वर्ल्ड कप 2019 : ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, असा लढवय्या जो वंशभेदाला पुरून उरला

उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान ख्वाजा

"इस्लाम माझा आधारस्तंभ आहे. इस्लाममुळेच मी सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेऊ शकतो. क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा काही वर्षच भाग असणार आहे. माझ्या घरच्यांचा मला पाठिंबा आहे. इस्लाम सदैव माझ्यासोबत असेल. माझा धर्म. काहीही झालं तरी इस्लाम माझ्या बरोबर असेल अशी मला खात्री आहे. परंतु ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळणारा पहिला मुस्लीम खेळाडू अशी बातमी मला भावत नाही. माझा धर्म कोणता यापेक्षाही मी खेळलो कसा हे पाहणं योग्य ठरेल. बॅगी ग्रीन घालून ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हा सर्वोच्च सन्मान आहे."

हे शब्द आहेत उस्मान ख्वाजाचे. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघातला हा खेळाडू.

प्रचंड क्षेत्रफळ आणि विरळ लोकसंख्या असं विषम गुणोत्तर असणाऱ्या ऑस्ट्रेलियात मुस्लीम समाज आहे २.६ टक्के. साहजिकच अल्पसंख्याक.

उस्मान ख्वाजाचा जन्म दूरवरच्या पाकिस्तानात, इस्लामाबादमध्ये झाला. पाकिस्तानमध्ये जन्मलेले किंवा दक्षिण आशियाई वंशाचे अनेक खेळाडू इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये दिसतात.

पण पाकिस्तान ते ऑस्ट्रेलिया असं संक्रमण पेलणारी मंडळी कमी आहेत. खेळाच्या मैदानावर स्वत:ला सिद्ध करत असतानाच वर्णभेद, वंशभेदाचा सामना करत तसंच ट्रोलच्या आर्मीला तोंड देत उस्मानने इथपर्यंतची वाटचाल केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान कर्णधार स्टीव्हन स्मिथसमवेत

उस्मानचे बाबा तारीक हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. उस्मान पाच वर्षांचा असतानाच त्यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया निवडण्याचं कारण म्हणजे तिथे क्रिकेट खेळलं जातं. आई फौजिया यांनी ऑस्ट्रेलियातही पारंपरिक खाद्यसंस्कृती जपली आहे. त्यांच्या हातचं बटर चिकन खाण्यासाठी उस्मान आतूर असतो. उस्मानचे दोन भाऊही आहेत-नौमन आणि अर्सलन. सिडनीच्या पश्चिमेकडच्या पॅरामॅट्टा भागात उस्मानचं बालपण गेलं.

उस्मानने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याला इंग्रजी नीट येत नव्हतं. उर्दू ही त्याची प्रथम भाषा होती. पण क्रिकेटच्या वेडापुढे भाषा हा अडसर ठरला नाही. अगदी लहान वयातही उस्मान भल्या सकाळी क्रिकेट किट घेऊन तय्यार असे अशी आठवण त्याचे वडील सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान ख्वाजा

वंशभेदाचा सामना केल्याचं उस्मान सांगतो. खूप अर्वाच्य भाषेत बोललं जायचं. ती भाषा आक्षेपार्ह स्वरुपाची होती. चारचौघात सांगता येणार नाही अशा शब्दांत हिणवलं जायचं.

ऑस्ट्रेलियाची संस्कृती वेगळी होती. उस्मानच्या त्वचेचा रंग त्याला भिन्न करत असे. तु ऑस्ट्रेलियासाठी कधीही खेळू शकणार नाहीस असंही त्याला सुनावण्यात आलं.

पण उस्मानने रन्स करण्याचं तत्व प्रमाण मानलं. त्याच्याशी कधीही प्रतारणा केली नाही. न्यू साऊथ वेल्ससाठी सातत्याने रन्स केल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी त्याची निवड झाली. मात्र अंतिम अकरात त्याची निवड झाली नाही.

वर्षभरानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पारंपरिक अशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या बोटाला दुखापत झाल्याने ख्वाजाला स्टँडबाय प्लेयर म्हणून सामील करण्यात आलं.

