वर्ल्ड कपची वारी कधीही न चुकवणाऱ्या या मराठी कुटुंबाला भेटा...

क्रिकेटचे चाहते

"वर्ल्ड कप सर्वांत मोठा उत्सव आहे. तुम्ही तो कसा चुकवू शकता? आम्ही या उत्सवासाठी नेहमीच पैशांची जुळवाजुळव करून ठेवतो. चार वर्षांपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि आता यूकेमध्ये आलो आहोत. क्रिकेटसाठी आम्ही काहीही करू शकतो," हे सांगताना अभंग यांच्या डोळ्यात वेगळंच तेज दिसत होतं.

अभंग नाईक मुंबईचे आहेत. महाराष्ट्रीय कुटुंबातले अभंग इंजीनिअरिंग झाल्यानंतर नोकरीनिमित्ताने अगदी तरुण वयातच अमेरिकेत स्थायिक झाले. ते सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहतात. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि बायको आणि दोन मुलं असं चौकोनी कुटंब आहे.

अभंग सांगतात, "मी 25 वर्षांपूर्वी यूएसमध्ये आलो होतो. नंतर लग्न झालं. माझी मुलंही इथेच लहानाची मोठी झाली. अमेरिकेत इतकी वर्षं घालवल्यामुळे आमच्या आयुष्यात अनेक बदल झाले. मात्र, क्रिकेटची आवड बदलली नाही. हीच आवड आजही आम्हाला भारताशी बांधून आहे."

ते पुढे सांगतात, "यूएसएमध्ये बास्केटबॉल आणि फुटबॉलचं वेड आहे. माझी मुलंही हे खेळ खेळतात. पण, आमचं क्रिकेटचं वेड कायम आहे."

वर्ल्डकपसाठी शाळेला दांडी

अभंग यांच्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनाही या खेळाची आवड निर्माण झाली. काही काळानंतर त्यांच्या पत्नी पद्मजा यांनाही हा खेळ आवडू लागला. त्यांची मुलं एक पाऊल पुढे गेली. याविषयी बोलताना पद्मजा एक आठवण सांगतात.

"चार वर्षांपूर्वी 2015च्या वर्ल्ड कपसाठी आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. त्यासाठी माझ्या मुलांनी शाळेला चक्क दोन आठवडे दांडी मारली. त्यांना अजून थांबायचं होतं. पण, शाळेला जास्त सुट्ट्या पडू नये, म्हणून मीच खबरदारी घेतली."

आपल्या मुलांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल अभिमानाने सांगताना, पद्मजा म्हणाल्या, "माझी मुलं टेनिस, स्नूकर असे इतर खेळही खेळतात. मात्र, क्रिकेट त्यांना खूप आवडतं. यूएसमध्ये वेळ बदलते. भारतात किंवा अगदी ऑस्ट्रेलियात मॅच असली तरी आपल्या शाळेच्या वेळा पाळून माझी मुलं हा खेळ बघतात."

त्या पुढे सांगतात, "मला माझे पती आणि मुलांमुळेच क्रिकेटची आवड निर्माण झाली."

यावर पद्मजा यांचे पती आणि मुलं अगदी एका सुरात सांगतात, "ती आमच्याकडून क्रिकेट बघायला शिकली असेल. मात्र, निष्पक्षपणे क्रिकेट कसा बघायचा हे आम्ही तिच्याकडून शिकलो."

मुलं अमेरिकेत क्रिकेट खेळतात का?

आपल्या अमेरिकेतल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याविषयी अभंग यांचा मोठा मुलगा शुभंकर सांगतो, "आम्ही पूर्वी टेक्सासला असताना तिथल्या क्रिकेट क्लबमध्ये खेळायचो. कॅलिफोर्नियाला आल्यावर कळलं की इथे क्रिकेट क्लब नाही. मग आम्ही स्वतःच क्रिकेट क्लब सुरू केला. मी आणि माझा भाऊ क्रिकेट शिकवू लागलो. आता माझ्या मित्रांनाही क्रिकेट आवडू लागलं आहे."

शुभंकर वर्ल्ड कपसाठी एक महिना यूकेला जातोय, हे कळाल्यावर त्याच्या मित्रांची प्रतिक्रिया काय होती?

