Samsung Galaxy Fold: सॅमसंग फोल्डिंग स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये बिघाड, लाँच पुढे ढकलला

फोल्डिंग स्मार्टफोनचं सर्वसामान्यांसाठीचं स्वप्न सॅमसंगने थोडं लांबणीवर टाकलं आहे. एका पुस्तकाप्रमाणे फोल्ड करता येणारा हा स्मार्टफोन उघडल्यावर एका छोट्या टॅबलेटसारखा काम करू शकतो, अशी याची संकल्पना आहे.
पण या मोबाईलची स्क्रीन निकामी होत असल्याची त्रुटी अनेक टेकनॉलॉजी समीक्षकांनी सोशल मीडियावर सांगितली आहे. त्यामुळे या फोनचा लाँच पुढे ढकलण्यात आला आहे.
"गॅलॅक्सी फोल्ड या मोबाईलचा लाँच आम्ही लांबणीवर टाकला आहे. आम्हाला मिळालेल्या फीडबॅकवर आम्ही काम करत आहोत. काही अंतर्गत चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा मोबाईल बाजारात लाँच केला जाईल," असं कंपनीनं म्हटलं आहे.
हा मोबाईल विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल, याविषयी कंपनीनं अजून काही म्हटलेलं नाही, पण त्याची तारीख "लवकरच" जाहीर करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी रिव्ह्यूसाठी देण्यात आलेल्या एका गॅलॅक्सी फोल्डचा डिस्प्ले अवघ्या काही दिवसांत बिघडला होता. काही समीक्षकांनुसार दोन्ही स्क्रीन जोडणाऱ्या कब्जे (किंवा बिजागरं) वरच्या आणि खालच्या बाजूला बिघडल्याचा संशय आहे, असं सॅमसंगनं पत्रकात म्हटलं आहे.
या मोबाईल्सपैकी एकामध्ये "काही पदार्थ" सापडले आहेत, ज्यामुळे या स्मार्टफोनच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असं कंपनीनं म्हटलं आहे.
हा फोन हाँगकाँग आणि शांघायमध्ये लाँच होणार होता, पण आता तो लांबणीवर गेला आहे. US मध्ये हा फोन 26 एप्रिल तर UKमध्ये 3 मेला बाजारात येणार होता.
काही लोकांनी या स्क्रीनवरची प्रोटेक्टिव्ह लेयर स्क्रीनगार्ड समजून काढून टाकली, त्यामुळे हा बिघाड होऊ शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.
"ज्या मोबाईल्सची स्क्रीन बिघडली होती, त्यात नेमकं काय झालं होतं, याची चौकशी सुरू आहे," असं दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. "या मोबाईलची काळजी कशी घ्यावी, याविषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. तसंच प्रोटेक्टिव्ह लेयर वापरून डिस्प्ले कसा वापरायचा हेही सांगणार आहोत," असं सॅमसंगनं पत्रकात म्हटलं आहे.
कंपनीचे प्रतिस्पर्धी हुआवे आणि शाओमी हेसुद्धा फोल्ड करता येणारे स्मार्टफोन तयार करत आहेत, असं वृत्त आहे. पण कोणत्याही कंपनीनं आतापर्यंत हे फोन बाजारात कधी येतील, हे सांगितलं नाही.
विश्लेषण - ख्रिस फॉक्स, तंत्रज्ञान बातमीदार
जवळजवळ 1,980 डॉलर किंवा 1.64 लाख रुपयांच्या अंदाजे किमतीचा एखादा स्मार्टफोन सामान्य जनता खरेदी करण्याची शक्यता कमीच होती.
पण गॅलॅक्सी फोल्ड बाजारात आणून सॅमसंग स्वतःला एक सर्जनशील आणि भविष्याचा विचार करणारी कंपनी म्हणून लोकांपुढे मांडत आहे, त्यांना आपल्या शोरूम्समध्ये येण्यास आकर्षित करत आहे.
पण अशा तक्रारी येत असल्यामुळे सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट 7च्या लाँचवेळी झालेल्या जुन्या जखमेवरच्या खपल्या पुन्हा निघाल्या आहेत.
गॅलॅक्सी नोट 7 या फोनच्या बॅटरीमध्ये काही बिघाड होत असल्यामुळे त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. तेव्हा या फोनवर बाजारात बंदी आली होती आणि कंपनीला तो बाजारातून काढून टाकावा लागला होता.
फोटो स्रोत, SAMSUNG
फोल्डिंग मोबाईलचा लाँच करण्यात सॅमसंग कंपनी हुआवे कंपनीबरोबर शर्यतीत होती. हुआवेने फोल्ड होणारे स्मार्टफोन आणत असल्याचं जाहीर केलं आहे, पण कुठलाही फोन अद्याप लोकांच्या हाती आलेला नाही.
दोन्ही कंपन्यांनी म्हटलंय की त्यांचे फोल्डिंग फोन्स कुठेही तडा न जाता एक लाख वेळा उघडता-बंद करता येऊ शकतात. पण प्रत्यक्षात 48 तासांच्या आता समीक्षकांनी सॅमसंगची स्क्रीन तकलादू असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पण सध्या तरी गॅलॅक्सी फोल्डला आणखी चाचण्यांमधून जाणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)