इराणने चिथावणी दिली तर आम्ही युद्धासाठी तयार : सौदी अरेबिया

इराण तणाव Image copyright Reuters

गेल्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या तेलाच्या पाईपलाईन्सवर हवाई हल्ले झाले होते. याला येमेनमध्ये सक्रिय असणारे हुथी बंडखोर जबाबदार आहेत, असं समजण्यात आलं होतं.

सौदी अरेबियाचा आरोप आहे की इराणच्या सांगण्यावरूनच हे हल्ले करण्यात आलेले आहेत. येमेनमधले हुथी बंडखोर इराणच्या बाजूला झुकलेले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाच्या किनाऱ्यावर उभे असलेले दोन तेलाचे टँकर आणि चार जहाजांचंही नुकसान करण्यात आलं होतं.

या प्रकरणीही संशयाची सुई इराणकडे वळली होती, पण इराणने या हल्ल्यांमध्ये आपला हात असल्याचा इन्कार केला आहे.

इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान असलेला अणुकरार रद्द झाल्याने तसंच त्यानंतर मध्य-पूर्वेत अमेरिकेने आपलं सैन्य तैनात केल्याने या भागात आधीच अस्थिरता निर्माण झाली आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदेल अल-झुबेर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, "आम्हाला या भागात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नकोय. आम्ही युद्ध टाळण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू, पण जर कोणी आम्हाला जर युद्धासाठी चिथावणी दिली तर आम्ही त्याचं जशास तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत."

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ट्रंप यांनी रविवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "जर इराणला युद्ध करायचं असेल तर इराणचा सर्वनाश निश्चित आहे. यापुढे कधीही अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका."

या ट्वीटबरोबरच ट्रंप यांनी इराण संदर्भात आपली भूमिका बदलल्याचं लक्षात येतं आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रंप यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं की अमेरिकेला इराणवर कोणताही दबाव टाकायचा नाही ज्यातून युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल.

इराणनेही या संदर्भात नरमाईची भूमिका घेऊन चर्चेची तयारी दाखवली होती. शनिवारी, इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरिफ यांनी सरकारी वृत्तसंस्था इर्नाला सांगितलं होतं की, "युद्ध होईल अशी शक्यताच नाही कारण आम्हाला युद्ध नकोय आणि या भागात आम्हाला कोंडीत पकडण्याची क्षमता आपल्यात आहे अशा भ्रमात कोणी नसावं."

आखाती देशांची आपातकालीन बैठक

सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान यांनी आखाती देशांच्या नेत्यांची आपातकालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक 30 मे रोजी मक्केमध्ये होईल. तर दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, आखाती देशांमध्ये उद्भवलेल्या या समस्येचा सामना सगळ्यांना मिळून करावा लागेल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदेल अल-झुबेर

दरम्यान, सौदी अरेबियाच्या सहकारी सुन्नी देशांनी सौदीच्या तेलाच्या टँकरवर झालेल्या हल्लासाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही.

पण अमेरिकन सरकारच्या दोन सुत्रांनी सांगितलं की त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मते इराणने चिथावणी दिल्यामुळेच हुथी गट आणि इराकमधल्या शिया कट्टरतावाद्यांनी हे हल्ले केले.

हुथी बंडखोरांच्या सुप्रीम रिव्होल्युशनरी कमिटीचे प्रमुख मोहम्मद अली-हुथी यांनी सौदी अरेबियाने बोलवलेल्या शिखर संमेलनाचं आमंत्रण नाकारलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलं की, "ते लोक फक्त युद्ध आणि वाताहतीचं समर्थन करतात."

वृत्तसंस्था रॉयटर्सने नॉर्वेतल्या एका पत्रकाराच्या बातमीच्या हवाल्याने सांगितलं आहे की संयुक्त अरब अमिरातींच्या फुजैराह बंदरांजवळ सौदी अरेबियांच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणचे रिव्होल्युशनरी गार्डही जबाबदार असू शकतात.

सौदी प्रिन्स सलमान यांची अमेरिकेशी चर्चा

अमेरिकेने इराणवर आणखी कडक प्रतिबंध लावले आहेत म्हणजे इराण आपली निर्यात पूर्णपणे बंद करेल.

त्याचबरोबर अमेरिकेने आखाती भागात आपल्या सैन्याच्या ताकदीतही वाढ केली आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे की यामुळे इराणला धोका वाढला आहे.

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याविषयी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी चर्चा केली. सौदी अरेबियाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका ट्वीटव्दारे ही माहिती दिली.

"आम्ही युद्ध टाळण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू, पण जर कोणी आम्हाला युद्धासाठी चिथावणी दिली तर त्याचं जशास तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत," असं सौदीचे परराष्ट्र मंत्री अदेल अल-झुबेर यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, आता बॉल इराणच्या कोर्टात आहे, आपण काय करायचं हा निर्णय आता त्यांना घ्यायचा आहे.

झुबैर यांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात अडकलेल्या इराणी तेल टँकरच्या चालक दलाचे सदस्य अजूनही सौदी अरेबियामध्ये आहेत आणि त्यांची काळजी घेतली जात आहे. या टँकरचं इंजिन खराब झालं होतं. चालक दलात 24 इराणी आणि 2 बांगलादेशी नागरिक आहेत.

Image copyright Getty Images

सुन्नी बहूल सौदी अरेबिया आणि शिया बहुल इराण एक दुसऱ्यांचे कट्टर विरोधक आहेत. अनेक स्थानिक युद्धांमध्ये ते एकमेकांच्या विरोधकांचं समर्थन करतात.

मध्य-पूर्वेत वाढणाऱ्या तणावानंतर बहारीन देशाने शनिवारी इराणला जाणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिकांना तिकडे न जाण्याचा सल्ला दिला. तसंच जे लोक या देशात राहात आहेत त्यांनाही परत यायला सांगितलं.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन प्रशासनाने अमेरिकन कमर्शिअल विमानांना मध्य-पूर्वेचं आखात तसंच ओमानच्या खाडीवर उड्डाण करताना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे.

तसंच अमेरिकेची सगळ्यांत मोठी तेल कंपनी एक्सनमोबिलने मध्य-पूर्वेत वाढणाऱ्या तणावाचं कारण देऊन आपल्या काही कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे.

कंपनीचं म्हणणं आहे की हे तात्पुरत्या स्वरूपाचं पाऊल आहे आणि सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने उचललं आहे. कंपनीकडे मध्य-पूर्वेत धोका निर्माण झाला आहे असे काही संकेत नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)