ICCच्या पहिल्या महिला मॅचरेफरी: भारताच्या G. S. लक्ष्मी

आयसीसी, लक्ष्मी, क्रिकेट Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जी. एस. लक्ष्मी पहिल्या आयसीसी मॅचरेफरी होणार आहेत.

भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी होणार आहेत.

या नियुक्तीसह लक्ष्मी आता महिला क्रिकेटच्या बरोबरीने पुरुषांच्या सामन्यासाठीही मॅचरेफरी म्हणून काम करतील. त्यांची आयसीसीच्या मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मी आऊटस्विंग करणाऱ्या गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

1986 ते 2004 या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसक यांनी पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग करत नवा मापदंड प्रस्थापित केला होता. क्लेअर यांच्या बरोबरीने इलोइस शेरीदान आता महिला तसंच पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसतील.

लौरन एगनबर्ग, किम कॉटन, शिवानी मिश्रा, स्यू रेडफर्न, मेरी वॉल्ड्रन आणि जॅक्वेलिन विल्यम्स या पॅनेलमधील अन्य महिला अंपायर्स आहेत.

आयसीसीच्या अंपायर्स पॅनेलमध्ये नियुक्त होणाऱ्या कॅथी क्रॉस या पहिला महिला अंपायर होत्या. त्या गेल्या वर्षी निवृत्त झाल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा क्लेअर पोलोसाक पहिल्या महिला अंपायर ठरल्या होत्या.

51 वर्षीय लक्ष्मी 2008 पासून भारतातील महिला क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 महिला वनडे तसंच 3 महिला ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम केलं आहे.

"आयसीसीच्या मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती होणं हा माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान आहे. माझ्या नियुक्तीसह अन्य महिला मॅचरेफरींना प्रोत्साहन मिळेल. खेळाडू म्हणून प्रदीर्घ कारकीर्दीनंतर मॅचरेफरी म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना या अनुभवासह जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न असेल," असं लक्ष्मी यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणतात, "आयसीसी, बीसीसीआय, क्रिकेटविश्वातील माझे वरिष्ठ, कुटुंबीय, सहकारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचे मी आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंतची वाटचाल करू शकले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)