त्याच्या मृत्यूच्या सात वर्षांनंतर तिने दिला त्याच्या मुलीला जन्म

लियात आणि शिरा Image copyright LIAT MALKA
प्रतिमा मथळा लियात आणि शिरा

लियात मलकाला स्वतःची मुलं हवी होती. त्यासाठी तिला योग्य जोडीदाराची गरज होती. मात्र, जोडीदाराचा शोध काही संपत नव्हता. आणि अशातच तिने एक अत्यंत वेगळा मार्ग निवडण्याचा निश्चय केला. वडील होणं, हीच शेवटची इच्छा असल्याचं सांगून गेलेल्या एका तरुणाच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय तिने घेतला.

2013 साली लियात मलका 35 वर्षांची होती. दक्षिण इस्रायलमध्ये राहणारी लियात किंडरगार्डनमध्ये शिकवायची. याच सुमारास आई होण्यासाठीचं आपलं वय उलटत असल्याची काळजी तिला वाटू लागली.

"वेळ निघून चाललीय आणि मला कदाचित आई होता येणार नाही, याची काळजी मला लागून होती", लियात सांगत होती. "त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले आणि काही फर्टिलिटी टेस्ट्स केल्या."

या टेस्ट्सचे रिपोर्ट आले आणि लिआतच्या अंडाशयात खूप कमी अंडी उरल्याचं कळलं. योग्य जोडीदाराच्या शोधात वेळ दवडलास तर तुला कदाचित आई होता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.

लियात सांगते, "त्यामुळे त्याचक्षणी मी ठरवलं की लवकरात लवकर बाळ होण्यासाठी शक्य ते सगळं करेन."

लियातने घरी येताच इंटरनेटवर शोध सुरू केला.

ती सांगते, "माझ्या बाळाला त्याच्या वडिलाची माहिती असावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे स्पर्म डोनरकडून हे शक्य नव्हतं."

इंटरनेटवर हा शोध सुरू असतानाच तिला 2009 साली प्रसारित झालेली एक मुलाखत यूट्यूबवर सापडली.

व्लॅड आणि ज्युलिया पोझनियान्स्की नावाच्या एका जोडप्याची ती मुलाखत होती. वर्षभरापूर्वी निधन झालेल्या आपल्या मुलाचे स्पर्म वापरून त्याच्या बाळाला जन्म देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढत होते. यासाठी एका महिलेने त्यांना होकारही दिला होता.

ही मुलाखत ऐकून लियातला वाटलं, असंच काहीसं आपल्यासाठीही बरं पडेल.

ती सांगते, "कारण अशा परिस्थितीत बाळाला त्याचे वडील कोण होते, त्याचा इतिहास काय आहे, हे कळेल. त्याला आजी-आजोबा मिळतील, कुटुंब मिळेल."

या जोडप्याच्या वकिलांना संपर्क करण्याचा निर्णय लियातने घेतला. ती वकिलांना भेटली. त्यानंतर तिला जे कळलं त्यामुळे तिला खूप आश्चर्य वाटलं. या मुलाखतीला चार वर्ष उलटून गेले होते. तरीही या जोडप्याला आपलं नातवंड मिळालं नव्हतं आणि ज्या महिलेने आई होण्यासाठी होकार दिला होता, ती निघून गेली होती.

लियातने या जोडप्याला भेटायचा निर्णय घेतला आणि भेटीचा दिवस ठरला त्या दिवशी या जोडप्याने आपल्या लाडक्या मुलाचे म्हणजेच बरूचचे फोटो असलेला एक अल्बम सोबत आणला होता.

बरूचला जाऊन आता दहा वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. मात्र, आजही आपल्या 'अत्यंत हुशार आणि कर्तबगार' मुलाविषयी बोलणं ज्युलियाला जड जातं.

Image copyright JULIA POZNIANSKY

वयाच्या 23 व्या वर्षी बरूच हाईफातल्या टेक्निअर या विख्यात विद्यापीठात पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करत असताना बरूचला त्याच्या तोंडात एक जखम दिसली. त्या जखमेतून सतत रक्तस्राव व्हायचा. ती गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं.

बरूचला किमोथेरपी करावी लागणार होती. मात्र, किमोथेरपीमुळे स्पर्मची संख्या घटली असती. त्यामुळे त्याचे काही स्पर्म काढून ते बँक करण्यात आले. त्याच्यावर किमोथेरपी झाली. त्यामुळे त्याचे केस गेले. नंतर डॉक्टरांना त्याच्या जिभेचा काही भागही कापावा लागला. त्यामुळे त्याला बोलताही येत नव्हतं. मात्र, याआधीच त्याने आपली इच्छा बोलून दाखवली होती.

