US-China Trade War: अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धाचं पुढे काय होणार?

शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images

चीनच्या 200 अब्ज डॉलर किमतीच्या मालावर अमेरिकेने शुक्रवारपासून नवे आयात कर लादले आहेत. हा कर आधी 10 टक्के होता, जो आता 25 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकामधला तणाव वाढला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावरील वाटाघाटी सुरू आहेत. शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित होतं. मात्र मूळ प्रस्तावात चीनने काही महत्त्वाचे बदल केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनने या आरोपांचा इन्कार केला आहे.

आता यावर तोडगा काढण्यासाठी चीनतर्फे मध्यस्थ म्हणून लियू ही यांना वॉशिंग्टनला पाठवण्यात आलं आहे. आता शेवटच्या क्षणी चीन आणि अमेरिकेत काही व्यवहार होतोय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

काही करार झाला नाही तर अमेरिका चीनवर मोठ्या प्रमाणात आयात कर लादू शकतं. असं झालं तर सुडाची कारवाई भोगण्याची तयारी ठेवा, असा इशाराही चीनने दिला आहे.

व्यापारावरून पेटलेलेल्या या युद्धाला आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं 'ट्रेड वॉर' म्हणत आहेत.

फायदा नक्की कुणाला?

ट्रंप यांची भूमिका काही मवाळ होताना दिसत नाही. बुधवारी रात्री एका जाहीर सभेत बोलताना ट्रंप म्हणाले की त्यांनी चीनवर कराराच्या मसुद्यात बदल केल्याचा आरोप लावला आणि आयात कर वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यामुळे पुन्हा दोन्ही देशांमधील व्यापारी करार मोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. मात्र असं झालं तर कोणत्या देशाला फायदा होईल?

Image copyright Getty Images

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. अमेरिका नेमका त्याचाच फायदा घेण्याच्या मन:स्थितीत आहे.

चीन सध्या अर्थव्यवस्थेत काही नवे प्रयोग करण्यास उत्सुक नाही. दोन्ही देशात व्यापारातील तोटा 300 अब्ज कोटींचा आहे. दोन्ही देशात 500 अब्ज कोटी डॉलरचा व्यापार होतो. त्यातील बहुतांश माल हा चीनमधून आयात होतो.

व्यापारातील तोट्याचा मुद्दा ट्रंप यांनी याआधीही उचलला होता. मात्र ज्या पद्धतीने ट्रंप प्रशासनाने कडक धोरण अवलंबलं आहे, तसं धोरण आधीच्या प्रशासनाने उचललं नाही.

मात्र दोन्ही देशांत ट्रेड वॉर हे एकमेव कारण नाही. चीन आपलं तंत्रज्ञान चोरतो, अमेरिकेचा गैरफायदा घेऊन व्यापाराचा अधिक लाभ मिळवतो, असंही अमेरिकेला वाटतं.

तंत्रज्ञानाचा झगडा

ट्रंप म्हणतात, "मी एकच असा राष्ट्राध्यक्ष आहे, जो चीनला कोणतीच संधी देत नाही. या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी असं केलं, मात्र मी अमेरिकेचं तंत्रज्ञान कुणालाही देणार नाही."

यामुळेच अमेरिकेने हुआवे या कंपनीवर अमेरिकेत बंदी आणली आहे. अमेरिका चीनची वाढ हर तऱ्हेने थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनसाठी हे खूप वाईट ठरू शकतं कारण युरोपातील देशही अशाच प्रयत्नात आहेत. मात्र युरोपीयन देशांची मूळ काळजी ही तंत्रज्ञानाविषयी आहे. चीनी कंपन्या तंत्रज्ञान चोरतात, असा त्यांचा आरोप आहे.

युरोपीयन कंपन्या जेव्हा चीनला जातात तेव्हा त्यांच्यावर तंत्रज्ञान देण्याचा दबाव आणतात.

Image copyright Getty Images

चीन आणि अमेरिकेत याच एका मुद्द्यावर तिढा आहे, असं नाही.

अमेरिकेने त्यांच्या दोन युद्धनौका नुकत्याच जपान आणि तायवानला पाठवल्या आहेत. दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंधांची हीसुद्धा एक बाजू आहे.

चीनची बाजू थोडी कमकुवत झाल्यामुळे अमेरिकाच नाही तर इतर देशांनीही या संघर्षात उडी घेतली आहे. नुकतंच मलेशियानेही चीनला सुनावलं आहे.

मित्र राष्ट्रांनीही डोळे वटारले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही चीनच्या विरोधी सूर लावला आहे. जेव्हा एखाद्यावर दबाव येतो तेव्हा अनेक जण त्या संधीचा फायदा घेतात.

दबावात असल्यामुळे चीनला अमेरिकाच नाही तर आणखी नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सध्या फिलिपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम शांत आहेत. मात्र आता तेही त्यांचा आवाज वाढवतील.

Image copyright Getty Images

भारताचीही भीड या निमित्ताने चेपेल. त्यामुळे चीनचं फार नुकसान होईल आणि परिस्थिती आणखी बिकट होत जाईल.

जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं ऐकलं तर त्यांची मागणी आणखी वाढेल आणि कदाचित पूर्णही केली तरी त्यांच्या मागण्या संपणार नाही.

चीनला दोन्ही बाजूंनी तोटा आहे. म्हणजे ट्रंप यांचं ऐकलं तरीही आणि नाही ऐकलं तरीही.

चीनचा माल स्वस्त असल्यामुळे त्यांचा संपूर्ण जगात दबदबा आहे.

ट्रंप यांच्या मागण्या

व्यापारातील तोटा संपवावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. म्हणजे 300 अब्ज कोटींचा माल चीनने अमेरिकेला पाठवणं बंद करावं आणि अमेरिकेकडून सामानाची खरेदी करावी.

चीनने तंत्रज्ञानाची चोरी करणं बंद करावं, ही ट्रंप यांची दुसरी मागणी आहे. चीनमधील खासगी कंपन्यांना सरकार अनुदान देतं. हे अनुदान बंद करावं, अशी अमेरिकेची मागणी आहे.

म्हणजे अमेरिका चीनमधील कायदा बदलावा म्हणून दबाव आणत आहे. म्हणजे अमेरिकेच्या कंपनीसमोर चीनच्या मालाचा टिकाव लागेल.

Image copyright Getty Images

तज्ज्ञांच्या मते ट्रंप यांची नजर आता राष्ट्राध्यक्षपदाच्या पुढच्या निवडणुकीवर आहे. आपण शक्तिशाली आहोत, हे त्यांना मतदारांना पटवून द्यायचंय. जर त्यांनी चीनची अर्थव्यवस्था दडपून टाकली तर त्यांची गणना एखाद्या नायकाप्रमाणे होईल.

अमेरिका शेअर बाजार कधीच इतक्या चांगल्या स्थितीत नव्हता. रोजगाराचे आकडेही गेल्या 50 वर्षांत चांगले आहेत.

आज अमेरिकेची स्थिती अतिशय चांगली आहे. ट्रंप यांच्यामुळे ती झाली आहे, असा त्याचा अर्थ नाही. ओबामांच्या धोरणांमुळेही झाल्याची शक्यता आहे.

ट्रंपच्या कामांचा परिणाम तीन वर्षांनंतर दिसेल. मात्र ट्रंप यांना राजकीय फायदा घ्यायचा आहे.

(बीबीसी हिंदी प्रतिनिधी संदीप राय यांच्याशी झालेल्या बातचीतवर आधारित)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)