क्रिकेटच्या वेडापायी तो कोरियातून थेट मुंबईत पोहोचला

"मी खेळात पुन्हा कारकीर्द उभी करेन असं वाटलं नव्हतं. पण क्रिकेटनं मला खेळाडू बनण्याची दुसरी संधी दिली आहे. मला आता क्रिकेट आवडतं. खूप आवडतं."

तै क्वान पार्क क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या नजरेतच खेळावरचं त्याचं प्रेम दिसून येतं. याच प्रेमापोटी तो दक्षिण कोरियातल्या घरापासून दूर, साडेपाच हजार किलोमीटर दूर, मुंबईत आला.

Image copyright BBC/Sharad Badhe

दक्षिण कोरियासारख्या क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे अजिबात न दिसणाऱ्या देशातला एक तरुण या खेळाचा ध्यास घेतो काय, त्यासाठी क्रिकेटवेड्या भारतात, त्यातही भारतीय क्रिकेटच्या पंढरीत येतो काय, हे सारं वाचून स्वप्नवत वाटतं ना? पण उंचपुऱ्या, काटक शरीरयष्टीच्या पार्कला खेळताना पाहिलं, तर कधीकधी अशक्य वाटणारी स्वप्नही पाहायला हवीत, हा विश्वास वाटल्याशिवाय राहात नाही.

पार्क दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. क्रिकेट खेळता यावं आणि भारतातल्या क्रिकेटचा अनुभव मिळावा, यासाठीच तो मुंबईत आलाय. पण अगदी सहा वर्षांपूर्वीपर्यंत त्याला क्रिकेटविषयी माहितीही नव्हती.

बेसबॉल प्लेयर ते क्रिकेटर

दक्षिण कोरियातल्या सुवान शहरात राहणाऱ्या पार्कला लहानपणापासून खेळात करियर करायचं होतं. "मी शाळेत असताना बेसबॉल खेळायचो. पण तिथं खूपच स्पर्धा असल्यानं बेसबॉल प्लेयर होणं सोपं नव्हतं," असं तो सांगतो. खेळात करियरचा विचार सोडून त्यानं पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेशही घेतला होता, पण लवकरचं सगळं बदललं.

2014 साली इन्चिऑनमध्ये आशियाई क्रीडास्पर्धेचं आयोजन झालं, तेव्हा त्यात ट्वेन्टी20 क्रिकेटचाही समावेश होता. दक्षिण कोरियाचा संघही त्यात सहभागी होणार होता, त्यासाठी खेळाडूंची जुळवाजुळव सुरू होती. पार्कनं त्यात आपलं नाव नोंदवलं आणि त्याला संघात प्रवेशही मिळाला.

Image copyright BBC/Sharad Badhe

"बेसबॉल आणि क्रिकेटमध्ये बरंच साम्य आहे. पण तिथं अनेक इनिंग्ज असतात. क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये धावा करायच्या असतात आणि एका इनिंगमध्ये त्यांचा बचाव करायचा असतो. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागत असल्यानं मला त्यात जास्त रस होता. मी जसा खेळत गेलो, क्रिकेट मला क्रिकेट आवडत असल्याचं मला जाणवलं. दरवेळी क्रिकेट खेळताना मला उत्साह वाटतो."

2013 सालापासून पार्क दक्षिण कोरियासाठी क्रिकेट खेळतो आहे. त्याला खरं तर फलंदाज व्हायचं होतं. पण संघाची गरज लक्षात घेऊन तो गोलंदाजी करू लागला. 2014 सालच्या इंचिऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं तीन सामन्यांत 21 धावा केल्या आणि पाच विकेट्स काढल्या होत्या. त्या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाविरुद्ध खेळताना उपांत्यपूर्व फेरीत 16 धावांत चार विकेट्स अशी लक्षवेधक कामगिरीही बजावली.

पार्कला मग क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचं स्वप्न खुणावू लागलं.

मुंबईत क्रिकेटचं स्वप्न

2013 साली दक्षिण कोरियाच्या संघातले खेळाडू सरावासाठी भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पहिल्यांदा पार्क भारतात आला होता. पण भारतातल्या एखाद्या संघात खेळण्याचं, मुंबईतल्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्याचं स्वप्न घेऊन इथे आलेला पार्क पहिलाच दक्षिण कोरियन खेळाडू आहे.

आपण मुंबईतच का आलो, याविषयी पार्क सांगतो, "माझा अगदी जवळचा मित्र चार वर्षांपासून मुंबईत राहतोय. त्यानं मला क्रिकेट शिकण्यासाठी मुंबईत यायला प्रोत्साहन दिलं. म्हणूनच 2018 साली मी इथे आलो, तो क्रिकेटमध्ये आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी."

स्वप्न घेऊन मुंबईत येणारे अनेक आहेत आणि त्यापैकी प्रत्येकालाच इथं आल्यावर संघर्ष करावा लागतो. पार्कचाही त्याला अपवाद नाही. अडचणींची सुरूवात भाषेपासूनच होते. पार्कला इंग्लिश समजतं, पण तेवढं बोलता येत नाही. अर्थात क्रिकेटची भाषा मात्र त्याला अवगत आहे.

