श्रीलंका: मशीद पाडून इस्लामिक कट्टरतावादाशी लढा देता येईल का?

श्रीलंकेतील मुस्लिमांनी पाडली मशीद

श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी स्फोटांत 250 लोकांना प्राण गमवावे लागले होते. हा हल्ला घडवण्याचा आरोप असलेल्या कट्टरतावादी गटाविरोधात श्रीलंका सरकारने आता मोहीमच उघडली आहे.

या हल्ल्यानंतर आपल्या समाजातला एक छोटा गटच कट्टरपंथाकडे वळला आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न तिथला व्यापक मुस्लीम समाज करतोय. अतिरेकी विचारसरणीला असलेला आपला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक मुस्लिमांनी मध्य श्रीलंकेतली मशीद पाडली. या मशिदीचा वापर नॅशनल तोहीद जमात ही बंदी असलेली संघटना करत होती.

श्रीलंकेतले एम. एच. एम. अकबर खान म्हणतात, "ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यानंतर आमच्या शहरातले मुस्लिमेतर लोक आमच्याकडे दहशतवादी म्हणून बघतात."

श्रीलंकेत तीन चर्च आणि तीन आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यांसंदर्भात ते बोलत होते. एका मुस्लीम कट्टरतावादी गटाने हे हल्ले घडवल्याचा आरोप केला जातोय.

जगभरातले मुस्लीम बांधव उपवास आणि प्रार्थना करून रमझानचा पवित्र महिना साजरा करत असताना श्रीलंकेतल्या काही मुस्लिमांनी कट्टरपंथीयांचा विरोध म्हणून वेगळंच पाऊल उचललं. त्यांनी थेट एक मशीदच पाडली.

अकबर खान हे मध्य श्रीलंकेतल्या मादातुगामा शहरात असलेल्या मुख्य मशिदीचे ट्रस्टी आहेत. श्रीलंकेतल्या मुस्लीम समाजाने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबद्दल ते बीबीसीला सांगत होते.

मुस्लीम समुदायाबद्दल वाढलेला अविश्वास

अकबर खान सांगतात, "हल्ल्यानंतर पोलीस वारंवार मशिदीत यायचे. लोकांना काळजी वाटू लागली. यामुळे आमच्यात आणि इतर समुदायांमध्ये अविश्वासही वाढत होता."

पाडलेली मशीद नॅशनल तोहीद जमात या संघटनेचे सदस्य वापरायचे. एप्रिल महिन्यात घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागे याच संघटनेचा हात असल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर सरकारने या संघटनेवर बंदी घातली.

Image copyright Getty Images

हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने या संघटनेविरोधात देशभरात मोहीम उघडली. या संघटनेकडून चालवण्यात येणारी पूर्व श्रीलंकेतल्या कट्टानकुडी शहरातली एकमेव मशीद प्रशासनाने सील केली.

मादातुगामा शहरात असलेली मशीद ऐतिहासिक, धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नव्हती. बॉम्ब हल्ल्याशी संबंधित नसलेल्या एका अति-पुराणमतवादी विचारसरणीच्या गटाकडून या छोट्या मशिदीचा कारभार सुरू होता.

कट्टरपंथीयांपासून पिच्छा सोडवण्यासाठी हा समाज किती टोकाचं पाऊल उचलं शकतं, याचं हे उदाहरण.

एकमताने निर्णय

अकबर खान सांगत होते, "आमच्या भागातल्या मुस्लिमांसाठी या शहरात आणखी एक मशीद आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी एका वेगळ्या गटाने ही मशीद सुरू केली होती."

मे महिन्यात जुन्या मशिदीच्या सदस्यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्यात एकमताने वादाच्या केंद्रस्थानी असलेली नवीन मशीद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर हातोड्यासारख्या अवजारांनी स्थानिकांनी मशीद जमीनदोस्त केली.

ते पुढे सांगतात, "आम्ही मशिदीचा मिनार तसंच प्रार्थनेचा हॉल पाडला आणि मशिदीची जागा तिच्या मूळ मालकाला परत केली."

