श्रीलंका ईस्टर बाँबस्फोट: देशभरात मुस्लिमांवर रोष, मशिदींवर हल्ल्यांनंतर कर्फ्यू

श्रीलंका मुस्लीम हल्ला Image copyright Reuters

ईस्टर संडेला झालेल्या साखळी बाँबस्फोटांनंतर हादरलेल्या श्रीलंकेत आता मुस्लिमांच्या विरोधातला हिंसाचार वाढला आहे. म्हणूनच आता देशभरात रात्रीच्या वेळेस जमावबंदी लागू केली जात आहे. सात तासांचा कर्फ्यू स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होईल.

पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी देशवासीयांना शांततेचं आवाहन केलं आहे. सध्याची तणावाची स्थिती बाँबहल्ल्यांच्या तपासात अडथळा आणत आहे, असं ते म्हणाले.

मुस्लीम कट्टरतावाद्यांनी 21 एप्रिल रोजी श्रीलंकेतील अनेक चर्च तसंच हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर देशाच्या अनेक बागांमध्ये मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार भडकतो आहे. या हिंसाचारामध्ये अनेक मशिदी आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

यात एकाचा मृत्यूही झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. शेकडो दंगलखोरांना पांगवण्यासाठी अनेक गावांमध्ये पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसंच अश्रूधुराचाही वापर केला.

Image copyright Reuters

देशाच्या वायव्य भागात असलेल्या किनियामा शहरात दंगलखोरांनी एका मशिदीच्या खिडक्या आणि दरवाजांची नासधूस केली तसंच कुराणच्या प्रती जमिनीवर फेकल्या.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार सैनिक या भागात एका तळ्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत का, याचा शोध घेत असताना स्थानिकांच्या एक गटाने या मशिदीचीही झडती घ्या अशी मागणी केली. त्यातूनच हा हल्ला झाला.

बहुसंख्य कॅथलिक ख्रिश्चन असणाऱ्या चिलॉ शहरात मुस्लिमांच्या मालकीची दुकानं तसंच मशिदींची नासधूस करण्यात आली. हा हल्ला एका फेसबुक पोस्टवरून उद्भवलेल्या वादातून झाला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या पोस्टचा लेखक असणाऱ्या 38-वर्षीय मुस्लीम व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या वायव्य भागात असणाऱ्या पुत्तलाम जिल्ह्यात जमावाने हल्ला केल्यानंतर एका मुस्लीम व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याला भोसकण्यात आलं होतं.

हिंसाचाराला रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.

"मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. देशाची सुरक्षितता अखंड ठेवण्यासाठी तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत," पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून आवाहन केलं.

देशात अजून ट्विटर बंदी घातलेली नाही.

हेत्तीपोला शहरातही हिंसाचार झाल्याचं वृत्त आहे. इथे कमीत कमी तीन दुकानं जाळली गेली आहेत, असं कळलंय.

श्रीलंकेच्या 2.2 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 10 टक्के लोक मुस्लीम आहेत. इतर बहुसंख्य लोक सिंहली बौद्ध आहे.

ईस्टर संडेला झालेल्या या बाँबहल्ल्यांसाठी पोलिसांनी दोन स्थानिक मुस्लीम गटांना जबाबदार धरलं आहे. इस्लामिक स्टेटनेही दावा केला होता की त्यांनी हे हल्ले घडवून आणले, पण त्याचा कुठलाही पुरावा किंवा कोणतीही अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही.

या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)