व्हिएतनाम राष्ट्राध्यक्ष ट्राँग कुठे आहेत? तीन आठवड्यांपासून बेपत्ता

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ग्युएन फू ट्राँग

गेल्या शुक्रवारी व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष ली ड्यूक अन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा विद्यमान राष्ट्राध्यक्ष ग्युएन फू ट्राँग यांची अनुपस्थिती सर्वांच्या लक्षात आली.

राष्ट्राध्यक्ष ट्राँग यांची प्रकृती ठीक तर आहे ना, अशी काळजी लोकांना वाटू लागली आणि आता देशात अफवांचं पीक आलं. त्याला कारणही तसंच आहे - गेल्या तीन आठवड्यांपासून राष्ट्राध्यक्ष ग्युएन फू ट्राँग सार्वजनिक जीवनातून गायब आहेत.

गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना कुणीही बघितलेलं नाही. 14 एप्रिल रोजी 75 वर्षांचे ट्राँग एका बैठकीसाठी दक्षिण व्हिएतनामच्या केईन गियांग प्रांतात गेले होते. तिथेच त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

या घटनेपासून पत्रकारांनी अनेकदा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनेच्या तब्बल दोन आठवड्यांनंतर सरकारी प्रवक्त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

खराब हवामान आणि कामाचा अतिताण यामुळे राष्ट्राध्यक्षांची तब्येत बिघडल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ते लवकरच आपला कार्यभार पुन्हा सांभाळतील, असं आश्वासनही देण्यात आलं.

मात्र व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष ली ड्यूक अन यांच्या अंत्यसंस्कारालाही ते आले नाही आणि चर्चांना उधाण आलं.

ली ड्यूक अन यांनी 1975 सालचं व्हिएतनाम युद्ध तसंच 1970 आणि 1980 साली कंबोडियाविरोधातल्या लढाईमध्ये सेनाध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं. शिवाय 1990 साली राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेबरोबर राजनयिक संबंध प्रस्थापित करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष ट्राँग उपस्थित राहणार होते. मात्र ते आलेच नाही आणि ते का आले नाही, याबद्दल कसलीच माहिती मीडियाला देण्यात आली नाही.

Image copyright Reuters

जवळपास तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्राँग सार्वजनिक जीवनातून शेवटचे दिसले होते. 'त्यानंतर हृदयविकाराचा हलका झटका आल्यानं त्यांना तातडीने विमानाने हलवण्यात आलं आणि त्यांना त्यांचा एक हातही हलवता येत नसल्याच्या अफवा' पसरल्याचं वृत्त बीबीसी व्हिएतनामीजनं दिलं आहे.

सरकारच्या नियंत्रणात असलेल्या व्हिएतनामची टिव्ही आणि वृत्तपत्रं राष्ट्राध्यक्ष ट्राँग यांचे कंबोडियाच्या सीमेजवळच्या केईन गियांग प्रातांत माशांच्या शेतीला भेट देतानाचे जुने फुटेज दाखवत आहेत.

सरकारी मीडियाबद्दल व्हिएतनामच्या जनतेत संभ्रम आहे. त्यातच सरकारने नुकताच सरकारच्या संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेविषयी नवा कायदा आणलाय. त्यामुळे तर जनतेचा विश्वास अधिकच उडाला आहे.

व्हिएतनाम एकपक्षीय सरकारच्या हातात स्थिर असल्याचं भासवण्यासाठी पक्षाचे नेते आणि सरकारी पदाधिकाऱ्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जात असल्याचं बोललं जातं.

Image copyright Getty Images

व्हिएतनाममध्ये 3.5 कोटी फेसबुक युजर्स आहेत. या घटनेनंतर योग्य बातमी देण्यात यावी, यासाठी अनेकांनी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. काहींनी तर पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतली भूमिका आणि चीनचा वाढता प्रभावा रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्राँग यांनी उचलेली पावलं यांचा उल्लेख करत त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

हाँग लॅन यांनी बीबीसीच्या फेसबुक पेजवर लिहिलंय, "त्यांचं आरोग्य उत्तम राहावं जेणेकरून ते पुन्हा देशाचं नेतृत्व करू शकतील, यासाठी मी प्रार्थना करतो. विशेषतः अजूनही सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी. "

ते पुढे लिहितात, "त्यांचा मृत्यू झाल्यास व्हिएतनाममध्ये गोंधळ उडेल. भ्रष्टाचाराविरोधात लढावं की नाही, असा पेच त्यांना पडला होता. कारण भ्रष्टाराविरोधात लढा दिला नसता तर लोकांचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वास उडाला असता आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलली असती तर त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले असते."

ग्युएन ट्रंग केईन यांनी म्हटलंय, "ट्राँग यांच्या अनुपस्थितीमुळे व्हिएतनाम कमकुवत होईल आणि याचा फायदा चीनला होईल."

Image copyright Getty Images

राष्ट्राध्यक्ष ट्राँग यांच्या प्रकृतीविषयी यापूर्वी कधीही नव्हे इतकी गुप्तता पाळली जातेय. गेल्या ऑक्टोबरमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रान डाय क्वांग यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर ट्राँग नवे राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र क्वांग यांना नेमका कुठला आजार होता, हे अजूनही कळू शकलेलं नाही.

व्हिएतनामचे अध्यक्ष ट्राँग यांची तुलना बरेचदा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी केली जाते, कारण दोघेही सत्ताधारी पक्षाचे प्रमुख तसंच राष्ट्राध्यक्ष आहेत.

एक वयोवृद्ध आणि रुढीवादी प्रतिमा नेता असूनही त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक माजी मंत्री आणि माजी पोलीस अधिकारी तुरुंगात गेले.

त्यांच्या प्रकृतीविषयी ज्या अफवा पसरल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या सद्यपरिस्थितीची तुलना व्हिएतनाममध्ये क्रांती घडवणारे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक हो ची मिन्ह यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांशी होऊ लागली आहे.

हो ची मिन्ह यांना 1966मध्ये असाच हृदयविकाराचा हलका झटका आला होता. त्यात त्यांचाही एक हात निकामी झाला होता. 1969मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)