अमेरिका-इराणमधला तणाव वाढला: दोन्ही देश का आहेत युद्धाच्या उंबरठ्यावर?

डोनाल्ड ट्रंप आणि हसन रुहानी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप आणि हसन रुहानी

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेयो यांनी आम्हाला युद्ध नको आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.

रशियामध्ये बोलत असताना पाँपेयो म्हणाले, की इराणसोबतही इतर देशांप्रमाणेच सामान्य संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा निर्माण झाल्यास मात्र आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देऊ.

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई यांनी देखील आम्हाला अमेरिकेसोबत युद्ध नकोय, असं स्पष्ट केलं आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेनं ओमानच्या आखातामध्ये त्यांच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात केली होती.

रविवारी आखातामधील संयुक्त अरब अमिरातच्या चार तेलवाहू जहाजांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे इराण किंवा इराणचं समर्थन असलेल्या गटांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र इराणचा या हल्ल्यातील सहभाग सिद्ध करणारा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तेहराननं हल्ल्यात आपला हात नसल्याचं सांगत चौकशीची मागणी केली आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा स्पेननं आपली युद्धनौका माघारी बोलावली आहे

वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव वाढत असतानाच स्पेननं अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जहाजांच्या ताफ्यांमधून आपलं लढाऊ जहाज काढून घेतलं आहे.

स्पेनला इराणसोबत सध्या तरी कोणताही वाद नको असल्याचं फ्रान्सच्या कार्यकारी संरक्षण मंत्री मार्गारिटा रोबेल्स यांनी म्हटलं आहे.

का वाढला आहे इराणसोबतचा तणाव?

ओमानच्या आखातामध्ये संयुक्त अरब अमिरातच्या चार व्यावसायिक तेलवाहू जहाजांवर रविवारी हल्ला करण्यात आला होता. होरमुझच्या खाडीजवळच या जहाजांवर अतिशय विध्वंसक असा हल्ला करण्यात आल्याचं संयुक्त अरब अमिरातच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं.

या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र आपल्या दोन जहाजांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा सौदी अरेबियानं केला आहे. या हल्ल्यातील चौथ्या जहाजाची नोंदणी नॉर्वेमधील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या जहाजावर संयुक्त अरब अमिरातचा झेंडा होता.

अमेरिकन लष्कराच्या तपास अधिकाऱ्यांना या जहाजाला प्रचंड मोठी भोकं पडल्याचं आढळून आलं. हे नुकसान स्फोटकांमुळे झाल्याचा त्यांचा अंदाज आहे.

Image copyright Getty Images

मात्र या नुकसानाचा इराणशी नेमका संबंध काय, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

मध्य पूर्वेत यापूर्वीही तेलाच्या जहाजांवर असे हल्ले झाले आहेत. त्या हल्ल्यांशी तुलना करता रविवारी झालेला हल्ला हा तितकासा तीव्र नव्हता. या हल्ल्यामुळं कोणत्याही स्वरूपाची तेलगळती झाली नाही, आग लागली नाही किंवा जीवितहानीही झाली नाही. मात्र तरीही जी वेळ साधून हा हल्ला केला गेला, त्यामुळं हल्ल्याच्या हेतूबद्दल संशय निर्माण होत आहे.

या भागातील तणाव वाढवणं तसंच इराण आणि अमेरिकेमधली दरी वाढवणं हा हल्ल्यामागचा प्राथमिक हेतू असावा, असं म्हटलं जातंय.

पाँपेयोंनी नेमकं काय म्हटलंय?

रशियामधीस सोची इथं आम्ही रशियन परराष्ट्र मंत्री सर्जेई लाव्रोव्ह यांच्याशी चर्चा केली असून अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं पाँपेयोंनी सांगितलं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पियो (डावीकडे) आणि रशियन परराष्ट्र मंत्री सर्जेई लाव्रोव्ह

पाँपेयो आणि लाव्रोव्ह यांच्यामध्ये अमेरिका-रशियामधील संबंध सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर बोलणी झाली. इराण व्यतिरिक्त अन्य विषयांवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

रशियानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पाठिंबा देऊ नये, अशी मागणी अमेरिकनं केली. मात्र मादुरो सरकारला अमेरिकेचा असलेला विरोध हा लोकशाहीविरोधी असल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं.

युक्रेन प्रश्नावर बोलताना पोम्पियो यांनी हे स्पष्ट केलं, की 2014 मध्ये रशियानं क्रीमियाच्या केलेल्या विलीनीकरणाला अमेरिका कधीही पाठिंबा देणार नाही. त्यासंबंधी जे निर्बंध रशियावर लादले आहेत, ते तसेच कायम राहतील.

इराणची भूमिका

आपलं ट्विटर अकाउंट तसंच सरकारी माध्यमांमधून अयोतुल्लाह अली खामनेई यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या वर्षी मागे घेतलेल्या अणुकराराबद्दल इराण आता पुन्हा कोणतीही चर्चा करणार नसल्याचं खामनेई यांनी सांगितलं.

आम्हाला युद्ध नको आहे आणि त्यांनाही ते टाळायचंय, असं खामनेई यांनी म्हटलं.

सोमवारी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी काही धर्मगुरूंची भेट घेतली. या भेटीमध्ये रुहानी यांनी म्हटलं, की देवाच्या कृपेनं या कठीण प्रसंगातून आपण आपला स्वाभिमान कायम ठेवून सन्मानानं बाहेर पडू. आपल्या शत्रूला आपण नक्कीच पराभूत करू.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)