स्टेफनी लॅब्बे : जेव्हा एका अष्टपैलू खेळाडूला फक्त एक महिला आहे म्हणून फुटबॉल लीग संधी नाकारते....

स्टेफनी लॅब्बे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा स्टेफनी लॅब्बे

स्टेफनी लॅब्बे... गोलकीपर म्हणून तिच्या कौशल्यामुळे फुटबॉल विश्वात तिला प्रसिद्धी मिळाली.

फिफा महिला वर्ल्डकप 2019मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कॅनडाने कॅमरुनवर 1-0 असा विजय मिळवला. या सामन्यात स्टेफनीने तिच्या कारकिर्दीतला 30वा क्लीन शीट राखला. आजवर खेळलेल्या 62 सामन्यांपैकी 30 सामन्यात तिने क्लीन शीट राखला आहे. म्हणजेच तिच्या देशासाठी तिने खेळलेल्या एकूण सामन्यांपैकी निम्म्याहून अधिक सामन्यात तिने प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही. ही एक सम्माननीय कामगिरी आहे.

मात्र, तिने 2018 साली पुरुषांच्या कॅलगरी फुटहिल या सेमी-प्रोफेशनल कॅनडीयन फुटबॉल क्लबमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती चर्चेत आली.

खरंतर गोलकीपर स्टेफनीने या क्लबमध्ये स्थान मिळवलंही होतं आणि स्पर्धेपूर्वीच्या मैत्रीपूर्ण सामन्यात ती खेळलीही होती. त्यातही तिने क्लीन शीट राखली होती. मात्र, त्यानंतर लीग अधिकाऱ्यांनी USL 'पुरुषांसाठीची स्पर्धा' असल्याचं म्हणत तिच्यावर बंदी आणली.

खेळाच्या वरिष्ठ स्तरावर असलेल्या लिंगभेदासमोर 32 वर्षांची स्टेफनी सध्या सर्वांत मोठं आव्हान आहे.

युथ लेव्हलच्या मिश्र संघासाठी (ज्या संघात स्त्री आणि पुरूष दोन्ही खेळाडू एकत्र खेळतात) अनेक राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी वयोमर्यादा आखून दिलेली असली तरी व्यावसायिक खेळात ती नाही.

लिंगभेदाचा सिद्धांत

मॅरिबेल डॉमिन्गेझ या मेक्सिकोच्या महिला फुटबॉलपटूने 2004 साली मेक्सिकोच्या पुरूषांच्या सेलाया फुटबॉल क्लबशी करार केला होता. या कराराला आंतरराष्ट्रीय फुटबॉल नियामक संस्था असलेल्या फिफाने आक्षेप घेत नकाराधिकाराचा वापर केला. यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत फिफाने म्हटलं होतं, "पुरूष आणि महिला फुटबॉलमध्ये स्पष्ट फरक असणं आवश्यक आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मॅरिबेल डॉमिन्गेझ

मेक्सिकोच्या फुटबॉल महासंघाने डॉमिन्गेझच्या बाजूने घेतलेला निर्णय फिफाने रद्द केला आणि फुटबॉलमध्ये लिंगभेद हा एक सिद्धांत होता, यावर भर दिला.

त्यावेळी फिफाने म्हटलं होतं, "लीग फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुरूष आणि महिला सामने वेगळे होतात. यावरूनच हे स्पष्ट होतं. शिवाय खेळाचे कायदे आणि फिफाचे नियमही अपवादांना परवानगी देत नाहीत."

सर्वसामान्य जनतेचंही हेच मत दिसतं. शिवाय स्त्री आणि पुरूष यांचे शारीरिक गुणधर्म आणि क्षमता वेगळ्या असतात, असाही एक सर्वसामान्य युक्तीवाद केला जातो.

ऑलिम्पिकमधील बदल

काही खेळांमध्ये स्त्री आणि पुरूष यांच्या कामगिरीमध्ये बराच फरक दिसतो. आधुनिक ऑलिम्पिक युगात स्त्री आणि पुरूष यांच्या खेळातल्या गुणांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे परिणाम स्पोर्ट्स सायन्स मेडिसीन या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यात असं आढळलं की पुरूष खेळाडूची कामगिरी ही महिला खेळाडूच्या कामगिरीपेक्षा 40% अधिक असू शकते.