"त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांना क्रिकेट माहिती आहे. मात्र, टेनिस किंवा बास्केटबॉलसारखं ते क्रिकेट फॉलो करत नाहीत."

शुभंकर एक मजेशीर किस्सा सांगतात. शुभंकरला त्याच्या शाळेत आपल्या आवडत्या खेळाडूला पत्र लिहिण्याचा एक प्रोजेक्ट दिला होता. त्याने शेन वॉर्नला पत्र लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांनंतर शेन वॉर्नचं त्याला उत्तरही दिलं.

"मी शेनला त्याची कारकीर्द, त्यातले चढ-उतार, त्याने मिळवलेलं यश याविषयी पत्र लिहिलं आणि काहीच दिवसात स्वतः शेनने स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र मला पाठवलं. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता," शुभांकर भरभरून सांगत होता.

त्याचा धाकटा भाऊ गौतमलाही क्रिकेटचं तेवढंच वेड आहे. त्याला वाटतं या वर्ल्ड कपमध्ये सध्याचा भारतीय संघ सेमी फायनल किंवा फायनलमध्ये जाऊ शकतो.

अभंग क्वचितच भारतात येतात. ते शेवटचं भारतात आले होते ते IPL बघायला. इतकं त्यांना क्रिकेटचं वेड आहे.

अभंग सांगतात, "क्रिकेट हा अनिवासी भारतीयांना भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. याशिवाय, संगीत आणि सिनेमेही आहेत. मात्र, त्यात भाषा अडथळा ठरू शकते. मात्र, क्रिकेटचं तसं नाही. सर्व भाषा, सर्व प्रांत आणि सर्व संस्कृतींना जोडतो."

"मी सचिन तेंडुलकरसोबत मोठा झालो. मला त्याची पहिली मॅच, शेवटची मॅच, त्याने केलेले विक्रम सगळं आठवतं. माझ्याप्रमाणे माझी मुलं विराट कोहलीचे चाहते आहेत. आमच्यात कधीकधी वादही झडतात. मात्र, क्रिकेटची आवड कायम आहे आणि ती वाढतेच आहे", अभंग अतिशय आत्मविश्वासाने सांगत होते.

वर्ल्डकप बघायला सिंगापूरहून आल्या तीन पिढ्या

यूकेमध्ये सुरू असलेला वर्ल्ड कपचा उत्सव बघण्यासाठी पश्चिमेकडच्या अमेरिकेतून अभंग यांचं कुटुंब आलं होतं. तर पूर्वेकडच्या सिंगापूरहून विवेकचं कुटुंब यूकेत दाखल झालं होतं.

मूळचे कोईंबतूरचे असलेले तामिळी विवेक जवळपास दोन दशकांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील सुंदरसन 25 वर्षांपूर्वी सिंगापूरला गेले. काही वर्षांनी त्यांचे कुटुंबीयही सिंगापूरला स्थायिक झाले.

विवेक यांच्या घरातली 7 माणसं, त्यांचे आई-वडील, काका, पत्नी आणि दोन मुलं, हे सर्व वर्ल्ड कप बघण्यासाठी यूकेत आले आहेत.

"आम्हाला संपूर्ण स्पर्धा बघण्याची इच्छा आहे. मात्र, सिंगापूरमध्ये आमची एक कंपनी आहे. त्यामुळे दहा-पंधरा दिवसात आम्हाला परतावं लागेल. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जड अंतःकरणाने आम्ही परतणार," विवेक सांगत होते.

क्रिकेटची आवड कधी लागली?

"पैशांचा प्रश्न नाही. पण, मुलांची शाळा आणि आमची कंपनी मुख्य कारण आहे. भारतीय संघाचा सध्याचा नूर बघता महत्त्वाचं सेलिब्रेशन तर आम्ही चुकवणार नाही ना?" अशी खंत विवेक व्यक्त करतात.

विवेक यांचे वडील सुंदरसेन यांच्यामुळे या कुटुंबाला क्रिकेटची आवड निर्माण झाली.

तामिळनाडूमधल्या क्रिकेट वर्तुळात 1970-80च्या दशकात सुंदरसेन यांना गिरी म्हणून ओळखलं जायचं. ते अनेक वर्षं क्लब आणि व्यावसायिक क्रिकेट खेळले. आता वयाच्या 72व्या वर्षी त्यांच्याकडे आठवणींचा खजिना आहे.