पॉन्टिंग दुखापतीतून न सावरल्याने ख्वाजाला प्रतिष्ठेची बॅगी ग्रीन देण्यात आली. टेस्टच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची बॅटिंग होती. खेळपट्टीवर स्थिरावलेला फिलीप ह्यूज बाद झाला. पॉन्टिंगच्या जागी खेळणारा उस्मान ख्वाजा बॅटिंगला येणार अशी चिन्हं होती. मात्र अंपायर्सनी लंचचा इशारा केला. ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याकरता उस्मानने अनेक वर्ष वाट पाहिली होती.

त्या प्रतीक्षेत 40 मिनिटांची भर पडली. लंचनंतर उस्मान खेळायला उतरला. दूरवरच्या पाकिस्तानात जन्मलेला, ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीत ऑड मॅन आऊट वाटणारा उस्मान बॅगी ग्रीनमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करत होता. ज्या क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांनी मायभूमी सोडून ऑस्ट्रेलिया गाठलं, ते स्वप्न उस्मानच्या रुपात पूर्ण झालं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्माज ख्वाजा कुटुंबीयांसमवेत

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ कट्टर व्यावसायिकतेसाठी ओळखला जातो. या संघात स्थान मिळवणं आणि स्थिरावणं अवघड मानलं जातं. उस्मानच्या कलात्मक फलंदाजी शैलीची प्रशंसा झाली मात्र त्याचा खेळ संथ असल्याची टीका होऊ लागली. मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक एकाग्रता त्याच्याकडे नाही, त्याचं तंत्र घोटीव नाही अशा टीकेचा सूर तीव्र झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे उस्मानला संघातून डच्चू देण्यात आला.

तेव्हापासून उस्मानचा संघर्ष सुरू आहे. निवड झाली तर कामगिरीतून स्वत:ला सिद्ध करण्याचा आणि निवड नाही झाली तर नाऊमेद न होता स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत राहायचं. अधिकाधिक खेळायला मिळावं यासाठी 2012 मध्ये उस्मानने न्यू साऊथ वेल्सऐवजी क्वीन्सलँडतर्फे खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय उस्मानच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान ख्वाजा पहिल्या टेस्टवेळी.

एका शतकी खेळीने उस्मानला टेस्ट टीममध्ये पक्कं केलं. गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत, ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात 462 धावांचं अशक्य आव्हान होतं. उस्मानने 522 मिनिटं खेळपट्टीवर ठाण मांडत 141 धावांची मॅरेथॉन खेळी केली. चिवट एकाग्रतेसह संयमी खेळी करत उस्मानने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर बॉल टेंपरिंगप्रकरणी एका वर्षाची बंदी घालण्यात आल्याने उस्मानसाठी वन डे संघाची दारं पुन्हा एकदा किलकिली झाली. वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. पाच सामन्यांच्या मालिकेत उस्मानने 50, 38, 104, 91, 100 अशी धावांची रास रचली. वर्ल्ड कपसाठी झालेली निवड ही निव्वळ गुणवत्तेच्या बळावर आहे उस्माननं सिद्ध केलं.

मैदानात वेगवेगळे चढउतार अनुभवणाऱ्या उस्मानच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलला होता. उस्मान आणि त्याचे कुटुंबीय मुस्लीम आहेत. उस्मान जिची निवड करेल, ती मुलगी आमच्या घराचा भाग होईल असं त्याच्या घरच्यांनी स्पष्ट केलं होतं. उस्मानने रेचल मॅकलेनच्या प्रेमात असल्याचं आणि साखरपुडा करणार असल्याचं फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान आणि रेचल ख्वाजा

रेचल ख्रिश्चन कॅथलिक आहे. उस्मान आणि कुटुंबीयांचा इस्लामकडे ओढा पाहून तिनेही इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यावरूनही तिला आणि उस्मानला टीकेला सामोरं जावं लागलं. रेचलनं इस्लाम स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. "इस्लाम स्वीकारण्यासाठी उस्मान किंवा त्याच्या कुटुंबीयांनी माझ्यावर कोणताही दबाब टाकला नाही. उस्मानच्या आयुष्यात इस्लामचं महत्त्व अपरिमित आहे. परंतु मी धर्मांतर करणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता", असं ती सांगते. रेचलच्या घरच्यांनी तिला आणि या नात्याला सदैव पाठिंबा दिला. गेल्या वर्षी उस्मान-रेचलचं लग्न झालं.