याशिवाय, जगातल्या बहुतांश ख्यातनाम खेळांमध्ये मिश्र सामने होत नाहीत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ब्राझिलची फुटबॉलपटू मारता

उन्हाळी ऑलिम्पिक खेळात केवळ घोडेस्वारी आणि नौकानयन या दोनच स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष एकत्र दिसले. 2017 साली टेनिस आणि बॅडमिंटनमध्येही काही मिश्र सामने झाले. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये अथलेटिक, स्विमिंग आणि ट्रायथलॉन या स्पर्धांमध्ये मिश्र सामने आयोजित केले जातील, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जाहीर केलंय.

मात्र, फुटबॉल या खेळात महिला आणि पुरूष खेळाडूंच्या कामगिरीत फारसा फरक दिसत नाही. किमान शास्त्रीयदृष्ट्या तरी. लिव्हरपूल जॉन मूल विद्यापीठात स्पोर्ट्स साइंटिस्ट असलेले पॉल ब्राडली यांनी महिला फुटबॉलपटूंचा बराच अभ्यास केला आहे. 2013 सालच्या उफा चॅम्पियन्स लीगमधले पुरूषांचे फुटबॉल सामने आणि महिलांचे फुटबॉल सामने यांचाही त्यांनी अभ्यास केला.

या अभ्यासादरम्यान ब्राडली यांना आढळलं की खेळ सुरू असताना स्प्रिंट करताना खेळाडूंच्या क्षमतेचा कस लागतो. अशावेळी महिला आणि पुरूष खेळाडूंच्या कामगिरीत ब्राडली यांना बराच फरक दिसला.

Image copyright Getty Images

मात्र, महिला खेळाडू पुरूष खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचंही या अभ्यासात दिसून आलं. तसंच महिलांचा फुटबॉल सामना अधिक रंजक असल्याचंही ब्राडली यांना जाणवलं.

ब्राडली यांनी बीबीसीला सांगितलं, "गेल्या काही वर्षांत महिलांच्या स्पर्धांमध्ये जे मोठे बदल झाले त्यामुळे महिलांच्या शारीरिक क्षमतांमध्येही गुणात्मक बदल झाले असावे, अशी आमची अपेक्षा आहे. विशेषतः क्रीडा शास्त्र, ताकद, पोषण आणि प्रशिक्षण यांच्यातल्या बदलांमुळे."

2013 सालच्या त्यांच्या अभ्यासात त्यांना असंही आढळलं की एका सामन्यात पुरूष महिला खेळाडूपेक्षा सरासरी 5% अधिक चांगली कामगिरी करतो. तर शारीरिक क्षमतेचा कस लागण्याच्या वेळी तो 30% अधिक चांगली कामगिरी करतो. असं असलं तरी ब्राडली फुटबॉलच्या एका विशिष्ट गुणधर्माकडेही लक्ष वेधतात. ते सांगतात बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांपेक्षा फुटबॉल असा क्रीडाप्रकार आहे ज्यात वेगवेगळ्या शारीरिक क्षमता असलेले बरेच खेळाडू असतात.

बुद्धीमत्ता विरुद्ध स्नायू

कमी उंचीच्या, शारीरिक ताकद कमी असणाऱ्या आणि मंद गतीच्या खेळाडूंनीही अप्रतिम कामगिरी केल्याचा इतिहास आहे आणि त्यामुळेच याच आधारावर महिला आणि पुरूष खेळाडूदेखील एकत्र खेळू शकतात, असं काही जाणकारांचं मत आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर सहा वेळा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इअरचा खिताब मिळालेली ब्राझिलची फुटबॉलपटू मारता हिचं देता येईल. तिने आपल्याला पुरूषांच्या फुटबॉल संघाचं निमंत्रण आल्यास आपण ते स्वीकारू, असं म्हटलं होतं.

ती म्हणाली होती, "मी पुरूषांसोबत अनेकदा खेळली आहे आणि त्यातले काही माझ्यापेक्षा अधिक सशक्त आणि उंच होते. ते शारीरिकदृष्ट्या माझं खच्चीकरण करू शकतात, हे मला माहिती आहे. मात्र, मी माझ्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्याचं उत्तर देऊ शकते."

