वर्ल्ड कप 2019: शिखर धवन दुखापतग्रस्त, मात्र संघाबरोबरच राहणार

शिखर धवन, भारत, वर्ल्ड कप 2019 Image copyright Reuters
प्रतिमा मथळा शिखर धवन

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपचे काही सामने खेळू शकणार नाही. मात्र आयसीसी स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी नावावर असणाऱ्या शिखरला गमावणं टीम इंडियाला परवडणारं नाही. त्यामुळे शिखरला संघासोबत ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू स्पर्धेबाहेर गेला तर त्याच्या जागी बदली खेळाडू संघात दाखल होऊ शकतो. मात्र बाहेर गेलेला खेळाडू पुन्हा संघात परतू शकत नाही. यामुळेच टीम इंडियाने धवनला इंग्लंडमध्येच ठेऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शिखरच्या दुखापतीचा मेडिकल टीम आढावा घेत आहे. तो काही सामने खेळू शकणार नाही मात्र तो संघासोबत असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

ICC स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी नावावर असणाऱ्या शिखरने रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत 117 धावांची शानदार खेळी साकारली होती. मात्र याच इनिंगमध्ये पॅट कमिन्सचा उसळता चेंडू हाताच्या बोटाला लागल्याने शिखरला जखम झाली होती. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता.

वनडेत टीम इंडियाच्या दमदार कामगिरीत रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांची मोलाची भूमिका आहे. तूर्तास राखीव ओपनर म्हणून लोकेश राहुल संघात आहे.

राहुल वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत चौथ्या क्रमांकावर खेळला होता. मात्र राहुल आता सलामीला येण्याची शक्यता आहे.

राखीव खेळाडू म्हणून अंबाती रायुडू, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांची निवड करण्यात आली होती. शिखर खेळू शकणार नसल्याने ऋषभ पंतला संधी मिळण्याचीच शक्यता होती. मात्र शिखर संघातच असल्याने ऋषभच्या समावेशाचा मुद्दा निकाली निघाला आहे.

शिखरची वर्ल्ड कपमधली कामगिरी

रन्स प्रतिस्पर्धी संघ ठिकाण तारीख
73 पाकिस्तान अॅडलेड 15 फेब्रुवारी 2015
137 दक्षिण आफ्रिका मेलबर्न 22 फेब्रुवारी 2015
14 UAE पर्थ 28 फेब्रुवारी 2015
9 वेस्ट इंडिज पर्थ 6 मार्च 2015
100 आयर्लंड हॅमिल्टन 10 मार्च 2015
4 झिम्बाब्वे ऑकलंड 14 मार्च 2015
30 बांगलादेश मेलबर्न 19 मार्च 2015
45 ऑस्ट्रेलिया सिडनी 26 मार्च 2015
8 दक्षिण आफ्रिका साऊथहॅम्प्टन 5 जून 2019
117 ऑस्ट्रेलिया ओव्हल 9 जून 2019

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)