पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कप सामन्याआधी विंग कमांडर अभिनंदन यांची थट्टा?

अभिनंदन Image copyright VIDEO GRAB

भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना आता फक्त काही दिवसांवर आलाय. 16 जूनला हा सामना होणार आहे.

पण मैदानवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे रंग आतापासूनच जाहिरातींमध्ये दिसायला लागले आहेत.

सुरुवातीला स्टार स्पोर्टस् ची जाहिरात आली ज्यात भारत पाकिस्तानचा बाप आहे असं सांगितलं गेलं आणि आता पाकिस्तानातल्या एका ऑनलाईन क्रिकेट अॅपने विंग कमांडर अभिनंदन यांना लक्ष्य करत अजून एक जाहिरात बनवली आहे.

या जाहिरातीत बालाकोट स्ट्राईकच्या वेळेस चर्चेत आलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सारखीच दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दिसत आहे. ही जाहिरात म्हणजे त्या व्हीडिओचं नाट्य रुपांतर आहे जो अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर समोर आला होता. या जाहिरातीतला संवाद असा आहे...

प्रश्न : टॉस जिंकला तर काय कराल?

उत्तर : सॉरी, आय अॅम नॉट सपोज्ड टू टेल यू दॅट सर.

प्रश्न : प्लेईंग 11 मध्ये कोण कोण असेल?

उत्तर : आय अॅम सॉरी, आय अॅम नॉट सपोज्ड टू टेल यू धीस.

प्रश्न : ओके, हाऊ इज द टी?

उत्तर : टी इज फॅन्टास्टिक सर

प्रश्न : ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता.... एक सेंकद थांबा, कप घेऊन कुठे चाललात?

चहाच्या कपवरून क्रिकेट वर्ल्ड कपकडे या जाहिरातीने सूचक इशारा केला होता. या जाहिरातीवर आता भारतातल्या लोकांनी प्रश्न उठवले आहेत. बुधवारी हा ट्विटरच्या टॉप ट्रेंडसपैकी एक होता.

Image copyright Twitter

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया-

तानिया मेहता लिहतात, "जेव्हा खेळाचा मुद्दा असतो त्यावेळी ज्या जाहिराती बनवल्या जातात त्यामध्ये एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. मला फक्त हे म्हणायचं आहे की टीम इंडियाने विश्वकप जिंकून आणावा आणि पाकिस्तानला दाखवून द्यावं की आम्ही कोण आहे."

यशी लिहते की, "जर तुम्ही अभिनंदनची जाहिरात पाहिली तर पाकिस्तानी विश्वकपासाठी नाही तर चहाच्या कपमुळे चिंतेत आहे."

मस्तान अली लिहतात, "खेळ हा देशाला जोडायचं काम करतो. एक पाकिस्तानी नागरिक असण्याच्या नात्याने मी या जाहिरातीचा निषेध करते. ही निंदनीय कृती आहे. अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. तसंच एका चॅनेलची जाहिरात ही संपूर्ण देशाचा विचार होऊ शकत नाही."

इरफान हे लिहतात, "मी क्रिकेटचा फॅन नाही, पण भारतात जाहिरातींमध्ये ज्या पद्धतीने इतर टिमची चेष्टा केली जाते, तसं जर दुसऱ्यांनी असं केलं तर लोक रडू लागतात. सन्मान द्या. सन्मान घ्या."

ट्विटर हँडल @m_no_man यांनी ट्विट केल आहे की, "आता मॅचची चिंता कुणाला आहे. पाकिस्तानने या जाहिरातीच्या आधीच युद्ध जिंकल आहे".

विक्रम जोशी यांनी लिहलं आहे, "पाकिस्तानमध्ये इतकी गरिबी आहे की एका चहाच्या कपाला गमावणं सुद्धा त्यांना परवडू शकणार नाही".

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)