वर्ल्ड कप 2019 : ‘मॅच जिंकल्यावर असतो तसा एकोपा भारतात नेहमीच का नसतो?’

साउथेम्पटनमध्ये आलेले भारतीय क्रिकेट चाहते

2019च्या वर्ल्ड कपमधली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच भारताने 6 विकेट्सनी जिंकली. पण स्टेडियमच्या वेस्ट एण्ड गेट पासून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी फॅन्सना भरपूर चालावं लागलं. भारत-दक्षिण आफ्रिका मॅच जिथे झाली ते हॅम्पशायर बोल स्टेडियम हे इंग्लंडमधल्या इतर क्रिकेट स्टेडियम्सपेक्षा एका अर्थाने वेगळं आहे.

इतर स्टेडियम्सप्रमाणे या स्टेडियमला सहज पोहोचता येत नाही. साऊदम्पटन शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते 20 किलोमीटर दूर आहे. स्टेडियमच्या जवळ टॅक्सी स्टँड, दुकानं किंवा रेस्तराँ नाहीत. स्टेडियमला येणारे लोकं बहुतेकदा खासगी वाहनांनी येतात. जवळपास कोणतंही रेल्वे स्टेशन नाही आणि या मार्गावर धावणाऱ्या फार कमी बसेस आहेत.

पण या सगळ्या गोष्टी फॅन्सना तिथे येण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. ''मी लंडनहून ट्रेनने साऊदम्पटनला सकाळी 8 वाजता आलो. मला लगेच टॅक्सी मिळाली नाही. मला वाटलं आता दोन टीमदरम्यान होणारा टॉस आता मला मिळणार नाही,'' लंडनच्या विनीत सक्सेना यांनी तक्रारीच्या सुरात सांगितलं. या स्टेडियमच्या जवळ फारशी हॉटेल्स किंवा शॉपिंग मॉल्स नसल्याने साऊदम्पटनमध्ये राहणारी लोकं शहराच्या मध्यवर्ती भागात राहतात. मॅच जरी सकाळी साडे दहा वाजता सुरू झाली तरी सकाळी साडेसात वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली होती.

Image copyright AFP

''आम्ही या मॅचसाठी आम्ही सिंगापूर वरून आलो आहोत. आम्ही एकही बॉल चुकवणार नाही. इथे खूप गर्दी असणार हे माहीत असल्याने आम्ही लंडनहून लवकरची ट्रेन पकडली.'' कुटुंबासोबत आलेल्या विवेकने सांगितलं. त्याच्यासारखेच अनेक फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक मिळावी आणि टॉस उडवला जात असताना आपण स्टेडियममध्ये हजर असावं यासाठी लवकर दाखल झाले होते.

''माझ्या बॉसने मला एका दिवसाची सुटी दिली नाही. म्हणून मग मी थाप मारली. मला माहितीये हे चूक आहे. पण हे सगळं 'थाला' धोनीसाठी. धोनी कदाचित यानंतर कोणती टूर्नामेंट खेळणार नाही. माझ्यासाठी ही अत्यंत जवळची गोष्ट आहे.'' नाव न सांगता किंवा फोटो काढू न देता एका व्यक्तीने सांगितलं.

स्टेडियमकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांसाठीही ही नवी गोष्टी आहे. जेव्हा भारत किंवा पाकिस्तानची इथे मॅच असते, तिला चांगली गर्दी होते. शिवाय आत स्टेडियममध्ये वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येतो.''

कोण खेळतंय हे जरी मला माहीत नसलं तरी ट्रम्पेटचा हा आवाज आला की मी डोळे मिटून सांगू शकतो की एखादी आशियाई टीम खेळत आहे.'' सुरक्षा रक्षकांपैकी एकाने हसतहसत सांगितलं. वर्ल्ड कपमधली ही पहिलीच मॅच असल्याने चांगली गर्दी झाल्याचं दुसऱ्याने सांगितलं.

भारत 9, दक्षिण आफ्रिका 1

या मॅचचा टॉस जरी दक्षिण आफ्रिकेने जिंकला असला तर पाठिंब्याच्या बाबतीत भारताने बाजी मारली. भारताच्या पाठिराख्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर 9:1 च्या प्रमाणाने बाजी मारली.

स्टेडियमच्या शेजारी असणाऱ्या हॉटेलमध्ये असलेल्या प्रेस बॉक्समध्येही भारतीय फॅन्सचा आरडाओरडा ऐकू येत होता. पहिल्या इनिंगमध्ये भारत क्षेत्ररक्षण करत असताना अनेक भारतीय खेळाडूंच्या नावाचा गजर होत होता. पण सगळ्यात जास्त गजर धोनी वा कोहली च्या नावाचा नव्हता.