"आम्ही भारतातून आधी मलेशिया आणि नंतर सिंगापूरला आलो तेव्हा सोबत क्रिकेट होतंच. सुरुवातीला मी गावस्कर आणि द्रविड यांचा चाहता होता. सध्या मला धोनी खूप आवडतो. त्याचे डावपेच आणि शांत स्वभाव वाखणण्यासारखा आहे. त्याच्यासारखा दुसरा खेळाडू सापडणार नाही," सुंदरसेन सांगत होते.

"माझ्या संपूर्ण आयुष्यात क्रिकेटने माझी साथ दिलीय. माझा धाकटा मुलगा विवेक आणि सिंगापूरमध्ये असलेला मोठा मुलगा दोघंही क्रिकेट खेळतात आणि फॉलोही करतात. आता माझी तिसरी पिढी माझे नातू विद्युत आणि विश्रृत यांनाही क्रिकेटची तेवढीच आवड आहे. हे आमच्या कुटुंबाचं बोधचिन्हच समजा ना," सुंदरसेन प्रसन्नमुद्रेने सांगत होते.

यूकेमध्ये वर्ल्डकप बघण्यासाठी विवेकच्या कुटुंबीयांनी जवळपास 2 वर्षांपासून पैसे साठवायला सुरूवात केली.

तुम्ही टीव्हीवर वर्ल्डकप कसा काय बघू शकता?

"या दौऱ्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला आहे, हे खरं आहे. पैसा महत्त्वाचा आहे, हे मला मान्य आहे. मात्र, आवड जास्त महत्त्वाची आहे," विवेक आपला मुद्दा पटवून देत होते.

गेल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच बघण्यासाठी विवेक 2015 साली मेलबर्नलाही गेले होते. ते सांगत होते भारत फायनलमध्ये जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी खूप आधीच फायनलचं तिकीट काढलं होतं. गेल्यावेळी त्यांची निराशा झाली. मात्र, यावेळी भारत नक्कीच फायनलमध्ये धडक मारेल, असा विश्वास त्यांना वाटतोय.

"ही कसोटी स्पर्धा असती तर मी टेलिव्हिजनवर बघितलीही असती. मात्र, हा वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप टीव्हीवर कसा बघू शकता? आम्हाला मैदानात बसून आमच्या संघाचा उत्साह वाढवायचा होता. हा आमच्या कुटुंबाचा एकत्रित निर्णय आहे. आमच्या बचतीतला मोठा भाग कशावर खर्च करायचा असेल तर ते फक्त क्रिकेट आहे," विवेक सांगत होते.

"माझ्या वडिलांनी याची सुरुवात केली. मी आणि माझ्या भावाने ते सुरू ठेवलं. आता माझा मुलगा विद्युत सिंगापूरमध्ये क्लब स्तरावर क्रिकेट खेळतो. माझा मोठा मुलगा विश्रृतला सांख्यिकी आणि विक्रम याची जास्त आवड आहे. आमच्या रक्तातच क्रिकेट आहे", म्हणत विवेकने आपलं म्हणणं संपवलं.

दोन दशकांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेलं एक महाराष्ट्रीय कुटुंब आणि दोन दशकांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थायिक झालेलं एक तामिळ कुटुंब, ही दोन्ही कुटुंब युकेमध्ये होत असलेला वर्ल्ड कप बघण्यासाठी आली आहेत. त्यांना एकमेकांची भाषा येत नाही. मात्र, दोघांचं म्हणणं सारखंच आहे. ते कधीच भेटलेले नाही. मात्र, ते एकाच मैदानात एकत्र आलेत, एकाच उद्देशाने... क्रिकेट.

क्रिकेटमुळे आपण भारताशी अजूनही जोडलेलो आहोत, अशी या दोन्ही कुटुंबांची भावना आहे. हे केवळ या दोन कुटुंबांची कहाणी नाही. अशी अनेक कुटुंब आणि मित्रमंडळी जगाच्या वेगवेगळ्या भागातून क्रिकेट बघण्यासाठी आणि भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी यूकेत दाखल झाली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)