वर्ल्ड कप 2019: भारतापेक्षा पाकिस्तानला विजयाची अधिक गरज- सुनील गावस्कर एक्सक्लुझिव्ह

वर्ल्डकप Image copyright BBC/Vinayak Gaikwad

आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय छान होता. आज सकाळी उठलो तेव्हा अगदी लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. पावसाची कोणतीच चिन्हं नव्हती. त्याचप्रमाणे आज भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर तसंच पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि फलंदाज इंझमाम-उल-हक यांची मुलाखत मिळणार होती.

सकाळी साडे सात वाजताच्या सुमारासच माझी मुलाखतीची विनंती मान्य झाल्याचा फोन मला आला. आम्ही तयार झालो आणि थेट मँचेस्टरच्या कॅथड्रेल गार्डनमधीस ICC च्या फॅन झोनमध्ये गेलो.

खरं सांगायचं तर तिथे फार काही घडेल असं मला आदल्या दिवशी वाटलं नव्हतं. मात्र अनेक भारतीय आणि पाकिस्तानी चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी तिथे गोळा झाले होते.

सुनील गावस्कर काय म्हणतात...

मी जेव्हा गावस्करांना आजच्या मॅचबदद्ल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "सर्वांत आधी मॅच व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण हवामानाचं काही सांगता येत नाही." पाकिस्तानसाठी हा सामना जिकणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण तसं झालं नाही तर त्यांचं स्पर्धेतलं आवाहन संपुष्टात येईल, असंही ते म्हणाले.

भारतीय संघ उत्तम कामगिरी करत असला, तरी त्यांच्या मते इंग्लंड वर्ल्ड कप जिंकण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. ते म्हणाले, "भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे याबद्दल शंकाच नाही. ते विश्वविजेतेपदाचे दावेदार आहेतच. मात्र इंग्लंडचा संघ मला जास्त आवडतो."

त्यांच्या मते इंग्लंडचा संघ या वातावरणाला चांगलाच सरावला आहे. "भारत, पाकिस्तान आणि उपखंडातील लोकांना लख्ख सूर्यप्रकाशात खेळायची सवय असते. त्यांना इथल्या हवामानाची सवय झालेली नाही. मात्र इंग्लंडला आहे. या वातावरणात कसं खेळायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. जर भारत आणि इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचले तर इंग्लंडचा संघ वर्ल्ड कप जिंकेल," असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं.

भारतावर विजयाचं दडपण आहे. मी त्यांना जागेच्या निवडीबद्दल आणि राखीव दिवसांबद्दल विचारलं. ते म्हणाले, "राऊंड रॉबिन पद्धतीत कुणालाच राखीव दिवस मिळत नाहीत. प्रत्येक संघाला सगळ्या संघाविरुद्ध खेळावं लागतं. जर राखीव दिवसांचा विचार केला तर सगळे सामने कसे होतील?"

क्रिकेट खिलाडूवृत्तीने खेळायला हवं

हाच विचार ठेवून मी इंझमाम-उल-हक यांना भेटलो. मी त्यांना सामन्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी एक मिनिटही आढेवेढे घेतले नाही. ते म्हणाले, "वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला कधीच पराभूत केलेलं नाही आणि हे वास्तव आहे. या वेळेलाही भारताचा संघ पाकिस्तानपेक्षा जास्त शक्तिशाली आहे."

हा सामना भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी असा आहे. त्यांच्या मते दोन्ही संघ समतोल आहेत. त्यामुळे त्या विशिष्ट दिवशी कोणता संघ कसा खेळतो यावर विजयाचं गणित अवलंबून आहे.

Image copyright BBC/Vinayak Gaikwad

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यानंतर हा सामना होईल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. हा सामना रद्द केला जावा अशीही चर्चा होती. एक क्रिकेटर म्हणून याकडे कसं पाहता असा प्रश्न मी त्यांना विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी चाहत्यांना एक महत्त्वाचा संदेशही दिला.

ते म्हणाले, "हे बघा क्रिकेट फक्त एक खेळ आहे. कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे निश्चित आहे. हे युद्ध नाही. या खेळामुळे हे दोन देश एकमेकांशी जोडले जातात आणि त्याकडे फक्त खेळासारखं पाहायला हवं. खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचं वैर नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी या खेळाचा निखळ आनंद घ्यावा."

विराट या सामन्याकडे कसं पाहतो?

इंझमाम जे बोलले त्याचीच री पुढे कर्णधार विराट कोहलीने ओढली. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, "आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमची निवड केली आहे. त्यामुळे आम्ही दोन सामन्यात फरक करू शकत नाही. भारत आणि पाकिस्तानसारखे काही सामने भावनिक असतात. मात्र हाही सामना वर्ल्डकपचा सामना असल्याप्रमाणे आणि संपूर्ण ताकदीनिशी खेळतोय."

ICC फॅन झोन

भारत आणि पाकिस्तानमधील सामना कायमच रोमांचक असतो. यावेळी तर सामन्याची उत्सुकता शिगेला गेली आहे. 2018 मध्ये झालेल्या आशिया कपच्या सामन्यानंतर ते प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडिअममध्ये 23 हजार प्रेक्षक बसू शकतात. पण या सामन्यासाठी 7 लाख लोकांनी तिकिटासाठी विनंती केली होती.

Image copyright BBC/Vinayak Gaikwad

कदाचित ICCला ही कळलं असेल. म्हणून त्यांनी हा फॅन झोन शहराच्या अगदी मध्यभागी ठेवला आहे. मोठी स्क्रीन, गाणी, गल्ली क्रिकेट, वर्ल्डकपशी निगडीत उत्पादनं, खाणंपिणं हे सगळं तिथे आहे. तिथे अगदी लाखो लोक मावणार नाहीत. मात्र दोन्ही देशांचे काही हजार चाहते तिथे नक्कीच उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)