सफरचंदाच्या वजनाइतकी जगातली सर्वांत लहान मुलगी

मुलगी Image copyright AFP

अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये फक्त 245 ग्राम वजन असणाऱ्या मुलीचा जन्म झाला आहे. ही जगातली सर्वांत लहान आकाराची मुलगी असल्याचं म्हटलं जातंय.

या तान्हुलीचं नाव सेबी ठेवण्यात आलंय. जन्माच्या वेळी या छोटुकलीचं वजन एखाद्या मोठ्या सफरचंदाएवढं होतं.

सेबीचा जन्म डिसेंबर 2018ला झाला. सेबी ही प्रिमॅच्युएर बेबी आहे. 23 आठवडे आणि 3 दिवसच ती गर्भात होती. मग तिचा जन्म झाला.

या बाळाच्या जिवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती. त्यामुळे तिला कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमधल्या शार्प मॅरी बर्च हॉस्पिटलच्या नियोनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं.

डॉक्टरांनी सेबीच्या माता-पित्यांना सांगितलं होतं की जिवंत राहण्यासाठी सेबीकडे काही तासांचाच अवधी आहे.

मात्र, पाच महिने डॉक्टरांच्या सूक्ष्म देखरेखीत असलेल्या सेबीने सर्वांना खोटं ठरवलं. आता ती पूर्णपणे सुदृढ आहे आणि तिचं वजनही अडीच किलो झालंय. तिला डिस्चार्जही मिळालाय.

Image copyright AFP

जिवंत राहण्यासाठी झगडणाऱ्या सेबीची देखभाल करणाऱ्या नर्सने सांगितलं की या महिन्यात सेबीला मिळालेला डिस्चार्ज खरंतर चमत्कारच आहे.

सेबी हे जगातलं सर्वांत छोटं बाळ आहे असं 'द टायनिएस्ट बेबी रजिस्ट्री' या संस्थेनं सांगितलं आहे. या संस्थेकडे प्रिमॅच्युअर बेबींचे रेकॉर्ड्स आहेत.

आयवा विद्यापीठाद्वारे संचालित या संस्थेच्या माहितीनुसार यापूर्वी 2015 साली जर्मनीत एका बाळाचा जन्म झाला होता. जन्मावेळी त्याचं वजन केवळ 252 ग्राम होतं.

यावर्षीच्या सुरुवातीलाच जपानमध्ये जन्माला आलेल्या एका बाळाचं वजन 268 ग्राम होतं. वेळेआधी जन्म घेणारं ते सर्वांत लहान बाळ असल्याचं मानलं जात होतं.

प्री-एक्लेमप्सिया असल्याचं कळल्यावर सेबीच्या आईने डिलिव्हरीच्या तीन महिन्यांआधीच सेबीला जन्म दिला. प्री-एक्लेमप्सिया गर्भावस्थेतली एक स्थिती आहे.

यात गर्भारपणाच्या 20 आठवड्यांनंतर रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे गर्भातल्या बाळाला ऑक्सिजन आणि पोषकतत्त्व मिळत नाही. अशा परिस्थितीत होणारी आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका असू शकतो.

Image copyright AFP

हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओत या आईने सेबीच्या जन्माला "आपल्या आयुष्यातला सर्वांत भीतीदायक दिवस" असल्याचं म्हटलंय.

नाव न सांगण्याच्या अटीवर आईने सांगितलं, "मी म्हणत होते की ती वाचणार नाही. मला फक्त 23 आठवडेच झालेत."

हॉस्पिटलने सांगितलं की तिचा जन्म वेळेच्या खूप आधी झाला होता. याला डॉक्टरांनी 'मायक्रो-प्रीमी' असं नाव दिलं. म्हणजे असं बाळ जे 28 आठवड्यांच्या आधीच जन्म घेतं. साधारणपणे बाळ 40 आठवड्यात जन्म घेतो.

त्यांनी पुढे सांगितलं की सेबी इतकी लहान होती की हॉस्पिटलमध्ये देखभाल करणाऱ्या स्टाफच्या तळहातावरही मावायची.

डॉक्टरांना वाटतं की सेबी जगू शकली कारण जन्मतः तिला कुठला गंभीर आजार झाला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)