‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानवरून हवाईप्रवास करून आले, आम्ही काय करायचं?’

भारतीय छात्रों के साथ मलिक सैफुल्लाह (टोपी पहने हुए) Image copyright Saifullah

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCOच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आहेत.

इथं नरेंद्र मोदी हे रशिया आणि चीनच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.

पण पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रातून विमान उड्डाणांसाठी बंदी घातल्यापासून आपल्या अडचणी वाढल्याचं बिश्केकमधल्या भारतीय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

पाकिस्तानातल्या बालाकोटवर भारताने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणांसाठी बंदी घातली आहे.

मोदी हे ओमान, इराणमार्गे बिश्केकला गेल्याचं वृत्त आहे. बीबीसीचे पत्रकार विनीत खरे यांनी बिश्केकमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी बातचित केली.

काश्मिरी विद्यार्थी मलिक सैफुल्लाह

माझं नाव मलिक सैफुल्लाह आहे आणि मी श्रीनगरचा राहणारा आहे. बिश्केकमधल्या किर्गिस्तान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकतोय.

इथे जवळपास 1000 भारतीय विद्यार्थी आहेत. पण पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केल्यापासून विद्यार्थी चिंतेत आहेत.

आम्हाला तिकीटं मिळतायत, पण एकतर्फी प्रवासाची किंमत आहे 500 अमेरिकन डॉलर्स. गेल्या वर्षी 500 डॉलर्सममध्ये दोन्ही बाजूचा प्रवास करता येत होता.

काहीजणांना तर गेल्यावर्षी 400 डॉलर्समध्येही तिकीटं मिळाली होती. ट्रॅव्हल एजंटकडे गेल्यावर तो म्हणतो, उद्या या. ऑनलाईनही तिकीटं मिळत नाहीत. घरचे पुन्हा पुन्हा फोन करतायत.

माझ्या (काश्मीर)मुळे भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी लढतायत. आणि या दोन्ही देशांत गरीबी आहे.

SCO एक चांगली संधी आहे. यामध्ये असणारे चीन आणि रशियासारखे देश भारत- पाकिस्तान या दोघांनीही हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणू शकतात.

Image copyright Nirmal Kumar

याचा त्रास कोणाला होतोय - तर काश्मीरी लोक आणि भारतीय लष्काराला. इथे बिश्केकमध्ये पाकिस्तानी आणि भारतीय मुलं गुण्यागोविंद्याने रहातायत.

जिथे ही परिषद होतेय, तिथं एक शांततापूर्ण प्रदर्शन करण्याचा आमचा विचार आहे. तुम्ही मजा करताय, पण आमचे हाल होतायत, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. किमान आमचा विचार तरी करा.

मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. भारतात किंवा इतर दुसऱ्या कोणत्या तरी देशात एमबीबीएस करण्याएवढे पैसे आमच्याकडे नाहीत.

हा देश खूप स्वस्त आहे. ज्या मेडिकल डिग्रीसाठी भारतात 50 लाख लागतात, ती इथे 20 लाखांमध्ये मिळते.

इथे भारतासारखं चांगलं शिक्षण मिळत नसलं तरी शैक्षणिक वातावरण चांगलं आहे. बहुतेक मुलांनी बँकेकडून कर्जं घेतलेलं आहे. काही पालकांनी मुलांना त्यांच्या पीएफमधून पैसे काढून दिले आहेत.

इथे राहिल्यावर असं वाटतं की आपण युरोपातल्या कोणत्यातरी देशात आहोत. इथली लोकं आमच्याशी चांगलं वागतात. जेवण स्वस्त मिळतं. अगदी आपल्यासारखं जेवणही इथे मिळतं. इथे भारतीय आणि पाकिस्तानी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत.

बिहारचा विद्यार्थी निर्मल कुमार

माझं नाव निर्मल कुमार. मी पूर्व बिहारमधल्या चंपारणचा राहणारा आहे.

मी 19 जून रोजी एअर अस्तानाचं (कझाकिस्तानची सरकारी विमान कंपनी) तिकीट काढलं होतं, पण ती फ्लाईट रद्द झाली. आता तिकीट मिळत नाहीये. घरी कसं जायचं, असा प्रश्न पडलाय. या सुट्टीनंतर माझं एमबीबीएसचं तिसरं वर्षं सुरू होईल.

