वर्ल्ड कप: न्यूझीलंडचा श्रीलंकेवर 10 विकेट्स राखून विजय

न्यूझीलंड, श्रीलंका, वर्ल्डकप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मॉट हेन्री

वेगवान गोलंदाजी या अस्त्राचा खुबीने उपयोग करत न्यूझीलंडने श्रीलंकेचा डाव 136 धावांतच गुंडाळला. न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता दणदणीत विजय साकारला.

शुक्रवारी झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा 107 धावांतच खुर्दा उडाला होता. याच सामन्याची पुनरावृत्ती शनिवारी पाहायला मिळाली.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर मॉट हेन्रीने लहिरू थिरिमानेला एलबीडब्ल्यू केलं.

काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय साजरा केला होता. या मालिका विजयाचा शिल्पकार कुशल परेरा या सामन्यात निष्प्रभ ठरला. मॉट हेन्रीचा चेंडू दूरवर मारण्याचा कुशलचा प्रयत्न कॉलिन डी ग्रँडहोमच्या हातात जाऊन विसावला. पुढच्याच चेंडूवर हेन्रीने कुशल मेंडिसला स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडलं. लॉकी फर्ग्युसनचा वेग धनंजय डिसिल्व्हाला झेपला नाही. तोही एलबीडब्ल्यू झाला.

मुख्य गोलंदाजांना विश्रांती मिळून कॉलिन डी ग्रँडहोमला चेंडू सोपवण्यात आला. श्रीलंकेला सगळ्यात अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजकडून अपेक्षा होत्या. ग्रँडहोमचा स्विंग झालेल्या चेंडूवर मॅथ्यूज विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. मॅथ्यूजला भोपळाही फोडता आला नाही. पुढच्याच षटकात जीवन मेंडिस फर्ग्युसनची शिकार ठरला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि थिसारा परेरा या अनुभवी जोडीने सातव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केल्याने श्रीलंकेने शंभरी ओलांडली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लॉकी फर्ग्युसन

फिरकीपटू मिचेल सँटनरला मोठा फटका खेळण्याचा मोह परेराला रोखता आला नाही. तो बोल्टकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 27 धावा केल्या. इसरू उदानाने जेम्स नीशामला पहिली विकेट मिळवून दिली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सुरंगा लकमल सँटनरकडे झेल देऊन बाद झाला. फर्ग्युसनचा भन्नाट वेग लसिथ मलिंगाला झेपला नाही. तो त्रिफळाचीत झाला आणि श्रीलंकेचा डाव 136 धावांतच गडगडला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाबाद 52 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसन आणि हेन्री यांनी प्रत्येकी 3 विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मार्टिन गप्तील (73) आणि कॉलिन मुन्रो (58) यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने 17व्या षटकातच विजय मिळवला.

दणदणीत विजयासह न्यूझीलंडचा रनरेट 5.754 असा भक्कम झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)