उस्मान-रेचल आपले फोटो सोशल मीडियावर टाकतात तेव्हा त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं. मुस्लीम समाजाची माणसं आम्हाला ट्रोल करतात. आम्हाला आता त्याची सवय झाली आहे असं हे दोघं सांगतात.

लहानपणापासून बॅटबॉल उस्मानच्या आवडीचा. लहानगा उस्मान बॅटिंग करतानाचे अनेक व्हीडिओ उस्मानच्या वडिलांनी हँडीकॅमवर शूट करून ठेवले आहेत.

ऑस्ट्रेलियात शिस्तबद्ध क्रीडा संस्कृती आहे. गुणी, प्रतिभावान खेळाडूंना मार्गदर्शनासाठी अकादम्या, एक्सलन्स सेंटर्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक संघात प्रवेश मिळवण्यासाठी एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे खूप साऱ्या रन्स करा किंवा खूप साऱ्या विकेट्स मिळवा. खोऱ्याने रन्स आणि बक्कळ विकेट्स नावावर असल्या तरी स्पर्धा प्रचंड असल्याने संधी मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू अन्य क्षेत्रातही मुशाफिरी करतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उस्मान ख्वाजा क्वीन्सलँड संघातील सहकाऱ्यांसमवेत

उदाहरणार्थ उस्मान क्रिकेटपटू असला तरी प्रोफेशनल वैमानिक आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून उस्मानने अव्हिएशनमध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली आहे. पुस्तकी शिक्षण आणि डिग्री असली तरी विमान चालवण्यासाठी परवाना लागतो. उस्मानकडे तोही आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स हातात पडण्याआधीच उस्मानकडे विमान चालवण्याचा परवाना आला होता. आधुनिक क्रिकेटचा शिलेदार असला तरी उस्मानची बॅटिंग स्टाईल पारंपरिक धाटणीची आहे. त्याचा स्टान्स, स्ट्रोक मारणं जुन्या पिढीतील डेव्हिड गावर यांची आठवण करून देणारी आहे.

एखादं वाक्य इकडे-तिकडे झालं तरी विपर्यास करून रंगवलं जातं. हलक्याफुलक्या वातावरणात मारलेल्या कोपरखळीलाही गांभीर्याने घेऊन शेरेबाजी केली जाते. पूर्वी या सगळ्याचा मी खूप विचार करत असे, त्रासही करून घेत असे. परंतु आता मी फक्त क्रिकेटचा विचार करतो असं ख्वाजा सांगतो.

गेल्या वर्षी उस्मानच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियातील दहशतवाद प्रतिबंधक पथकाने उस्मानचा भाऊ अर्सकान ख्वाजाला अटक केली.

न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीतील सहकाऱ्याला दहशतवादी कट आखल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्सलान ख्वाजाला अटक झाली होती. एका महिलेवरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी मोहम्मद कामेर निलार निझामादीनला गोवण्याचा प्रयत्न अर्सलानने केला होता. याप्रकरणी त्याने खोटे कागदपत्रंही सादर केली होती असं म्हटलं जातं. अर्सलानने एक खोटी यादी बनवली होती. यामध्ये माजी पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासह वरिष्ठ राजकारण्यांची नावं होती. या सगळ्यांना मारण्याचा कट आहे असं या यादीत भासवलं गेलं. ही यादी अर्सलानने तयार केली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे.

दरम्यान डिसेंबर महिन्यात अर्सकानला पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयीन कारवाईत अडथळे आणण्याच्या पार्श्वभूमीवर त्याला हजर करण्यात आलं. दहशतवादाशी संबंधित प्रकरणात साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याच्य आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)