Image copyright Getty Images

गेल्या महिन्यात कॅलगरी फुटहिल या फुटबॉल संघातल्या आपल्या अनुभवाविषयी सांगताना स्टेफनी लॅब्बे हिने पुरूषांच्या तुलनेत आपली शारीरिक ताकद कमी पडत असल्याचं मान्य केलं होतं.

फ्रान्स प्रेसे या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत स्टेफनीने म्हटलं होतं, "गोलकिपर म्हणून हे चांगलं आहे. कारण तुम्हाला हार्ड शॉट्स, स्पीड शॉट्सचा सामना करावा लागतो आणि खेळही वेगवान असतो."

असं असलं तरी लिगच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला नसता तर तिला संघात जागा मिळाली असती.

लॅब्बे सांगते, "ज्या गोष्टीवर तुमचं काहीच नियंत्रण नाही, अशा गोष्टीमुळे तुम्हाला खेळता येणार नाही, हे सांगणं खूप कठीण आहे."

ती म्हणते, "हे असं नाही ना की मी घरी गेले आणि त्यावर मेहनत घेतली, ती बदलली. मी मुलगी आहे तर आहे."

स्क्वॉटलँडमधल्या अबरडीन विद्यापीठात मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक फेडरिको लुझी फिफाकडून होत असलेल्या लिंगभेदाला 'फुटबॉलमध्ये दुर्लक्षित राहिलेला घोटाळा' म्हणतात.

Image copyright Getty Images

ते लिहितात, "कुठलीही व्यावसायिक महिला फुटबॉलपटू व्यावसायिक पुरूष फुटबॉलपटू एवढी चांगली नाही, हे खरं जरी असलं तरीदेखील खेळाडूच्या कथित अपुऱ्या गुणवत्तेच्या आधारावर फुटबॉल नियामक संस्था त्या खेळाडूचा करार नकाराधिकाराचा वापर करून रद्द करू शकत नाही."

फुटबॉलमधल्या लिंगभेदाचं समर्थन करणारे असाही युक्तीवाद करतात की महिलांनी स्वतंत्र खेळणं त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या वेगवेगळ्या शारीरिक रचनेमुळे महिला फुटबॉलपटुंना पुरूष फुटबॉलपटुंपेक्षा टाच आणि गुडघ्यांच्या दुखापतींसारख्या दुखापती होण्याची शक्यता अधिक असते, असं अभ्यासाअंती स्पष्ट झालं.

फिफाने केलेल्या एका संशोधनात आढळलं आहे की महिला खेळाडूंना anterior cruciate ligament (ACL) यासारखी दुखापत होण्याचं प्रमाण पुरूष खेळाडूंपेक्षा 2 ते 6 पट अधिक असतं.

लुझी सांगतात, "महिलांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असली तरी तरीदेखील महिलांना पुरूष संघात खेळण्यावर बंदी घालणं तत्वतः योग्य नाही. तसं केल्यास ज्या पुरूष खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असते, त्यांच्यावरही बंदी घातली गेली पाहिजे."

वॉल्व्हेरहॅम्पटन विद्यापीठात क्रीडा विषयाच्या प्राध्यापक जीन विलियम्स म्हणतात की इंग्लंड, होलंड, इटली आणि जर्मनीसारख्या देशात अगदी खालच्या पातळीवर मुलं आणि मुली जास्तीत जास्त वेळ एकत्र फुटबॉल खेळतात. त्यामुळे फुटबॉलमधल्या लिंगभेदाला विरोध करणारी पिढी तयार होईल, अशी शक्यता आहे.

"अधिकाधिक मिश्र सामने खेळवल्यास महिला आणि पुरूष एकत्र खेळण्याची संकल्पना रुळेल. पुढच्या पिढीसाठी लिंगभेद स्वीकारणं अवघड असेल", त्या सांगतात.

"अधिकाधिक महिला फुटबॉलपटुंनी खेळातल्या लिंगभेदाला आव्हान द्यायला हवं. येत्या 10 वर्षांत बरेच बदल होतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)