बरूचच्या आई ज्युलिया सांगतात, "त्याने आम्हाला सांगितलं होतं की जर माझा मृत्यू झाला तर तुम्ही एक योग्य मुलीला निवडून माझ्या स्पर्मच्या मदतीने बाळाला जन्म द्या."

7 नोव्हेंबर 2008 रोजी वयाच्या 25व्या वर्षी बरूचचं निधन झालं. तो अविवाहित होता आणि त्याला मूलबाळही नव्हतं.

यानंतर ज्युलिया यांनी लगेच आपल्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा चंग बांधला.

मृत्यूच्या आधी बरूचने ईरीट रोसेनब्लम या वकिलांकडून मृत्युपत्र बनवलं होतं. रोझेनब्लम यांनी मरणोत्तर प्रजननाच्या या असामान्य अशा प्रकरणाची जबाबदारी घेतली. असं मृत्युपत्र लिहिणारा बरूच जगातला पहिला तरुण होता.

ज्युलियासाठी वाट सोपी नव्हती. त्यांना बाळाची आई होण्यासाठी एका मुलीचा शोध घ्यायचा होता. शिवाय, इस्राईलच्या कोर्टाकडून परवानगीही घ्यावी लागणार होती.

वकील इरीट रोसेनब्लम यांच्या मदतीने ज्युलिया आणि व्लॅड यांना रशियन मूळ असलेली एक इस्रायली महिला सापडली. बरूचचे स्पर्म वापरण्याची परवानगी मिळवण्यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टात खटलाही जिंकले. मात्र, एक-दोन आठवड्याच्या आतच त्या मुलीला दुसरा जोडीदार मिळाला आणि ती निघून गेली.

ज्युलिया सांगतात, "आम्हाला एक दुसरी मुलगी भेटली. खूप छान होती ती. कोर्टाच्या आदेशात पहिल्या मुलीऐवजी या दुसऱ्या मुलीचं नाव टाकण्यात आलं. तिच्यावर आयव्हीएफची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, सात फेऱ्यांनंतरही ती काही गर्भवती होऊ शकली नाही आणि इकडे बरूचच्या स्पर्मचा साठाही कमी झाला होता."

त्या सांगतात, "यापुढे जगायचं नाही, यासाठी मी तयार होते. मात्र, जगायचंच असेल तर मला माझ्या आयुष्यात थोडा आनंद, थोडं प्रेम आणावंच लागेल, हे मी ठरवलं."

"माझा मुलगा जगला पाहिजे, अशी माझी इच्छा होती. त्याला सदेह परत आणावं, असं मनात खोलवर कुठेतरी वाटत होतं. मला वाटायचं मुलगा होईल आणि तो अगदी बरुचसारखा दिसेल."

मात्र, आपल्याला बरूचची शेवटची इच्छा पूर्ण करता येईल का, यावरच अनिश्चततेचे ढग दाटले होते आणि नातवंडाची वाट बघत दीर्घकाळ लोटून गेला होता. अशात 55 वर्षांच्या ज्युलियाने व्लॅडसोबत आणखी एक बाळ जन्माला घालायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आयव्हीएफ आणि डोनर एगच्या मदतीने प्रयत्नही सुरू केले.

त्यांना मुलगा झाला आणि ज्युलियाला पुन्हा एकदा नव्याने मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं.

2013 सालच्या सुरुवातीला ज्युलिया आणि व्लॅड लियातला भेटले. तो दिवस ज्युलिया यांना अजूनही स्पष्ट आठवतो.

त्या सांगतात, "ती सुंदर तरुण मुलगी होती. काळेभोर केस, लाल कोट आणि बघताक्षणीच मला ती आवडली. ती एक चांगली व्यक्ती असल्याचं मला जाणवलं."

तिने लियातला तिने सोबत आणलेला बरूचच्या फोटोंचा अल्बम दाखवला. लियातला लगेच बरूचविषयी एक प्रकारचा आपलेपणा जाणवला.

Image copyright JULIA POZNIANSKY

ती सांगते, "फक्त फोटो बघूनच या व्यक्तीला आपण ओळखतो, असं मला वाटलं. सुंदर डोळे, मोठं स्मित, मित्रांचा घोळका आणि देखणा."

"प्रत्येक फोटोत ते हातात हात धरून होते. त्यामुळे तो त्याच्या आई-वडिलांशी खूप जोडला गेलेला होता, हे लगेच लक्षात आलं. त्याच्या डोळ्यातच प्रेम आणि आनंद मला दिसला. तो खूप चांगला होता, यात शंकाच नाही."