श्रीलंकेतली 70% लोकसंख्या बौद्ध आहे. बहुतांश बौद्धधर्मीय सिंहला भाषिक आहेत. त्यानंतर सर्वाधिक संख्या हिंदू धर्मियांची आहे. त्यांची लोकसंख्या 12% आहेत. त्यानंतर 10% मुस्लीम आणि 7% ख्रिश्चन आहेत.

बहुतांश मुस्लीम तामीळ भाषिक आहेत. मात्र, काही क्लिष्ट राजकीय आणि ऐतिहासिक कारणांमुळे मुस्लीम स्वतःला तामीळ भाषकांपेक्षा वेगळे समजतात.

अनेक मशिदींना टाळं

मात्र, मशीद पाडण्याचं हे पाऊल सगळ्यांच्याच पचनी पडलेलं नाही. उपासनेच्या ठिकाणाला धक्का लावता कामा नये, असं श्रीलंकेतील इस्लामच्या धार्मिक मुद्द्यांवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या ऑल सिलॉन जमियतुल उल्माचं म्हणणं आहे.

"मशिदीचा कारभार कुणीही चालवत असलं तरी सर्व मशिदी अल्लाहच्या आहेत. त्यांना पाडणं किंवा त्यांचं नुकसान करणं इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे," असं या संस्थेनं एक पत्रक काढून स्पष्ट केलंय.

सरकारी आकडेवारीनुसार श्रीलंकेत एकूण 2529 नोंदणीकृत मशिदी आहेत. यापैकी 2435 मशिदी सुरू आहेत. याशिवाय नोंदणी न झालेल्याही अनेक मशिदी आहेत. यापैकी बऱ्याच मशिदींना आता टाळं ठोकण्यात आलंय.

वहाबी मुस्लीम पंथाच्या अनुयायांमध्ये वाढ

श्रीलंकेतल्या दक्षिण-पूर्व विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. रमीझ सांगतात, "मशिदीचा वापर (बंद पडलेल्या मशिदी) वाचनालय, आरोग्यकेंद्र म्हणूनही करता येईल. मशिदी पाडण्याचा मार्ग स्वीकारला तर आपल्याला शेकडो मशिदी पाडाव्या लागतील."

प्रतिमा मथळा डॉ. रमीझ

रमीझ यांच्या अंदाजानुसार एकूण मशिदींपैकी केवळ 10 ते 15% मशिदी कट्टर गटांकडून चालवल्या जातात.

गेल्या जवळपास दोन दशकांच्या कालावधीत वहाबी मुस्लीम विचारसरणीच्या वेगवेगळ्या पंथांच्या अनुयायांची संख्या वाढली आहे.

श्रीलंकेतल्या मुस्लीम समाजाने अनेक वर्ष कट्टरपंथीयांना सहन केलंय. या कट्टरपंथीयांनी अनेक सश्रद्ध मुस्लिमांना अश्रद्ध ठरवलं आहे.

डॉ. रमीझ यांच्या मते हा समाज आजवर शांत राहिल्यामुळेच कट्टरपंथीयांना झटपट बदल घडवता आले आहेत.

कारवाईमुळं दबाव

गरम आणि दमट हवामान असणाऱ्या श्रीलंकेत अधिकाधिक मुस्लिम महिला बुरखा घालत आहेत आणि श्रीलंकेतल्या मुस्लीमबहुल कट्टानकुडी शहरातल्या बहुतांश स्थानिकांना अरबी भाषा येत नसूनही शहरातल्या अनेक रस्ते आणि सार्वजनिक इमारतींची नावं अरबी भाषेत लिहिण्यात आली आहेत.

Image copyright Getty Images

मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकारनेही कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मघातकी बॉम्बहल्ल्यानंतर सरकारने सार्वजनिक स्थळी चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. तसंच सार्वजनिक स्थळांची नावं सिंहली, तामिळ आणि इंग्रजी या श्रीलंकेच्या तीन अधिकृत भाषांमध्ये लिहिण्याचे आदेश देणारं पत्रक प्रसिद्ध केलंय.

सरकारने आणीबाणीदेखील लागू केली आहे. त्याचबरोबर हल्ला घडवून आणणारे सर्व एकतर ठार झालेत किंवा त्यांना अटक करण्यात आल्याचंही सरकारने जाहीर केलंय.

