. अनागोंदीसदृश परिस्थितीमुळे कट्टरतावादी संघटनांना हातपाय रोवण्यास वेळ मिळाला," असं दैनिक जागरणने म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेतील हल्ल्यानंतरचं दृश्य
"हे हल्ले अचानक झालेले नाहीत. श्रीलंकेच्या पोलीसप्रमुखांनी दहा दिवसांपूर्वी देशभरात अलर्ट जारी केला होता. मात्र तरीही या हल्ल्याचे सूत्रधार तपास यंत्रणांच्या हाती लागू नयेत, हे कट्टरतावाद्यांच्या चोख संयोजनाचं, अंमलबजावणीचं आणि संसाधनांच्या उपलब्धतेचं उदाहरण आहे. ईस्टरच्या निमित्ताने चर्चमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक येतात. हल्ल्यांसाठी चर्च हे ठिकाण निवडणं धार्मिक उद्देश सूचित करतो," असं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
"हे लक्षात घ्यायला हवं की हा वेगळ्या प्रकाराचा हिंसाचार आहे. विशिष्ट समाज किंवा धर्म-पंथाला लक्ष्य करून हिंसा घडवण्याचा हा नवा प्रकार आहे. हा केवळ श्रीलंकेसाठी धडा नसून दक्षिण आशियाई देशांना सावध होऊन काळजी घेण्याचा इशारा आहे," असं हिंदुस्तानने म्हटलं आहे.
"श्रीलंकेतील धार्मिक तेढीचं एक कारण म्हणजे एक कट्टर सिंहला बौद्ध धर्मगुरू जे मुसलमान आणि ख्रिश्चनांविरुद्ध (मग ते तामिळ असोत वा सिंहली) प्रक्षोभक भाषा वापरतात. त्यामुळे ही सामाजिक परिस्थिती अशी स्फोटक बनली आहे. अर्थात आजवर त्यामुळं मोठं संकट ओढवले नव्हतं. पण एवढा भीषण दिवस श्रीलंकेच्या इतिहासात यावा, त्यातही अनेक परदेशी नागरिकांचा, पर्यटकांचा मृत्यू व्हावा, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असं एशियन एजने म्हटलं आहे.
"वारंवार इशारा मिळूनही चर्चवरील हल्ला रोखता आला नाही. ईस्टर संडेच्या दिवशी चर्चमध्ये हजारो भाविक जमणार हे माहिती असतानाही कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवण्याला प्राधान्य देण्यात आलं नाही. तपशीलवार तपासानंतरच या हल्ल्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट होईल. अल्पसंख्याकांसाठी श्रीलंकेतलं वातावरण किती असुरक्षित आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे.
"श्रीलंकेच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी हपापलेली वृत्तीच या हल्ल्यासाठी कट्टरतावाद्यांना खतपाणी देते," असं अमर उजालाने म्हटलं आहे.
"हल्ल्यांचं स्वरूप, वापरण्यात आलेली स्फोटकं आणि हल्ला घडवून आणण्यासाठीचं नियोजन बघता हे केवळ सूडापोटी केलेलं नाही," असं जनसत्ताने म्हटलं आहे.
"हल्ल्यांचं स्वरूप बघता आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना यामागे असल्याचं स्पष्ट होतं. इस्लामिक स्टेट अर्थात IS सारख्या संघटना जगभरात इस्लामिक कट्टरता पसरवत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. मुस्लीम अल्पसंख्याक समाजावर ज्या देशांमध्ये हल्ले होतात, त्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करणं, अशा संघटनांना सोपं जातं. श्रीलंकेला अशा पद्धतीने पिंजून काढत त्यांनी हल्ले घडवून आणले असावेत," असं जनसत्ताने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)