उत्तर कोरियाकडून 5 दिवसात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी - दक्षिण कोरिया

North Korean leader guides strike drill in the East Sea of Korea on 4 May. Image copyright EPA/KCNA

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यात व्हिएतनाममध्ये चर्चा झाली होती.

उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रम रद्द करावा, असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. तर अमेरिकेने घातलेले निर्बंध उठवावे, अशी किम जाँग-उन यांची मागणी होती. चर्चेतूनही ही कोंडी काही फुटली नाही आणि चर्चा कुठल्याच निर्णयाविना बैठक संपली होती.

आता अण्वस्त्रासंबंधी वाटाघाटीतली कोंडी कशी फोडायची याची चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत दक्षिण कोरियात असताना उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली आहे.

अमेरिकेने सवलत द्यावी, यासाठी दबाव आणण्यासाठीची ही खेळी असल्याचा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.

सामरिकदृष्ट्या सज्ज होण्यासाठी उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी करत असल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाने गेल्याच आठवड्यात एक क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती आणि आता पुन्हा दोन लहान पल्ल्याच्या क्षेपणास्रांची चाचणी घेतल्याचा आरोप दक्षिण कोरियानं केला आहे.

क्षेपणास्त्र चाचणीविषयीची माहिती

उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांगपासून जवळपास 160 किमी. अंतरावर असलेल्या कुसाँग येथून स्थानिक वेळेनुसार दुपारी साडे चार वाजता लहान पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागण्यात आलं.

समुद्रात पडण्यापूर्वी दोन्ही क्षेपणास्त्राने जवळपास 50 किमीची उंची गाठली होती. तसंच पहिल्या क्षेपणास्त्राने 420 किमी. तर दुसऱ्या क्षेपणास्त्राने 270 किमीचं अंतर कापलं, अशी माहिती दक्षिण कोरियाने दिली आहे.

उत्तर कोरियाने नोव्हेंबर 2017मध्ये आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी सुरू केली होती.

दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. त्यावर दक्षिण कोरियातल्या मीडियामधून वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्याँगयांगने केलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, अशी माहिती बीबीसीच्या दक्षिण कोरियातल्या प्रतिनिधी लॉरा बिकर यांनी दिली आहे.

निर्बंध शिथिल करण्यासंबंधीचा करार करण्यासाठी आम्ही दाखवत असलेला संयम फार काळ टिकणार नाही आणि लवकरात लवकर करार केला नाही तर किम जाँग-उन यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला 'नवा मार्ग' चोखाळावा लागेल,असा इशारा दक्षिण कोरियाने यापूर्वीच अमेरिकेला दिला होता.

अण्वस्त्र कोंडी

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधली फेब्रुवारीतली चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेतले उत्तर कोरियाचे विशेष प्रतिनिधी स्टिफन बिगन अण्वस्त्राविषयीची चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये दाखल झाले आहेत.

उत्तर कोरियामध्ये सध्या मोठा धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून उत्तर कोरियाला कोणत्या मार्गाने धान्य पुरवठा करता येईल, यावरही ते चर्चा करणार आहे.

आपण अण्वस्त्र चाचणी करणार नाही आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागणार नसल्याचं किम जाँग-उन यांनी म्हटलं होतं.

मात्र, उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच असल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होतं. त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात बसू शकतील, असे छोटे अणुबॉम्ब आणि अमेरिकेच्या धर्तीपर्यंत मारा करू शकतील, असे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने 1950-53च्या कोरियन युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या त्यांच्या जवानांचे पार्थिव अमेरिकेत परत आणण्याचा कार्यक्रमही फेब्रुवारीमधली चर्चा फिस्कटल्यानंतर स्थगित केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)