काठमांडूत झालेल्या स्फोटांत चार ठार, माओवाद्यांवर संशय

नेपाळ Image copyright Reuters

नेपाळची राजधानी काठमांडू येथे रविवारी दुपारी झालेल्या तीन वेगवेगळ्या स्फोटांत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.

काठमांडू येथे शहरी भागात एक स्फोट झाला तर दोन स्फोट शहराबाहेरच्या भागात झाले. या स्फोटात गावठी बाँबचा किंवा इम्प्रोव्हाइजड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसचा वापर करण्यात आला असावा असं पोलिसांनी सांगितलं.

हा स्फोट एका माओवादी संघटनेनी केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या भागात माओवाद्यांनी वाटलेली पत्रकं सापडली आहेत. फेब्रुवारी महिन्यात याच संघटनेनी एक स्फोट घडवून आणला होता. त्यात एक जण ठार झाला होता.

या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही.

या स्फोटात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण रुग्णालयात ठार झाल्याचं पोलीस अधिकारी श्याम लाल ग्यावली यांनी सांगितलं. शहराबाहेर जिथं स्फोट झाला त्या भागातच पत्रकं सापडली.

गोविंद भंडारी या 17 वर्षीय विद्यार्थ्याने रॉयटर्सला सांगितलं, खूप मोठा आवाज आला आणि मी धावत तिकडे गेलो. त्याठिकाणी मला दिसलं की भिंतीला तडे गेले आहेत. पहिल्या स्फोटात एका व्यक्तीचा जीव गेला आणि इतर दोन स्फोटात तीन जण ठार झाले. दोन स्फोट झाल्यानंतर बऱ्याच अवकाशानंतर तिसरा स्फोट झाला.

स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी या भागात सुरक्षा वाढवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेपाळमध्ये सुमारे 10 वर्षं गृहयुद्ध सुरू होतं. ते 2006मध्ये संपलं. तेव्हापासून नेपाळमध्ये शांततेचं वातावरण आहे. संघर्षात सहभाग घेणाऱ्या बंडखोरांनी राजकीय पक्षातच प्रवेश केल्यानंतर नेपाळमध्ये शांतता नांदू लागली होती. पण आता पुन्हा काही गट बाहेर पडत आहेत. आमच्या आदर्शांची आमच्या नेत्यांनी पायमल्ली केली असं म्हणत त्यांनी पुन्हा बंडाचा झेंडा उभारला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)