Image copyright Tae Kwan Park

सहा-सात महिने नोकरी करून, पैसे जमा करून पार्क मुंबईत आला. आधी कुटुंबियांना चिंता वाटत होती, पण आता तेही पाठिंबा देत असल्याचं तो सांगतो. दक्षिण कोरियातल्या टीममेट्सनीही त्याच्या मुंबईत येण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

पण मुंबईतल्या क्रिकेट वर्तुळात कुणाची ओळख नसल्यानं कुठून सुरूवात करावी हेही त्याला समजत नव्हतं. अधूनमधून दक्षिण कोरियन संघासाठी खेळण्यासाठी पार्कला दौऱ्यावरही जावं लागतं, त्यामुळं मुंबईत लक्ष केंद्रित करणंही कठीण. इथलं हवामान, स्पर्धा सगळ्याशीच त्याला जुळवून घ्यावं लागलं.

"मला वाटलं तेवढं हे सोपं नक्कीच नव्हतं. भारतात कित्येक संघ आहेत आणि मला अजून फारशी संधी मिळालेली नाही. इथे आल्यावर मला भारतीय क्रिकेटमध्ये केवढी मोठी स्पर्धा आहे याची जाणीव झाली. व्यावसायिक स्तरावर खेळणारेही भरपूर खेळाडू आहेत. आणि अगदी खूप छान खेळणाऱ्या खेळाडूंनाही देशाच्या संघात स्थान मिळवता येत नाही. मला वाटतं या सर्वांकडून मी खूप काही शिकू शकतो."

मुंबईच्या क्रिकेटर्सना पार्कविषयी काय वाटतं?

माटुंग्याच्या दडकर मैदानात, मे महिन्यातल्या भर दुपारीही क्रिकेटचे सामने रंगतात. तिथेच आम्ही पार्कची मुलाखत घेतली आणि मग तो दादर पारसी झोराष्ट्रीयन क्लबच्या नेट्समध्ये सरावासाठी उतरला. हा कोण खेळतोय म्हणून आसपासचे युवा क्रिकेटर कुतुहलानं पाहात होते. आधी काहीसा दबावाखाली खेळणारा पार्क, षटकार ठोकू लागला, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून दादही दिली.

आम्ही माजी रणजीपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक प्रदीप कासलीवाल यांच्याशीही त्याची भेट घालून दिली. दक्षिण कोरियातून आलेला क्रिकेटर म्हटल्यावर कासलीवाल यांना पार्ककडून फारशा अपेक्षा नव्हत्या. पण त्याची गोलंदाजी शैली पाहून तेही प्रभावित झाले.

"त्याची गोलंदाजी शैली अगदी उत्तम आहे. मी ती रेकॉर्डच करून ठेवली आहे कॅमेऱ्यात. बेसबॉल खेळणारे लोक क्रिकेट लवकर शिकतात. पण दक्षिण कोरियात जर असे क्रिकेटर तयार होत असतील, तर पुढच्या पाच वर्षात तिथं क्रिकेट बहरलेलं दिसायला हवं."

दक्षिण कोरियाची वाटचाल

दक्षिण कोरिया खरं तर बेसबॉल, फुटबॉल, तिरंदाजी आणि इतर ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. पण येत्या काळात हा देश क्रिकेटचं पॉवरहाऊसही बनू शकतो असं आयसीसीनंच म्हटलं आहे.

1980 च्या दशकात दक्षिण कोरियात क्रिकेटची सुरुवात झाली, ती तिथं स्थायिक झालेल्या ऑस्ट्रेलियन्समुळे. 2001 साली दक्षिण कोरियाला आयसीसीचं सहसदस्यत्व मिळालं आणि पुढं दशकभरात तिथं क्रिकेटच्या प्रसारासाठी आयसीसीनं निधीही पुरवला.

Image copyright Tae Kwan park

मग ट्वेन्टी20 क्रिकेटचा प्रसार आणि 2014च्या इन्चिऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेश यामुळं दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये क्रिकेटला आणखी चालना मिळाली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटमध्येही दक्षिण कोरियाचे संघ प्रतिनिधित्व करतात. यंदा आयसीसीनं सर्व सहसदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 संघांचा दर्जा दिल्यामुळं दक्षिण कोरियातलं क्रिकेट आणखी बहरेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. पार्कही तेच स्वप्न पाहतो आहे.

वर्ल्ड कप ड्रीम

पार्क आता 28 वर्षांचा आहे आणि दिवसागणिक क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याची शक्यता त्याच्यासाठी कमी होत चालली आहे याची त्याला कल्पना आहे.

"मला कधीकधी नैराश्य आल्यासारखं वाटतं, पण मी आशा सोडलेली नाही. एक क्रिकेटर म्हणून यश मिळालं नाही, तरी मी दक्षिण कोरियात गेल्यावर तिथल्या क्रिकेटसाठी हे फायद्याचं ठरेल. हीच गोष्ट मला प्रेरणा देते. 2022च्या एशियाडमध्येही क्रिकेट खेळलं जाणार आहे, मला त्यासाठी माझ्या टीमला मदत करायची आहे."

कधीतरी भविष्यात विश्वचषक खेळण्याचं स्वप्नंही तो पाहतो. पार्क म्हणतो, "गेल्या वेळी टी20 विभागीय पात्रता स्पर्धेत आम्हाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. पण कधीतरी कोरिया विश्वचषकात खेळेल अशी मला आशा आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)