जमेल त्या मार्गाने घरी ये, असं घरच्यांचं म्हणणं आहे. त्यांना मुलाचं तोंड पहायचंय आणि इथे तिकीट मिळत नाहीये.

गेले दोन दिवस मी यामुळेच टेन्शनमध्ये आहे. तिकीट मिळालं नाही तर इथेच थांबावं लागेल. आमची परीक्षा दोन दिवसांपूर्वीच संपली.

आधी परीक्षेचं टेंशन होतं. परीक्षा संपली, तर विमानाचं उड्डाण रद्द झालं. आता तिकीटासाठी भटकतोय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुटी आहे. इथे आमचा वेळ फुकट जातोय.

Image copyright Hafiz

सुटीच्या वेळी इथे वीज, गॅस आणि पाण्याचीही अडचण असते. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यावर स्थानिक लोकही त्रास देतात.

इथे जवळपास 1000 भारतीय विद्यार्थी आहेत. पण त्यांची संख्या कमी झाली की बाहेर गेल्यावर आमचे मोबाईल्स, पाकिट हिसकावून घेतलं जाण्याचा धोका वाढतो.

भाषेची अडचण तर आधीपासून आहेच. इथे लोकं रशियन भाषेत बोलतात. मीही थोडीफार रशियन भाषा शिकलोय.

मी नीट ( NEET) परीक्षेत पात्र ठरू शकलो नाही. माझा दादा मोतीहारीमध्ये शिकत होता. त्याच मोतीहारीमधला एक मुलगा इथे शिक्षण घेत होता. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI)च्या ऑफिसमधून ही माहिती मिळाली की हे कॉलेज एमसीआयशी संलग्न आहे.

उत्तर प्रदेशचा विद्यार्थी हफीजुर्रहमान

माझं नाव हफीजुर्रहमान. मी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगरचा राहणारा आहे. बिश्केकमध्ये मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे.

पहिल्या वर्षी इथे ट्यूशन फी, राहणं-खाणंपिणं यासगळ्याचा मिळून पाच लाख खर्च येतो. दुसऱ्या वर्षी तीन-सव्वातीन लाखांत भागतं.

भारतात यापेक्षा कितीतरी जास्त खर्च होतो. इथलं स्थानिक जेवण मला झेपत नाही म्हणून मग मी स्वतःच जेवण शिजवतो.

तांदूळ, डाळी, भाज्या मिळाल्या तर घरीच जेवण तयार करतो. माझ्या वडिलांची शेती आहे आणि ते लहान-मोठा व्यापार करतात. वर्षाचा खर्च तीन लाख रुपये असेल तर ते 25 हजार - 30 हजार असं करत, थोडेथोडे पैसे पाठवतात.

इथल्या कॉलेजमध्ये एकाचवेळी सगळे पैसे भरावे लागत नाहीत. सेमिस्टरनुसारही पैसे भरता येतात. पैशांची चणचण असल्यास आम्ही तसं सांगतो. थोडे-थोडे करून मग जमा होतात.

नीट ( NEET) मधून मला जागा मिळावी यासाठी मी अनेक वर्षं प्रयत्न केले. मग असं वाटलं की वेळ आणि पैसा, दोन्ही वाया जातंय.

भारतामध्ये खासगी मेडिकल कॉलेजेला 20 ते 25 लाख डोनेशन द्यावं लागतं. शोधता शोधता इथली माहिती मिळाली. इथलं शिक्षण स्वस्त आहे आणि भारतापासून हे ठिकाण जवळही आहे.

आधी 28-30 हजारांत भारतात येण्या-जाण्याचा खर्च निघायचा. पण आता पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने पुन्हा पुन्हा तिकीट रद्द होतंय, किंमतीही वाढलेल्या आहेत.

आधी भारतात जायला साडेतीन तास लागायचे. आता जवळपास सात तास लागतात. सगळ्यांच्या सुट्या वाया जाताहेत. जे गरीबी आहेत, ते इतका पैसा खर्च करू शकत नाहीत. त्यांना यावेळी जाता येणार नाही.

माझा भारतात जाण्याचा प्लान नव्हता, म्हणून मी तिकीट बुक केलं नव्हतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)