पाकिस्तानचा विंडिजसमोर पालापाचोळा, सात विकेट्सने हरले

वेस्ट इंडिज, पाकिस्तान, वर्ल्डकप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वेस्ट इंडिजच्या बाऊन्सरसमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली

वेग आणि उसळते चेंडू हे वेस्ट इंडिजचं हुकमी अस्त्र. वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध हे अस्त्र परजलं. ढगाळ वातावरण, सहा फूटांपेक्षा जास्त उंचीचे गोलंदाज आणि सातत्याने उसळते चेंडू या परिस्थितीसमोर पाकिस्तानचा डाव 105 धावांतच आटोपला. वेस्ट इंडिजने 7 विकेट्स राखून सामना जिंकला.

कौशल्यपूर्ण मात्र सातत्याचा अभाव यासाठी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचे संघ ओळखले जातात. वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात करण्याची पाकिस्तानची इच्छा वेस्ट इंडिजच्या आक्रमक माऱ्यासमोर नेस्तनाबूत झाली.

वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होईल अशी अपेक्षा होती मात्र स्विंगपेक्षा उसळत्या चेंडूंनी पाकिस्तानचा घात केला.

शेल्डॉन कॉट्रेलने लेगस्टंपला चेंडू टाकला. इमाम उल हकला हा चेंडू खेळून काढण्याची आवश्यकताच नव्हती. मात्र त्याला मोह झाला आणि कॉट्रेलला विकेट मिळाली. त्याने फक्त 2 धावा केल्या.

गेल्या दोन वर्षांत सातत्याने धावा करणाऱ्या फखर झमनला आंद्रे रसेलच्या बाऊन्सरने फसवलं. रसेलचा वेगवान चेंडू झमनच्या हेल्मेटवर आदळला आणि त्यानंतर शरीरावरून घरंगळत जाऊन स्टंप्सवर गेला. या बाऊन्सरला कसं सामोरं जावं याचं उत्तर झमनकडे नव्हतं. त्याने 22 धावा केल्या.

रसेलने आणखी एका बाऊन्सवर हॅरिस सोहेलला 8 धावांवर तंबूत धाडलं. भरवशाच्या बाबर आझमकडून पाकिस्तानला अपेक्षा होत्या मात्र वाईड चेंडू खेळण्याचा प्रयत्न बाबरच्या अंगलट आला. वेस्ट इंडिजचा कीपर शाई होपने अफलातून झेल टिपला. बाबरने 22 धावा केल्या.

कर्णधार जेसन होल्डरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदला लेग साईडला खेळण्यास भाग पाडले. अंपायरने बाद नसल्याचा कौल दिला. वेस्ट इंडिजनं रिव्ह्यू घेतला. चेंडू सर्फराझच्या बॅटची कड घेतल्याचं स्पष्ट झालं. सर्फराझला 8 धावा करता आल्या.

होल्डरने बाऊन्सरचं अस्त्र खुबीने वापरत इमाद वासिमला माघारी धाडलं. मुख्य फलंदाज माघारी परतल्यावर तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच पाकिस्तानने शंभरी ओलांडली.

ओशाने थॉमसने 4 तर जेसन होल्डने 3 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलने तीन ओव्हर्समध्ये एक मेडनसह फक्त चार धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ख्रिस गेलच्या 50 आणि निकोलस पूरनच्या 34 धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने सामना जिंकला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)