मृत्यूच्या अफवेनंतर 5 वर्षांनी आलाय अल-बगदादीचा नवा व्हीडिओ

अबु बकर अल-बगदादी Image copyright AFP
प्रतिमा मथळा अबु बकर अल-बगदादी

इस्लामिक स्टेटनं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमधील व्यक्ती ही अबु बक्र अल-बगदादी असल्याचा खळबळजनक दावा स्वत: संघटनेनंच केला आहे.

जर या व्हीडिओविषयी करण्यात आलेले दावे खरे असतील तर तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला बगदादीचा हा पहिलाच व्हीडिओ असेल.

बगदादी जुलै 2014मध्ये शेवटचा दिसला होता. त्यानंतर आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा शेवटचा गड बागुज त्यांच्या हातातून निसटल्याचं बगदादी मान्य करत असल्याचं दिसतं.

हा व्हीडिओ इस्लामिक स्टेटच्या मीडिया नेटवर्क अल-फुरकानवर पोस्ट करण्यात आला आहे.

एप्रिलमध्ये पोस्ट करण्यात आलेला हा व्हीडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला याबाबतची माहिती नाही.

Image copyright AFP

या व्हीडिओमध्ये बगदादी हा इस्लामिक स्टेटचा गड राहिलेल्या बागुजविषयी सांगतांना दिसतो. तसंच त्याने श्रीलंकामध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इराकचं शहर बागुजमध्ये इस्लामिक स्टेटचा खात्मा झाल्याने त्याचा बदला म्हणून श्रीलंकामध्ये ईस्टर संडेला हल्ले करण्यात आल्याचं बगदादी यात सांगतोय.

असं असलं तरी या व्हीडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.

अबु बक्र अल-बगदादी व्हीडिओत नेमका काय म्हणाला?

इराकमधल्या बागुज शहराचा पाडाव केल्याचा बदला म्हणून इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत बाँबस्फोट केल्याचं, बगदादी व्हीडिओमध्ये म्हणाला आहे.

याआधी इस्लामिक स्टेटनं श्रीलंका बाँबस्फोटांची जबाबदारी घेत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. पण त्यामध्ये इराकच्या शहराचा संदर्भ दिलेला नव्हता, असं बीबीसीच्या इस्लामिक कट्टरवादाच्या अभ्यासक मिना अल-लामी यांनी म्हटलं आहे.

बुर्कीना फासो आणि मालीमधल्या कट्टरवाद्यांना आपण पाठिंबा देत त्यानं या व्हीडिओत म्हटलं आहे.

तसंच सुदान आणि अल्जेरिया आंदोलनाविषयी बगदादीनं चर्चा केली आहे. 'जुलुमी' राजवट संपवण्यासाठी 'जिहाद' हा एकच मार्ग असल्याचं बगदादी तो व्हीडिओमध्ये सांगतो.

या दोन्ही देशात तिथली राजवट लोकांनी उलथवून टाकली आहे. या दोन्ही घटना गेल्या एक-दोन महिन्यातच घडल्या आहेत.

पण व्हीडिओच्या शेवटी बगदादी दिसत नाही. त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. त्यावेळी तो श्रीलंका हल्ल्यांची चर्चा करतो. यावरून शेवटचा भाग काही काळानंतर रेकॉर्ड केला असावा.

Image copyright AFP

इस्लामिक स्टेटच्या पाडावापासून जगाचं लक्ष हटावण्यासाठी तो समोर आला असावा, असं बीबीसीचे मध्य-पूर्वचे प्रतिनिधी मार्टीन पेशन्स यांनी म्हटलं आहे.

पण 18 मीनिटांच्या या व्हीडिओमध्ये तो पुढची रुपरेषा सांगत आहे. "बागुजची लढाई संपली आहे. यानंतर आणखी लढाया समोर ठाकल्या आहेत," असं तो सांगतो.

इस्लामिक स्टेट "सर्वनाशाची लढाई लढत आहे," असं तो पुढे सांगतो.

बीबीसीचे आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे प्रतिनिधी फ्रॅंक गार्डनर यांच्यानुसार, या व्हीडिओचा उद्देश हा पराभवानंतरही इस्लामिक स्टेट संपलेली नाही हे दर्शवून देण्याचा आहे. याशिवाय डोक्यावर अडीच कोटी अमेरिकन डॉलर बक्षीस असलेला त्यांचा नेता अबु बक्र अल-बगदादी अद्यापही जीवंत असून त्याला पकडण्यात आलेलं नाही हेही जगाला दाखवून द्यायचं आहे.

मूळ इराकचा रहिवासी असलेल्या बगदादीचं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बदरी आहे. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आलेल्या एका ऑडियो मॅसेजमध्येही बगदादीचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता.

18 मिनिटांच्या या ताज्या व्हीडिओमध्ये बगदादीचं म्हणणं आहे की, "बागुजचं युद्ध संपलं असून या युद्धानंतर बऱ्याच गोष्टी घडायच्या अद्याप बाकी आहेत."

काही वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट ऐन भरात असताना इराक-सीरियाच्या सीमेवरील एक मोठा हिस्सा त्यांच्या ताब्यात होता.

कुर्दीश नेतृत्व असलेल्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने दावा केला आहे की इराकचं बागुज शहरही आता त्यांच्या नियंत्रणात आलं आहे.

कोण आहे अबु बक्र अल-बगदादी?

बगदादीचा जन्म 1971ला बगदाद शहराच्या उत्तरेला असलेल्या समारा इथं झाल्याचं सांगितलं जातं.

काही जुन्या बातम्यांनुसार 2003मध्ये जेव्हा अमेरिकन सैन्य इराकमध्ये आलं होतं, तेव्हा बगदादी हा शहरातल्या एका मशीदमध्ये मौलवी होता.

2014च्या बातम्यांनुसार, इस्लामी कट्टरपंथीय संघटना 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम'ने (ISIS) इराक आणि सीरियात त्यांच्या ताब्यात असलेल्या भूभागाला 'खिलाफत' म्हणजेच इस्लामिक राज्य घोषित केलं होतं.

या संघटनेनं अबू बकर अल-बगदादी याला 'खलीफा' म्हणजेच जगातील मुस्लीमांचा नेता घोषित केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या