फोटो दाखवताना ज्युलिया लियातला त्याच्याविषयी सांगत होत्या. बरूचला आयुष्य किती आवडायचं, तो किती हुशार होता. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडायचं. त्याला स्वयंपाक करायला आवडायचं. त्याचे मित्र किती चांगले होते, सगळं त्या सांगत होत्या.

त्याक्षणी लियातने ठरवलं की तिला बरूचच्या बाळाची आई व्हायचं आहे. ज्याला ती कधीच भेटली नव्हती, ज्याचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, तिला अशा एका तरुणाच्या बाळाची आई व्हायचं होतं.

बरूचचे स्पर्म इतर कुणाला वापरता येऊ नये आणि त्याची मालकी लियातला मिळावी, यासाठी लियात आणि ज्युलिया आणि व्लॅड यांनी एक करार केला. तसंच या करारात ज्युलिया आणि व्लॅड यांना बाळाला भेटण्यासाठीची कायदेशीर तरतूद होती.

ज्युलिया सांगतात, "बाळाला भेटण्याचा आमचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी तो करार होता. बरूचची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळं करत होतो. शिवाय आम्हाला नातवंड मिळावी, हादेखील उद्देश होता."

या सर्व व्यवहारात कुठेच पैशाची देवाणघेवाण नव्हती. ज्युलिया आणि व्लॅडसाठी हे खूप महत्त्वाचं होतं. कारण, तसं केल्यास पैशाच्या हव्यासामुळे चुकीच्या व्यक्तीकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता होती.

यानंतर ज्युलिया आणि लियात यांना समाजसेवकाला भेटावं लागलं. त्याने त्यांच्या नात्यात भविष्यात कुठले वाद उद्भवू शकतात, याविषयी चर्चा केली. अगदी बाळाचं नाव काय ठेवायचं, यावरून भांडण झाल्यास काय कराल, असंही विचारलं. त्या काळात ज्युलियाला वाटत होतं जणू संपूर्ण न्यायव्यवस्था देव असल्यासारखी वागतेय. एका जीवाने जगावं की जगू नये, याचा निर्णय ते घेत होते.

त्या सांगतात, "आणि या गुणी मुलीला माझ्या उत्तरांमुळे खूप त्रास झाला."

अशी सगळी लढाई पार केल्यानंतर लियातने आयव्हीएफ केलं. मात्र, पहिली फेरी अपयशी ठरली.

ती सांगते, "त्यावेळी फक्त एकच अंडं होतं. हा माझ्यासाठी धक्काच होता. कारण ते जास्त असतील, अशी माझी अपेक्षा होती. ते एकच असल्यामुळे त्यापासून एम्ब्रियो तयार होऊ शकला नाही. "

लियातने या सगळ्या गोष्टी खूप सकारात्मकतेने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंडाशयातल्या अंड्यांची संख्या वाढवण्यासाठी तिने औषधोपचार घेतल्यानंतरही दुसऱ्या वेळीसुद्धा एकच अंडं तयार झालं होतं.

"त्यांनी ते अंडं फर्टिलाईज केलं. मला एक दिवस वाट बघावी लागली. त्या अंड्यापासून भ्रृण तयार होतंय की नाही, हे जाणून घेण्यासाठी मी दुसऱ्या दिवशी फोन केला."

यावेळी आनंदाची बातमी मिळाली.

"मला वाटलं, वा, कदाचित हेच ते?"

फर्टिलाईज झालेलं अंडं लियातच्या गर्भाशयात सोडण्यात आलं. आठवडाभर तिने आराम केला. वाट बघितली आणि सगळं नीट होईल, ही आशा केली. त्यानंतर प्रेगन्ससी टेस्ट केली आणि डॉक्टरांना फोन केला.

लियात सांगते, "त्यांनी अत्यंत आनंदाने सागितलं, तू प्रेग्नंट आहेस."

लियातने ही बातमी सर्वांत आधी तिच्या बहिणींना आणि नंतर ज्युलिया यांना सांगितली. आणि यानंतर या सर्व परिस्थितीचं गांभीर्य हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं.

Image copyright JULIA POZNIANSKY

लियात सांगते, "मी धक्क्यात होते. हे होईल, असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा हे घडलं, मला विश्वासच बसेना. मी ज्युलिया आणि व्लॅड यांना फार ओळखत नव्हते. मी त्यांना दोन किंवा तीन वेळाच भेटले होते."

माझे स्वतःचे कुटुंबीय बरूचच्या आई-वडिलांशी कसे वागतील, याचीही तिला काळजी वाटत होती. तिचे आई-वडील मोरक्कोहून इस्राईलला आले होते. तर ज्युलिया आणि व्लॅड रशियाहून आले होते. हे दोन्ही कुटुंब अतिशय भिन्न संस्कृतीतले होते.

