श्रीलंका स्फोटः 'गुप्तचर यंत्रणांकडून मोठी चूक झाल्याची कबुली'

श्रीलंका

फोटो स्रोत, Reuters

भारतीय गुप्तचर संस्थांनी हल्ल्याच्या एक महिनाआधीच त्याची कल्पना दिली होती. तरीही ही माहिती योग्य सरकारमधल्या योग्य व्यक्तींना दिली नाही, असं श्रीलंकन संसदेत सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो आणि पोलीस प्रमुख पी जयसुंदरा यांना हटवलं आहे.

आतापर्यंत नऊ हल्लेखोरांना ओळखण्यात आलं आहे. ते सगळे श्रीलंकेचे आहेत.

श्रीलंकेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

यामध्ये 3 चर्च आणि 4 हॉटेलांमध्ये स्फोट घडवण्यात आले. आतापर्यंत 24 संशयित ताब्यात घेतले आहेत. हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा सहभाग होता का, याची श्रीलंकन सरकार चौकशी करत आहे.

हल्लेखोरांपैकी एकजणाने UK आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलं होतं.

गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार चार प्रकारे हल्ले होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं. आत्मघातकी, हत्यारांसह, विस्फोटकांचा ट्रक घुसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा चाकू हल्ला होऊ शकतो. इतकंच नव्हे तर यात काही संशयितांची नावंही होती. तसंच त्यांचे टेलिफोन नंबरही देण्यात आले होते. गुप्तचर यंत्रणांकडे हा रिपोर्ट होता पण त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना नव्हती, असं श्रीलंकेचे माहिती प्रसारण मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितलं.

सरकारी यंत्रणांकडून कोणती मोठी चूक झाली?

"आपण जबाबदारी स्विकारायला पाहिजे. कारण संवेदनशील माहिती जर का योग्य व्यक्तींसोबत शेअर केली असती तर हा हल्ला टाळता आला असता किंवा त्याची तीव्रता कमी केली असती," असं श्रीलंकेचे उप संरक्षण मंत्री रुवान विजयवर्धने यांनी म्हटलं आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणुनबून ही माहिती सांगितली नाही, असा आरोप श्रीलंकेच्या संसदेचे विरोधी पक्षनेते लक्ष्मण किरिएल्ला यांनी केला आहे.

हल्ल्याची माहिती असतानाही सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतंही पाऊल का उचचलं नाही? असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या गुप्तचर संस्थेकडून याबाबत 4 एप्रिल रोजीच माहिती देण्यात आली होती, पण ही माहिती राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना देण्यात आली नाही, असं ते पुढं म्हणाले.

हल्लेखोरांविषयी आतापर्यंत काय कळालं?

या हल्ल्यामागचा संशयित म्होरक्या झहरान हाशिम याविषयी आतापर्यंत काहीही माहिती हाती लागली नाही.

इस्लामिक स्टेटनं रिलीज केलेल्या व्हीडिओमध्ये झहरान दाखवण्यात आला आहे. पण पोलिसांना त्याच्याविषयी अजून काहीच पत्ता लागलेला नाही.

झहरानची बहीण मोहम्मद हाशिम मदानियाने बीबीसीला सांगितलं, "त्याच्या कारस्थानाबद्दल मला मीडियामधूनच कळलं. तो असं काही करेल यावर मला काही क्षण विश्वासच बसला नाही. मला त्याची घृणा येतेय. तो माझा भाऊ असला तरी हे त्याच्याकडून अपेक्षित नाही. मला त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही."

'हल्लेखोर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातले'

"बहुतेक हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले आहेत," असं श्रीलंकेचे संरक्षणमंत्री आर विजयवर्धने यांनी सांगितंल आहे.

बीबीसीचे संरक्षण विषयातले प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण

हल्लेखोर हे सुशिक्षित आणि मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग घरातले असणं ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही.

गरिबी आणि बेरोजगारीमुळं अनेक तरूण कट्टरवादी विचारांकडे वळतात. पण आरामदायी आणि चांगलं जीवन सोडूनही काहीजण हिंसेकडं वळलेले दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेवर 9/11चा हल्ला करणाऱ्यांपैकी झियाद जराह हा लेबॉनॉनमधल्या सधन कुटुंबातला होता. त्यानेच United Airlines flight 93चे हल्ल्यासाठी अपहरण केलं होतं.

इस्लामिक स्टेटचं काम करणारा मोहम्मद एम वाझी उर्फ जिहादी जॉन याने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर ISमध्ये सहभागी झालेले अनेक युरोपीय तरूण हे उच्च शिक्षित आहेत. अल-कायदाची स्थापन करणारा ओसामा बिन लादेन हाही सधन घरातला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)