अमेरिकेचा व्हिसा हवाय? आता सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती द्यावी लागणार

सोशल मीडिया Image copyright PA

एक वेळ होती की जगात प्रत्येकालाच अमेरिकेचा व्हिसा मिळवायचा होता. आजही अनेकाचं ते 'द बिग अमेरिकन ड्रीम' कायम आहेच. पण त्यासाठी लागणारा व्हिसा मिळवणं फार अवघड. आणि आता त्यात अमेरिकेनं एक नवीन अट टाकली आहे.

अमेरिकेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या जवळजवळ सर्व व्यक्तींना आता नव्या नियमानुसार त्यांच्या सोशल मीडियाची माहिती द्यावी लागेल.

अमेरिकेतील नियामक प्राधिकरणाने आता व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांचं सोशल मीडियावरचं नाव, पाच वर्षं वापरात असलेला फोन नंबर आणि इमेल आयडीची माहिती देणं बंधनकारक केलं आहे.

दरवर्षी 1 कोटी 47 लाख लोक अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करतात. त्यामुळे या नियमाचा इतक्या प्रमाणात लोकांना फटका बसण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

या नियमाच्या अमलबजावणीचा प्रस्ताव मागच्या वर्षी आला होता. या कडक नियमावलीपासून काही राजदूत आणि विशिष्ट अर्जदारांना सूट दिली आहे.

"आम्ही लोकांना इथे प्रवास करण्याची परवानगी देतो. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो," असं प्रशासनाने म्हटलं आहे.

आधी फक्त काही लोकांनाच ह माहिती पुरवावी लागायची, उदाहरणार्थ असे प्रवासी जे एखाद्या प्रदेशात कट्टरवाद्यांचं प्राबल्य असलेल्या भागात प्रवास करून आले आहेत.

Image copyright PAUL J. RICHARDS/AFP/GETTY IMAGES

मात्र आता सर्व अर्जदारांना सोशल मीडियावरची त्यांची खाती आणि अन्य वेबसाईट्स, ज्यांचा उल्लेख अर्जात नसेल, त्यांची माहिती द्यावी लागणार आहे.

जो अर्जदार ही माहिती देणार नाही त्याला इम्रिगेशनवेळी गंभीर परिणाम भोगावे लागतील असं द हिल वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं.

ट्रंप प्रशासनाने पहिल्यांदा ही नियमावली मार्च 2018 मध्येम आणली होती.

अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन या नागरी हक्क गटाच्या मते, "सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने हेरगिरी करणं फारसं उपयोगाचं नाही." असं केल्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लोकांना बंधन येतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जेव्हा 2016 मध्ये निवडून आले तेव्हा स्थलांतरितांवर कारवाई, हे मुख्य उद्दिष्ट होतं. ते या पदावर असल्यापासून आणि त्याआधीपासूनच स्थलांतरितांची छाननी अधिक काटेकोर पद्धतीने व्हावी, असं त्यांचं मत होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)