या क्षणापर्यंत तिने आपण ज्युलिया आणि व्लॅडला भेटलो आणि त्यांच्या मरण पावलेल्या मुलाच्या बाळाची आई होण्याची तिची इच्छा, याविषयी तिने स्वतःच्या आईलाही सांगितलं नव्हतं.

"मला सर्वांच्या मतांचं ओझं नको होतं. विशेषतः माझ्या आईच्या. त्यामुळे मी याविषयी कुणालाच सांगितलं नव्हतं," ती सांगत होती. ती पुढे म्हणाली, "मात्र, मी जेव्हा तिला फोन केला तेव्हा मला निदान मुलं होत आहेत, याचा तिला आनंद झाला."

एकामागून एक दिवस जात होते. मात्र, लियातच्या मनात काळजीचं काहूर माजलं होतं. तिला खूप ताण आला होता आणि ज्युलिया आणि व्लॅड यांच्याशी चांगले संबंध तयार करणं, तिला कठीण वाटत होतं. रात्री तिला आपलं बाळ कसं दिसेल, याची स्वप्न पडायची.

तिकडे ज्युलिया यांनाही काळजी लागली होती. त्यांना लियातच्या जवळ जायचं होतं. मात्र, लियातच्या इच्छांचा मान राखून त्या तिच्यापासून लांब राहिल्या.

ज्युलिया म्हणाल्या, "मी माझ्या नात्यातल्याच एका जुन्याजाणत्या स्त्रीशी बोलले. त्या म्हणाल्या, तिला बाळ होऊ दे आणि त्यानंतर सगळं काही नीट होईल."

Image copyright LIAT MALKA

लियातला जेव्हा प्रसवकळा यायला सुरुवात झाली तेव्हा तिला ज्युलिया यांना सांगण्याची इच्छा झाली नाही. डॉक्टरांनी सकाळपर्यंत काही बाळ होणार नाही, असं सांगितल्यामुळे तिने आपल्या आईलाही रात्री हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस म्हणून सांगितलं होतं.

"मात्र, मध्यरात्री तिला काहीतरी वाटलं आणि ती टॅक्सी करून थेट हॉस्पिटलला आली. मला खूप आनंद झाला. तिला इतका धक्का बसला होता की तिला व्यक्त होता येत नव्हतं. माझ्या सोबत माझ्या दोन बहिणीही होत्या. माझी एक बहीण यूएसला होती. ती स्काईपवरून सतत आमच्या सोबत होती."

1 डिसेंबर 2015 ला म्हणजे वडिलांच्या मृत्यूच्या तब्बल सात वर्षांनंतर शिराचा जन्म झाला.

"मी स्वप्नात बघितलं ती अगदी तशीच होती", लियात सांगत होती. "ती इतकी सुंदर होती की माझा विश्वासच बसत नव्हता."

लियातने ज्युलिया आणि व्लॅडला बातमी देण्यासाठी फोन केला.

ज्युलिया सांगतात, "माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा माझ्या हृदयाचे ठोके सुरू झाल्यासारखं मला वाटलं."

लियात आणि ज्युलियाच्या पहिल्या भेटीवेळी ज्युलियाने बरूचचा जो फोटो अल्बम आणला होता तो आता लियातच्या घरी आहे आणि दोघी मायलेकी कधीकधी एकत्र बसून तो अल्बम बघतात. बरूचविषयी बोलतात. शिराचे डोळेही तिच्या वडिलांसारखेच निळे आहेत.

Image copyright LIAT MALKA

"एक दिवस ती मला म्हणाली, कदाचित लवकरच तो दार ठोठावेल आणि आपल्याला भेटायला येईल", लियात सांगत होती. "मी तिला सांगितलं, नाही, तो येणार नाही."

शिरा आता तीन वर्षांची झालीय. लियात सांगते शिराला वडील नसल्याची तिला कधीकधी काळजी वाटते.

"मात्र, आज जगात किती वेगवेगळ्या प्रकारची कुटुंब आहेत", लियात सांगते. "हे त्यातलंच एक. शिराला माहितीय की तिला वडील नाहीत. मात्र, तिच्यावर खूप जण प्रेम करतात आणि ती खूप आनंदी आहे."

आपल्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचा ज्युलिया यांनाही आनंद आहे. बरूचलाही त्याची मुलगी आवडली असती, असा विश्वास त्यांना वाटतो.

ज्युलिया सांगतात, "ती सुंदर आहे, ती हुशार आहे, ती आनंदी आहे, एका लहान मुलाकडून हवं ते सगळं तिच्यात आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)