श्रीलंका : बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर दुखवटा

मृतांची संख्या 310 वर, 500हून अधिक जखमी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

मृतांची संख्या 310 वर, 500हून अधिक जखमी

श्रीलंकेला हादरवून सोडणाऱ्या रविवारच्या आत्मघातकी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 310 झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात बळी गेलेल्यांवर सामूहिक दफनविधी करण्याचा पहिला टप्पा आज पार पडला. देशभरात तीन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात आणीबाणीदेखील लागू करण्यात आली आहे.

ईस्टर संडेला झालेल्या या साखळी स्फोटांची जबाबदारी तीन दिवसांनंतर इस्लामिक स्टेटने (IS) या कट्टरतावादी संघटनेने स्वीकारली आहे. रॉयटर्स आणि AFP वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे.

यापूर्वीही इस्लामिक स्टेटने अशा हल्ल्यांची जबाबदारी हल्ल्यानंतर लगेचच घेतली आहे आणि हल्लेखोरांचे फोटो त्यांच्या 'अमाक' या पोर्टलवर टाकले आहेत. पण या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याची खात्रीलायक आणि स्वतंत्र माहिती बीबीसीकडे नाही.

नॅशनल ताहिद जमात (NTG) या स्थानिक कट्टरतावादी इस्लामिक गटाने हे स्फोट घडवल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 40 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

उत्तर कोलंबोमधल्या नेगोम्बो भागातील सेंट सबॅस्टियन चर्च परिसरात आज सामूहिक दफनविधी करण्यात आला. या चर्चमध्येदखील रविवारी बॉम्बस्फोट झाला होता.

आज सकाळी बरोबर 8.30 मिनिटांनी मौन पाळत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारी याच वेळी पहिला स्फोट झाला होता.

हल्ल्यातील मृत आणि जखमींच्या सन्मानार्थ श्रीलंकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवत लोकांनी मान वाकवून मौन पाळलं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

नेगोम्बोमधल्या सेंट सबॅस्टियन चर्चमध्ये सामूहिक दफनविधी

आणीबाणी लागू करण्यात आल्याने पोलीस आणि लष्कर कोर्टाच्या आदेशाशिवाय संशयिताला अटक करून त्याची चौकशी करू शकतात. यापूर्वी श्रीलंकेतील गृहयुद्धादरम्यान असे अधिकार देण्यात आले होते.

बॉम्बस्फोटांनंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा खंडित करण्यात आली आहे.

सरकारने NTGला मुख्य संशयित घोषित केलं असलं तरी या गटाने यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवल्याचा इतिहास नाही. गेल्या वर्षी एका बुद्धमूर्तीची नासधूस केल्याने या कट्टरतावादी गटाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.

मात्र, NTG किंवा इतर कुठल्याच संघटनेने रविवारच्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही.

बॉम्बस्फोटांवरून आरोप-प्रत्यारोप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

देशभरात आणीबाणी लागू

घातपाताची पूर्वसूचना मिळूनदेखील कुठलीच कारवाई करण्यात आली नाही, यावरून सध्या श्रीलंकेत वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांचे वरिष्ठ सल्लागार शिराल लकथिलाका यांनी बीबीसीला सांगितले की सरकारकडून काही चूक झाली आहे का, याची चौकशी करण्यात येईल.

याआधी श्रीलंकेचे मंत्रिमंडळ प्रवक्ते रजित सेनारत्ने यांनी पत्रकारांना सांगितले की आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला होता. मात्र, ही माहिती पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्यापर्यंत पोचलीच नाही.

कोण ठरले बळी?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये ठार झालेल्यांमध्ये बहुतांश श्रीलंकेचे नागरिक आहेत. यात ईस्टर संडेनिमित्त चर्चेमध्ये गेलेल्या ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी आहे.

दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 31 परदेशी नागरिक आहेत, यापैकी 14 जणांची ओळख अजून पटू शकलेली नाही, अशी माहिती श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. मृतांमध्ये 8 ब्रिटीश नागरिक आणि 8 भारतीयांचाही समावेश आहे.

याव्यतिरिक्त हल्ल्यात डेन्मार्कचे अब्जाधीश अँड्रेस होल्क पोव्लसन यांची तीन मुलं ठार झाली. पोव्लसन डेन्मार्कचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तिथल्या अॅसोस या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीचे ते मालक आहेत.

ब्रिटीश वकील असलेल्या अनिता निकोलसन आणि अॅलेक्स (14) आणि अॅनाबेल (11) ही त्यांची दोन मुलंदेखील या हल्ल्यात मारली गेली. कोलंबोमधल्या शांग्री-ला या हॉटेलमध्ये नाश्त्याच्या वेळी करण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात हे तिघे ठार झाले. हल्ल्यातून अनिताचे पती बेन निकोलसन हे मात्र बचावले.

दरम्यान, चीनने मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध करत आपल्या नागरिकांना नजिकच्या भविष्यात श्रीलंकेला जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. तर अमेरिकेनेदेखील रविवारीच अशी सूचना जारी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)