LGBT हक्क: व्हॅटिकन चर्चने उपस्थित केलं ट्रान्सजेंडर समुदायाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

LGBTQ Pride Month Image copyright Getty Images

लैंगिकतेच्या आधुनिक संकल्पननांवर तसंच लैंगिक स्वातंत्र्यावर आक्षेप घेणारं एक पत्रक व्हॅटिकननं ऐन जूनमध्ये, जेव्हा LGBT हक्कांसाठी प्राईड मार्च आयोजित केले जातात, तेव्हाच काढलं आहे.

'स्त्री आणि पुरुष: ईश्वराने त्यांना बनवलं' (Male and Female He Created Them) नावाचं हे 31-पानी पत्रक कॅथलिक शिक्षण महामंडळाने (Congregation of Catholic Education) जारी केलं असून त्यात 'शिक्षणव्यवस्थेतील संकटा'वर भाष्य करण्यात आलं आहे.

सध्या सुरू असलेला 'स्त्री, पुरुष आणि इतर' असा वाद निसर्गाच्या संकल्पनेला नष्ट करू शकतं आणि पारंपरिक कुटुंबव्यवस्था अस्थिर करू शकतं, असं व्हॅटिकनला वाटतं. म्हणून हे पत्रक लहान मुलांबरोबर काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून जारी करण्यात आलं आहे. त्यावर पोप फ्रान्सिस यांची सही नसली तरी त्यांच्या काही वाक्यांचा तसंच कॅथलिक पुराणांमधल्या काही विधानांचा आधार घेण्यात आला आहे.

जून हा LGBTQ समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्राईड मास असतो. याच महिन्यात काढण्यात आलेल्या या पत्रकाची LGBT हक्कांसाठी लढणाऱ्यांनी टीका केली आहे.

चर्चने नेमकं काय म्हटलंय?

या पत्रकात अनेक विषयांना हात घालण्यात आला आहे, ज्यापैकीच एक आहे ट्रान्सजेंडर्सचा. या विषयावर चर्चेचं आवाहन करणाऱ्या या डॉक्युमेंटमध्ये आधुनिक जगतातील लैंगिकतेच्या संकल्पनेवर हल्ला करण्यात आला आहे, जी आज फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोन गटांपुरती मर्यादित नाही.

व्हॅटिकननुसार अशा नवीन संकल्पना 'निसर्गाने घालून दिलेले नियम मोडणाऱ्या आहेत, ज्यामुळे मनुष्याला वाटेल तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे.' आपल्या भावना आणि गरजा यांच्यात गोंधळ करणाऱ्या मनुष्याला आता असा भास होतोय की त्याला लैंगिक ओळखीचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे ही अनिश्चितता निर्माण होतेय, असं यात म्हटलं आहे.

पुढे यात सांगण्यात आलं आहे, "आपली लैंगिकता ठरवण्याचा मानवाला अधिकार नाही. ती ठरवूनच ईश्वर प्रत्येकाला या जगात पाठवतो. पवित्र ग्रंथांमध्ये हेच म्हटलंय की ईश्वराने मनुष्याची निर्मिती करतानाच त्याच्यासाठीची कामं, त्याची मर्दानगी आणि स्त्रीत्व निश्चित केलं होतं."

मात्र हे पत्रक असंही सांगतं की लहान मुलांना हे शिकवणं आवश्यक आहे की त्यांनी प्रत्येकाचा आदर करावा आणि कुणाचाही छळ करू नये, कुणाशीही भेदभाव करू नये.

प्रतिमा मथळा व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या 'न्यू वेज मिनिस्ट्री' संस्थेने म्हटलं आहे.

दरम्यान, या अमेरिकेत LGBT कॅथलिक गटांसाठी काम करणाऱ्या New Ways Ministry या संस्थेला वाटतं की या पत्रकाचा तृतीयपंथी समुदायाला त्रास देण्यासाठी वापर होऊ शकतो. "याच्या आधारे फक्त ट्रान्सजेंडरच नाही तर समलैंगिक (Lesbian किंवा Gay) आणि उभयलैंगिक (Bisexual - स्त्री तसंच पुरुष अशा दोन्ही लिंगांशी संबंध ठेवणारे) यांनाही धोका उद्भवतो."

लोक आपली लैंगिकता ठरवतात, हा समजच चुकीचा असल्याचं या संस्थेचे संचालक फ्रान्सिस डेबर्नाडिनो सांगतात. एका निवेदनात ते म्हणतात, "ज्या लोकांना खरोखरंच लैंगिकतेवरून आधीच प्रश्नं आहेत, त्यांना हे पत्रक आणखी गोंधळात टाकेल." व्हॅटिकन आजही पुरातनकाळात जगत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

जगभरातल्या काही देशांमध्ये आता समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळत आहे. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टानेही समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल दिली होता.

पण LGBT आणि समलैंगिकता म्हणजे नेमकं काय? समजून घ्या

विश्लेषण : मेघा मोहन, बीबीसी जेंडर प्रतिनिधी

हे पत्रक अचानक असं LGBT प्राईड महिन्यात आपल्यामुळे अनेक प्रश्नं उपस्थित होतात. शिवाय, 1969च्या स्टोनवॉल दंगलींना आता 50 वर्षं पूर्ण होत आहेत. LGBT हक्कांच्या लढ्यात ती घटना मैलाचा दगड आहे.

कॅथलिक चर्चने जारी केलेल्या या पत्रकात स्त्री आणि पुरुष या दोन पारंपरिक लिंगांपासून फारकत घेणाऱ्या इतर कुठल्याही संकल्पनेवर टीका करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कुठलीही इतर लैंगिक ओळख चिथावणारी आणि लक्ष वेधण्यासाठीच आहे, असंही सांगण्यात आलं आहे.

लैंगिक स्वांतत्र्याचा लढा देणाऱ्यांना वाटतं की एकीकडे जगभरातील लोक LGBT समुदायाला मान्य करत असतानाच, त्यांच्याबरोबर समाजात गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतानाच व्हॅटिकनच्या अशा भूमिकेमुळे लोक उलट चर्चपासून दूर जातील.

2019 मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांबद्दल सकारात्मक चर्चा जगभरात सुरू आहे - त्यांच्यासाठीची वेगळी प्रसाधनगृह, महिलांसाठी आश्रयस्थळं आणि अगदी तुरुगांमध्येही वेगळ्या जागांसाठीही. अशातच या पत्रकातून स्पष्ट होतं की कॅथलिक चर्च आजही या चर्चेपासून शेकडो वर्षं दूर आहे.

हेही नक्की वाचा

हेही पाहण्यासारखे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)