श्रीलंकेतली आणीबाणी 22 जूनला संपणार आहे. तरीही आपल्यावर अजूनही चहूबाजूंनी दबाव असल्याचं मुस्लिमांना वाटतं.

मुस्लिमांवर वाढते हल्ले

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंहला भाषक संघटित जमावांनी पश्चिम श्रीलंकेतल्या दोन डझनहून अधिक शहरांमध्ये हल्ला करत मुस्लिमांची घरं आणि त्यांच्या व्यावसायिक ठिकाणांना लक्ष्य केलं होतं.

डॉ. रमीझ सांगतात, "आमच्याशी दुर्व्यवहार करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी मी आणि इतर चौघे तुरुंगात असलेल्या आमच्या एका सहकाऱ्याला भेटायला गेलो होतो. आम्ही बाहेर पडताच एक व्यक्ती आमच्याशी भांडू लागला."

"तो ओरडला, की तुम्ही मुस्लिमांनी तुमच्या कारमध्ये बॉम्ब लपवले आहेत. काहीतरी अघटित घडण्याच्या शंकेने आम्ही तिथून निघालो."

सामाजिक, राजकीय आणि धार्मिक माध्यमातून कट्टर इस्लामच्या आयात केलेल्या विचारसरणीचा सामना करण्याची गरज असल्याचं डॉ. रमीझ सांगतात.

प्रतिमा मथळा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हिशाम

"बहुतांश लोकं कट्टरतावाद्यांशी (त्यांच्या विचारसरणीशी) सहमत नाहीत. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी सामान्य जनता पोलिसांना सहकार्य करत आहे."

मोहम्मद हिशाम सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सध्या आपला बराचसा वेळ कट्टरतावादाच्या उच्चाटनामध्ये घालवतात.

ते सांगतात, "तरुण मंडळी गुगलवर सर्च करून, चॅट ग्रुप्सवरून आणि यू-ट्यूब व्हीडिओ बघून इस्लामची माहिती घेत आहेत. या सायबर स्पेसमध्ये कट्टरतावाद्यांचा भरणा आहे."

त्यांच्या मते मशीद पाडणं ही एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिकात्मक कृती आहे.

ते म्हणतात, "खरंतर दहशतवादाशी सामना करण्याचा हा सर्वोत्तम सामूहिक प्रयत्न असल्याचं त्या भागातल्या मुस्लिमांना वाटतं."

श्रीलंकेतल्या मुस्लिमांना कट्टरपंथीय होण्यापासून रोखण्याला प्राधान्य द्यायला हवं, हे कबूल करतानाच हिशाम सांगतात कुणीच द्वेषाची शिकवण देता कामा नये. तसंच सिंहला बौद्ध आणि हिंदू तामिळ यांच्यातल्या अतिरेकी घटकांनाही मोकळं रान मिळता कामा नये.

"मुस्लीम आहे म्हणून त्यांचा छळ झाला तर ते कट्टरतावादाचा मार्ग चोखाळतील."

श्रीलंकेतील मुस्लिमांसमोर इतरंही आव्हानं

दरम्यान, मुस्लीम असलेले एक मंत्री आणि दोन राज्यपाल यांना पदावरून पायउतार केलं नाही तर आमरण उपोषण करू, असा इशारा एका प्रभावशाली बौद्ध भिक्खूने दिल्याने श्रीलंकेत राजकीय तणाव वाढला होता.

त्या तिघांनीही राजीनामे दिलेत. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या इतर आठ मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत.

या कट्टरतावादाचा सामना करताना मुस्लिम बांधवांना इतरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. तसंच अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यासाठी अल्पसंख्याक म्हणून त्यांना किंमतही मोजावी लागत आहे.

मात्र, मादातुगामामधली परिस्थितीत सुधारत आहे.

अकबर खान सांगतात, "मशीद पाडल्यानंतर आमच्याबद्दलचा वैरभाव कमी झाला आहे. सिंहली आणि तामिळ भाषिक आमच्याशी आता पूर्वीप्रमाणे शेजारी म्हणून वागू लागले आहेत. यामुळे तणाव निवळला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)