आवाज होता तो ''बुमरा...बुमरा!'' दरवेळी तो बॉलिंग करत असताना त्याच्या नावाचा पुकारा होत होता. ''आम्ही गुजराती आर्मी आहोत. खेळाडूंची यादी जाहीर झाल्यावर टीममध्ये रविंद्र जडेजा नसल्याचं पाहून आम्ही जरा नाराज झालो होतो. पण बुमराने ती उणीव भरून काढली. रोहित आणि चहलही चांगले आहेत.'' दीपक आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं. या वर्ल्डकपमधल्या काही मॅचेस पाहण्यासाठी हे सगळे अमेरिकेहून आलेले आहेत.

सावधगिरीचा सल्ला

पण सगळेच भारतीय फॅन्स काही या विजयाने हरखून गेलेले नाहीत. मूळचा विजयवाड्याचा असणारा वरूण लंडनच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये काम करतो. त्याचं मत जरा वेगळं आहे.

''पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवत सुरुवात करणं चांगलं आहे. पण हा विजय आश्वासक आहे, असं मला वाटत नाही. दक्षिण आफ्रिका लागोपाठ 2 मॅचेस हरलेली आहे आणि या मॅचच्या आधी त्यांचे दोन मुख्य गोलंदाज बाद झाले. यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला."

त्यांनी जर पहिल्या इनिंगमध्ये मोठी खेळी केली असती, तर भारताचा खरा कस लागला असता. ''धवनने स्वस्तात बाद होणं आणि कोहलीला या मॅचमध्ये मोठी खेळी करता न येणं याविषयीही अनेकांनी काळजी व्यक्त केली. पण कोहली याची उणीव त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध खेळताना भरून काढेल अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली."

चांगलं जेवण आणि खराब इंटरनेट

मॅच भारताच्या बाजूने झुकायला लागल्यावर स्टेडियममधल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची चांगली विक्री व्हायला लागली. इथल्या दोन-तीन ठिकाणी पनीर बटर मसाला, आलू टिक्का सारखे भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. मुख्य दरवाज्याजवळच्या फूडस्टॉल्स जवळची गजबज तिथे थांबलेल्या मीडियाला ऐकू येत होती. '' मला बरं वाटलं मला जेवणात चांगला जिरा पुलाव मिळाला. रायतं आणि हलवाही चांगला होता.''

एका मध्यमवयीन महिलेने जेवणाबद्दल सांगितल्यानंतर तिच्या मुलाने कुजबुज तिला क्रिकेटविषयी बोलण्यास सांगितलं. खूप जास्त लोक एकाच वेळी त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट वापरत असल्याने स्टेडियमच्या परिसरातल्या इंटरनेट सेवेवर त्याचा परिणाम झाला होता.

''मला त्रिवेंद्रममध्ये असलेल्या माझ्या भावासोबत स्काईपवरून व्हिडिओ चॅट करायचं होतं, पण इथे चांगलं इंटरनेट मिळत नाही.'' आनंदने तक्रार केली. स्टेडियमच्या बाहेरच्या रस्त्यावरून लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या पत्रकारांनाही चांगली यंत्रणा त्यांच्याकडे असूनही याचा फटका बसला.

शेवटी विजय क्रिकेटचाच

भारतीयांचं त्यांच्या आदर्शांवर प्रेम असतं. पूर्वीच्या काळात लोकं त्यांच्या आवडत्या राजकीय नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी शेजारच्या शहरांमध्ये प्रवास करून जायचे. धर्मगुरुंच्या सभा ऐकण्यासाठीही लोकांची प्रवास करून दुसऱ्या शहरात जायची तयारी असते. अगदी आता आतापर्यंत जर आपल्या आवडत्या स्टारचा सिनेमा आपल्या शहरात वा राज्यात प्रदर्शित झाला नाही तर तो पाहण्यासाठी लोकं प्रवास करून दुसरीकडे जात.

आता क्रिकेट आणि क्रिकेट स्टार्ससाठी लोकांची हवाई प्रवास करायचीही तयारी आहे. या मॅचेस पाहण्यासाठी आपण युरोपातील इतर देश, भारत, अमेरिका आणि जगभरातल्या इतर देशांतून आलो असल्याचं मला अनेकांनी सांगितलं. पण नेमकं कशासाठी देशासाठी की क्रिकेटसाठी?''

आम्ही वेगवेगळ्या भाषा बोलतो, आमची संस्कृती, जेवण वेगवेगळं आहे. पण आमचा धर्म एकच आहे - क्रिकेट. शेवटी तेच जिंकतं. '' विशाल सांगतो. ''तुम्हीच पहा, इथे तुम्हाला मिनी-इंडिया पहायला मिळेल. भारतातली सगळी राज्यं इथे एकाच ठिकाणी आहेत. आपण कायमच का असे एकोप्याने राहू शकत नाही? '' जेसनला प्रश्न पडला होता. सगळे फॅन्स गेल्यानंतर 2 तासांनी आम्ही स्टेडियममधून बाहेर पडलो. पण कानात एकच आवाज घुमत होता, ''इंडिया...इंडिया! ''

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)